बिबट्या, वाघ आणि आता हत्ती

सतराव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांत – धुळे, नंदुरबार इथे हत्ती असल्याच्या नोंदी गॅझेटिअर म्हणजे स्थलपरिचय ग्रंथात आढळतात. कोल्हापुरात तत्कालीन संस्थानिकाने १९४० च्या सुमारास कर्नाटकातून हत्ती आणून सोडल्याचा उल्लेख या विषयावरील एका शोधनिबंधात आहे. त्यानंतर १९५० च्या दशकात कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमाभागात हत्ती आल्याची नोंदही आहे. मात्र, एकूणात महाराष्ट्रात हत्तींचे कळप कायमस्वरुपी मुक्कामी नव्हते, असा उल्लेख विविध नोंदींमध्ये आढळतो.
         तेव्हा हत्ती हा प्राणी महाराष्ट्राला परिचयाचा असला तरी किमान गेली दोनतीन शतके तरी या प्रदेशातील लोकांना हत्तींबरोबर सातत्याने राहण्याची सवय उरलेली नाही. त्यापूर्वी उपरोल्लेखित संदर्भांनुसार, राज्याच्या काही भागांत हत्ती होते त्या काळातील हत्तींची संख्या, लोकसंख्या, वन्य अधिवासांची व्याप्ती व स्थिती या बाबीसुद्धा वेगळ्या होत्या. 
          त्यामुळे, ऑक्टोबर २०२१ मध्ये छत्तीसगढमधून हत्तींचा कळप विदर्भात आला तेव्हा नव्याचे नऊ दिवस संपल्यावर उडाली ती भंबेरी साहजिकच होती. सध्या तरुण वा मध्यम वयात असलेल्या स्थानिक लोकांनी हत्ती पाहिलेच नव्हते. त्यामुळे त्यांना हत्तींच्या स्वाभाविक वर्तनाचा अनुभव तर सोडाच पण त्याविषयी जुजबी माहितीही नाही. परिणामी, विदर्भात गेल्या काही महिन्यांत माणूस आणि हत्तींमधील संघर्षाच्या घटनांमध्ये दोहोंची हानी होत आहे.
     सध्या या संघर्षावरील उपाययोजना या आग लागली की विहीर खणायला निघाल्यासारख्या आहेत. हत्तींचे आगमन अनपेक्षितरित्या झाल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली हे खरे. मात्र, हत्ती केवळ निमित्तमात्र आहे. हत्तींच्या विदर्भातील आगमनापूर्वी वाघांची संख्या, त्यांच्या वावराची व्याप्ती वाढल्याचे परिणाम विदर्भात जनतेच्या व प्रशासनाच्याही अनुभवास आले आहेत. तसेच, राज्यात जवळपास सर्वत्रच थोड्याफार फरकाने बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्षाच्या घटनाही गेली काही वर्षे सातत्याने घडताना दिसून येत आहेत.
         वाघ, बिबट्या आणि आता हत्तीया प्राण्यांच्या वावराची व्याप्ती मनुष्यवस्तीजवळ वाढताना दिसत आहे. किंबहुना, वन्य अधिवासात माणसाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आपण वन्य प्राण्यांच्या जास्त जवळ जाऊ लागलो आहोत, असे म्हणणे बहुतेक अधिक योग्य ठरेल.
         बिबट्या असो, वाघ असो किंवा आता हत्ती, माणूस आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्षाच्या घटनांमागे वन्य प्राण्यांची वाढती संख्या, पूर्वी अस्तित्व असलेल्या प्रदेशात त्यांचे पुनरागमन किंवा नव्या प्रदेशात आगमन आणि कित्येक पटींनी व वेगाने माणसांची संख्या आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासातील वावराची किंबहुना आक्रमक हस्तक्षेपाची वाढती व्याप्ती ही कारणे सारखीच आहेत. 
         तसेच, प्राणी कोणताही असो संघर्षाच्या घटनांमध्ये होणारी जीवित व मालमत्तेची हानी त्या त्या वन्य अधिवासात, त्या लगत राहणाऱ्या स्थानिक लोकसमुहांना सोसावी लागते. त्यातही उपजीविकेची साधने थेट निसर्गावर अवलंबून आहेत व आर्थिक परिस्थिती जेमतेम, बेताची आहे अशांना या संघर्षाचा ताण जास्त जाणवतो. वन्य अधिवासांच्या ऱ्हासाची कारणे, जमिनीचा वापर वनेतर कारणांसाठी बदलण्यामागील हेतू मात्र दूरस्थ लोकसंख्येच्या फायद्याचे असतात. 
    माणूस आणि वन्य प्राण्यांचे सहअस्तित्व म्हणतात ते सहअस्तित्व साकारण्यासाठी शिवधनुष्य पेलायचे असते ते पुन्हा स्थानिक लोकसमुदायांनीच. दूरस्थ लोकसंख्येतील बहुतांश जनता ही या समस्यांबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असते किंवा मग उदासीन तरी.
    प्राणी बदलला तरी ही विषमता आणि विरोधाभास कायम राहतो, ही बाब विदर्भात आलेल्या हत्तींच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.
- पूर्वप्रसिद्धी 'महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्र, खंड ५ अंक १, क्र. १६ (जानेवारी २०२४)'

Comments