महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्र

महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्र या वन्यजीवविषयक त्रैमासिक बातमीपत्राची संकल्पना पीए अपडेट अर्थात प्रोटेक्टेड एरिआ अपडेट या इंग्रजी द्वैमासिक बातमीपत्रावर आधारलेली आहे. कल्पवृक्ष ही बिगर-सरकारी संस्था गेली २८ वर्षे सातत्याने पी.ए. अपडेट प्रकाशित करत आहे. हे  त्रैमासिकही कल्पवृक्षच्या पुढाकाराने सुरू आहे.

प्रोटेक्टेड एरिआज् म्हणजे १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अधिसूचित केलेली संरक्षित क्षेत्रे; त्यामध्ये वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प,संवर्धन राखीव क्षेत्रे, लोकसमूहाची राखीव क्षेत्रे यांचा समावेश होतो. भारतीय उपखंडातील संरक्षित क्षेत्रांशी संबधित घटना जसे की या क्षेत्रांची निर्मिती किंवा पुनर्रचना, त्यांच्या संरक्षण, संवर्धनात येणाऱ्या अडीअडचणी, आव्हाने, या क्षेत्रांवर बरेवाईट परिणाम करू शकतील असे धोरणात्मक निर्णय, वन्यजीवविषयक अभ्यास, संशोधन याविषयी प्रामुख्याने इंग्रजीतील काही दैनिकांत (अलीकडे त्यांच्या संकेतस्थळांवर) प्रकाशित झालेल्या निवडक बातम्यांचे संकलन व त्यांवर संपादनाचे सोपस्कार करून प्रत्येक बातमीच्या मूळ प्रकाशनाचा स्रोत देऊन त्या पीए अपडेटमध्ये दिल्या जातात.

वन्यजीवविषयक अभ्यासक, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी, वनाधिकारी व कर्मचारी आणि पर्यावरण, वन्यजीव व आदिवासी-हित विषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांचा पीए अपडेटच्या वाचकवर्गात समावेश आहे.

पीए अपडेट इंग्रजी भाषेत असल्यामुळे त्याला इतर प्रादेशिक भाषकांपर्यंत, विशेषतः भारतातील संरक्षित क्षेत्रांजवळ राहणाऱ्या वाचकांपर्यंत पोहोचण्यातभाषेची मर्यादा आड येते. संरक्षित क्षेत्रांच्या परिसरात, जवळपास राहणारे बहुसंख्य लोक हे प्रादेशिक भाषक आहेत. संरक्षित क्षेत्रांमध्ये दररोज फिरून काम करणारा वन विभागाचा बहुसंख्य कर्मचारी वर्ग हा प्रादेशिक भाषक आहे. आजच्या सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीवर संरक्षित क्षेत्रांचे महत्त्व, त्यांच्या समोरील आव्हाने संरक्षित क्षेत्रांशी थेट व जवळून संबंधित असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रादेशिक भाषांना पर्याय नाही. या जाणिवेतून महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्रांशी संबंधित बातम्यांचे पी.ए. अपडेटसारखे बातमीपत्र मराठी भाषेत प्रकाशित करण्याचेकल्पवृक्षने ठरवले आहे.

मराठी व इंग्रजी वृत्तपत्रे, नियतकालिके यामध्ये प्रकाशित झालेल्या महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्रांशी संबंधित निवडक बातम्या संकलन, संपादन करून महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्रात दिल्या जाणार आहेत. प्रत्येक बातमीबरोबर तिच्या मूळ प्रकाशनाचा स्रोत त्यात दिला जाणार आहे.

पीए अपडेट आणि प्रस्तुत मराठी बातमीपत्र ही दोन्ही परिपूर्ण नाहीत, याची आम्हाला जाणीव आहे. खेरीज, एकदा प्रकाशित झालेल्या बातम्या पुन्हा देण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न वाचकांना पडू शकतो.या बातमीपत्रांचा हेतू असा की वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्रातील घडामोडींविषयी बातम्या एकत्र पाहण्याचा पर्याय उपलब्ध असावा. तसेच, इंग्रजीतील बातमीपत्र जवळपास दोन दशके सातत्याने प्रकाशित होत असल्यामुळे या काळात इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये संरक्षित क्षेत्रांविषयीचे वृत्तांकन कसे होते, त्यात काही बदल झाले का याचे दस्तावेजीकरण आपोआपच या बातमीपत्राच्या रुपाने उपलब्ध झाले आहे. तसे, महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्रांविषयीच्या वृत्तांकनाचेही व्हावे, अशी अपेक्षा आहे. मुख्य म्हणजे, ही सुरुवात आहे. वन्यजीव संरक्षणाबाबत अशी बातमीपत्रे जास्तीत जास्त प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित झाली तर हवी आहेतच.

तेव्हा,महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्र’ कसे वाटले या विषयी तुमचा अभिप्राय, मते, सूचना आम्हाला जरूर कळवा. तुमच्या संपर्कातील विद्यार्थी, शिक्षक, वार्ताहर, पर्यावरण-वन्यजीव प्रेमी व या विषयात रुची असणारे इतर वाचक, कार्यकर्ते, संरक्षित क्षेत्रांच्या परिसरातील विद्यार्थी, वाचक व इतर रहिवासी यांच्यापर्यंत हे बातमीपत्र पोहोचावे, असे तुम्हाला वाटत असेल तर त्या सर्वांचे ईमेल, पत्ते आणि संपर्क क्रमांक आम्हाला पाठवा. या वर्षातील चार अंक त्यांना पाठवण्याची व्यवस्था आम्ही करू. तसेच, तुम्ही स्वतः शिक्षक, पत्रकार, कार्यकर्ते असाल आणि जनजागृतीसाठी या बातमीपत्राचा उपयोग करण्याची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी तुमची योजना, तुम्हाला लागणाऱ्या प्रतींची संख्या आणि तुमचा पत्ता आम्हाला कळवा. त्या तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था आम्ही करू.

अधिक माहिती व संपर्कासाठीः

महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्र
c/o कल्पवृक्ष, अपार्टमेंट ५, श्री दत्त कृपा,
९०८,डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४, महाराष्ट्र, भारत.
फॅक्सः ०२० २५६५४२३९.

ई-मेलःmarathipaupdate@gmail.com


Comments