तंत्रज्ञान आणि संवर्धन

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे निसर्गातील जैविक, अजैविक घटकांविषयीची प्रचंड माहिती माणसाला मिळवता येऊ लागली आहे. प्रस्तुत अंकात अशा किमान तीन घटनांविषयीचे वृत्तांकन आले आहे; उपग्रहामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे भारताच्या ३३.६% किनाऱ्याची सातत्याने धूप होत असल्याचे दिसून आले आहे; भारतातील इंडियन पेनिन्सुलर वुल्फ अर्थात लांडग्यांची संख्या व लांडग्यांसाठी योग्य, उपलब्ध अधिवासाचा माव किती आहे हे शोधण्याकरता तंत्रज्ञानाचा उपयोग झाला आहे; आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर वीणीसाठी येणाऱ्या समुद्री कासवांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी उपग्रहाधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ह्या तिन्ही प्रकरणांमध्ये तंत्रज्ञानाची मदत घेतल्यामुळे एरवी मिळवता आली नसती अशी माहिती माणसाला मिळाली आहे.

तंत्रज्ञान हाताशी असल्याने आता वन्य प्राण्याची गणना करून त्याची जवळजवळ नेमकी संख्या निश्चित सांगता येणे शक्य झाले आहे. वाघ, सिंह, हत्ती, बिबटे, समुद्री कासवे अशा मोठ्या प्राण्यांसह इतर लहानसहान उभयचर, सरपटणारे प्राणी, स्थानिक व स्थलांतरीत पक्षी ह्यांचीही गणना करता येते. विविध गटातील प्राण्यांच्या हालचालींचा दीर्घकाळ आणि हजारो किलोमीटर अंतरापर्यंतसुद्धा मागोवा घेणे शक्य झाले आहे; उदा. ऑलिव रिडले कासवे किंवा अमूर फाल्कन नामक पक्ष्याच्या स्थलांतराच्या मार्गाचा अभ्यास. ठराविक प्रकारच्या अधिवासाची उपलब्धता, व्याप्तीचे क्षेत्र शोधून काढता येऊ लागले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून एखादा प्राणी नेमका कुठून कुठे चालला आहे हे अचूक सांगता येते. एका संरक्षित क्षेत्रापासून दुसऱ्या संरक्षित क्षेत्रापर्यंत चालत जाणाऱ्या वाघांबाबत वृत्तांकन महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्रात अधूनमधून येत असते.

तेव्हा, माणसाकडे वन्यजीवांविषयी भरपूर माहिती आहे. तरीदेखील, निसर्ग अभ्यासक, संशोधकांच्या मते आपल्याकडे असलेली माहिती – केवळ वाघाविषयीचीच नव्हे; तर एकूणच निसर्गाविषयीची – पुरेशी नाही. आणखी अभ्यास, संशोधनातून माहिती गोळा करणे गरजेचे आहे. हे खरेच. कारण, नैसर्गिक प्रक्रिया क्लिष्ट, गुंतागुंतीच्या असतात; एका ठिकाणी एखादी प्रजाती अशी वागली म्हणून ती दुसऱ्या ठिकाणी तशीच वागत असेल, असे खात्रीने सांगता येत नाही. वन्यजीव संवर्धनासाठी सर्वत्र सारख्याच उपाययोजना लागू होत नाहीत. त्यामुळे आणखी अभ्यास-संशोधनाची गरज आहे. पण त्याबरोबरच, प्रश्न असा आहे की हाती आलेल्या माहितीचा म्हणून संवर्धनासाठी आपण कसा उपयोग करून घेतो?

एकीकडे समुद्री कासवाच्या वीणीसाठी किनाऱ्यावर परतून येण्याच्या सवयीचा पुरावा मिळाला म्हणून आपण आनंदून जातो. मात्र, त्याचवेळी, भारतीय किनाऱ्याच्या होत असलेल्या क्षरणाचा समुद्री कासवांच्या सवयीवर प्रभाव पडणार आहे, हे आपण लक्षात घेतो का? लांडग्यांचीही गणना झाली ह्याविषयी समाधान वाटून घेताना ह्या प्राण्याच्या अस्तित्त्वाला असलेला धोकाही वाघाच्या अस्तित्त्वाला असलेल्या धोक्याइतकाच गंभीर आहे, हे आपण लक्षात घेतो का?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वन्य प्राण्यांबाबत निर्माण झालेल्या जवळपास प्रत्येक समस्येचे मूळ माणूसच – मग तो अभ्यासक, संशोधक, अधिकारी किंवा निव्वळ सामान्य माणूस असो – आहे, हे आपण लक्षात घेतले आहे का?

कुतूहलशमनासाठी विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती साधून प्रश्नांची उत्तरे मिळवणे हा मनुष्यस्वभाव आहे. मात्र, संवर्धनासाठी वापरले तरीही तंत्रज्ञानाची पर्यावरणीय किंमत मोजावी लागतेच. तेव्हा त्याआधारे माहिती मिळवताना, संवर्धन खरोखरीच होते आहे का हा प्रश्न आपण लक्षात घेतो का?

- महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्र, एप्रिल २०२२

Comments