उपऱ्या प्रजातींचे मूक आव्हान

अधिवासातील साधनसंपत्तीचा अनिर्बंध, बेकायदा वापर, वन्यजीवांची तस्करी, शिकार, संरक्षित क्षेत्रातील जमिनीचा वनेतर कारणांसाठी वापर इत्यादी वन्यजीव संरक्षण, संवर्धनाच्या आड येणारी विविध आव्हाने, समस्या बहुतेक सर्वांना ठाऊक असतात. काही अप्रत्यक्ष आव्हानांची मात्र आपल्याला सुतरामही कल्पना नसते. ‘महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्राच्या प्रस्तुत अंकात अशा एका समस्येचा समावेश करण्याची संधी मिळाली.
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर परक्या (alien) आक्रमक (invasive) वनस्पतींच्या व्याप्तीचे अभ्यास अहवाल योगायोगाने लागोपाठ प्रकाशित झाले. या बातम्यांनी सजीवांच्या उपऱ्या किंवा परकीय प्रजातींच्या वन्य अधिवासातील आक्रमणाची समस्या अधोरेखित केली आहे. उपऱ्या प्रजातींच्या आक्रमणाची समस्या वार्तापत्राच्या वाचकांसमोर सविस्तर मांडण्याच्या हेतुने या दोन्ही बातम्यांचा अंकात समावेश करण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक प्रदेशात उत्क्रांत झालेल्या वनस्पती किंवा प्राण्यांच्या प्रजाती या त्या त्या प्रदेशातील जैविक, अजैविक घटकांशी जुळवून घेत उत्क्रांत झालेल्या असतात. या उलट बाहेरून एखाद्या प्रदेशात आलेल्या प्रजाती त्या प्रदेशातील परिसंस्था, अधिवास आणि त्यातील अन्नसाखळ्यांमध्ये उपऱ्या किंवा परकीय ठरतात. अशा अनेक प्रजाती जगभरात पसरलेल्या आहेत. 
या प्रसाराला प्रामुख्याने मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे. हस्तक्षेपाची कारणे वेगवेगळी आहेत, प्रजातींचा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात झालेला प्रवास माणसाच्या कळतनकळत झालेला आहे. परंतु, जसजसे जग जवळ आले तसतशी परक्या प्रजातींच्या आक्रमणाच्या समस्येची व्याप्ती व गांभीर्य वाढत गेले आहे.
उपऱ्या प्रजातींमुळे एखाद्या ठिकाणची स्थानिक जैवविविधता नाहीशी होते, स्थानिक भक्ष्य, भक्षक नाहीसे झाल्यामुळे अन्नसाखळ्या मोडतात, अधिवासाचा ऱ्हास होतो. साहजिकच त्या अधिवासातील वन्यजीवन कोलमडते. सर्व प्रकारच्या परिसंस्था, अधिवासांमध्ये हा ऱ्हास कमीजास्त वेगाने मात्र सातत्याने होत आहे. म्हणून या समस्येला मूक आव्हान असे म्हटले आहे.
या दुष्परिणामांना सर्वाधिक कारणीभूत ठरलेली वनस्पती म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवरील अभ्यासांमध्ये लँटाना कमारा हिचे नाव समोर आले आहे. हा निश्चितच योगायोग नाही.
लँटाना ही वनस्पती आपणा सर्वांच्या किमान पाहण्यात आलेली असावी. शास्रीय नावावरून बोध होईलच असे नव्हे म्हणून – मराठी भाषेत ही वनस्पती घाणेरी किंवा टणटणी म्हणून ओळखली जाते. वास्तविक, पर्यावरणशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ यांची एक विचारधारा सांगते की उपऱ्या प्रजातींना स्थानिक नावे देऊ नयेत. तसे केल्यास त्या स्थानिकच असल्याचा आभास निर्माण होतो व जनमानसात गैरसमज रूजतो. असे गैरसमज एकदा पसरले की दूर करणे अवघड होते.
दक्षिण अमेरिकेतील स्थानिक असलेल्या लँटानाचा जगात इतरत्र प्रसार १६९० च्या सुमारास सुरू झाला. आजघडीला अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांमध्ये तिने मूळ रोवले आहे. तिच्या रंगीबेरंगी फुलांना असलेल्या सौंदर्यमूल्यासाठी  साधारण १८०७ पासून पुढे ब्रिटिशांनी लँटाना भारतात आणल्याची नोंद एका अभ्यासात आहे.
भारतात वाघांच्या अधिवासात म्हणजे जवळपास सर्वच राज्यांमध्ये लँटानाचा प्रसार झाला आहे. त्यामुळे हे अधिवास धोक्यात आले आहेत. लँटानाच्या आक्रमणात तृणभक्षी प्राण्यांच्या खाद्याची विविधता आणि उपलब्धता कमी झाली आहे. तृणभक्षी प्राण्यांची संख्या घटल्यास त्यांच्या भक्षक प्राण्यांना - ज्यामध्ये वाघाचाही समावेश आहे – पुरेसे खाद्य उपलब्ध होणार नाही. परिणामी, त्यांचीही संख्या कमी होणार. 
या बाबींकडे लक्ष वेधणारे शोधनिबंध, अभ्यास अहवाल अलिकडच्या काही वर्षांत सातत्याने प्रकाशित केले जात आहेत, प्रसारमाध्यमे त्यांची दखल घेऊ लागली आहेत, ही दिलासादायक बाब आहे. परंतु, इथे नमूद केले पाहिजे की या दोन्ही बातम्या इंग्रजी प्रसारमाध्यमांमधून घेतल्या आहेत. मराठी माध्यमांमध्ये त्या सहजासहजी तरी पाहण्यात आल्या नाहीत. परंतु, येत्या काळात मराठी माध्यमेही या आणि अशा मूक समस्यांची दखल घेतील, अशी अपेक्षा ठेवणे, इतकेच सध्या आपल्या हातात आहे.

- पूर्वप्रसिद्धी 'महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्र, खंड ४ अंक ४, क्र. १५ (ऑक्टोबर २०२३)'
संपूर्ण अंक (विनामूल्य) हवा असल्यास संपर्क - marathipaupdate@gmail.com

Comments