काळ्या ढगाची रुपेरी किनार

महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्राच्या जानेवारी २०२१ च्या अंकातील संपादकीय वन्यजीवन- आतले अधिक बाहेरचेमध्ये मांडलेली संरक्षित क्षेत्रांबाहेरचे वन्यजीवन ही जागतिक पातळीवरील समस्या आहे. तीच बाब माणूस-वन्यप्राणी संघर्षाची. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशांमध्येच हा संघर्ष आहे, असे नव्हे; तर जगात सर्वत्र हा संघर्ष आहे. या समस्यांचा इथे पुन्हा उल्लेख करण्याचे कारण की डब्ल्यू. डब्ल्यू. एफ. ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत विभाग –यू. एन. ई. पी. यांनी एकत्र येऊन प्रकाशित केलेल्या अहवालात या बाबी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.
माणूस-वन्यजीव संघर्षात वरकरणी माणसाचे पारडे जड ठरत असले तरी वन्यजीवांचा विनाश हा अखेरीस माणसाच्या अस्तित्त्वावर उठणार हे निश्चित आहे. माणूस-वन्यजीव संघर्षाचे हे जगद्व्यापी चित्र जाणकार आणि संवेदनशील माणसांना निराशाजनक वाटते हे खरे. मात्र, निराशेच्या या मोठ्या ढगाला छोटीशी रुपेरी किनार आहे;ती इथे महाराष्ट्रातच यावेळी दिसून येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात माणूस-वाघ संघर्ष टीपेला पोहोचला असताना या जिल्ह्यातील एका वन विभागात संघर्ष आटोक्यात ठेवून त्यात माणूस आणि वाघ दोहोंचे बळी जाणार नाहीत, असे व्यवस्थापन एका उप वन संरक्षकांनीयशस्वी करून दाखवले आहे. मध्य चांदा वन विभागात वर्षभरापूर्वी उप वन संरक्षक म्हणून अरविंद मुंढे आले. तेव्हापासून त्यांनी विभागातील १६० अधिकारी, कर्मचारी आणि तीनेकशे गावांतील रहिवाशांना विश्वासात घेऊन माणूस-वाघ संघर्षावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली. या उपाययोजनांचा परिणाम म्हणूनमध्य चांदा वन विभागात यंदाच्या मोहफूल, तेंदूपत्ता वेचण्याच्या हंगामात वाघाच्या हल्ल्यात एकाही माणसाचा मृत्यू झाला नाही व वन्यप्राण्याच्या शिकारीची घटना घडली नाही. खेरीज, या हंगामात सर्वसाधारणपणे लागणारे किंवा लावले जाणारेवणवे, बेकायदाजंगलतोड, वन विभाग विरुद्ध ग्रामस्थ संघर्ष अशा एकाही घटनेची नोंद झालेली नाही.
दुसरी बातमी आहे ती उघड्या विहिरींमध्ये पडल्यामुळे होणारे वन्यप्राण्यांचे मृत्यू टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनेची.भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरीचे वन परिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी पुढाकार घेतला आणिसरकारी योजनांतर्गत दहा लाख रुपयांचा निधी मिळवून सुमारे ३९ विहिरींना कठडे बांधले. परिणामी, २०१९-२० या कालावधीत या विहिरींवर कठडे बांधून झाले, तेव्हापासून आजतागायत या परिसरात वन्यप्राणी विहिरीत पडल्याची एकही घटना घडलेली नाही.
तिसरी बातमी आहे ती साध्या, सोप्या पण खूप महत्त्वाच्या संशोधनाविषयीची. वीजेच्या तारांमुळे केली जाणारी वन्यप्राण्यांची शिकार, होणारे मृत्यू टाळता यावेत, यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जिवंत विद्युतप्रवाह शोधण्यासाठी एक उपकरण तयार केले. त्याचा महाराष्ट्रातील पाच व्याघ्र प्रकल्पांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी वन विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीने शेतमळ्यात सहज उपलब्ध असलेले साहित्य वापरून मोठा आवाज करणारी कार्बाईड गन तयार केली आहे. तूर्तास बिबट्याला पळवून लावण्यासाठी तिचा उपयोग होत आहे.
उपलब्ध पर्याय आणि साधनसंपत्तीला इच्छाशक्तीची जोड देत उपरोक्त घटनांमध्ये तीन ठिकाणी वनाधिकाऱ्यांनी आपापल्या अधिकारांत बदल घडवून आणला; तर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कौशल्याच्या आधारे व्यावहारिक पातळीवर संवर्धनासाठी उपयुक्त ठरेल असे संशोधन यशस्वी केले.
धोरणात्मक बदल – कधी बरे कधी वाईट - एकीकडे होत राहतील. मात्र, आहे त्या चौकटीत, उपलब्ध साधनसंपत्तीचा, आपापल्या अधिकारांचा – मग ते मर्यादित का असेना – वापर करून समाजातील सर्व स्तरांतील भागीदारांना एकत्र आणून व्यावहारिक उपाय शोधणे, त्यांची अंमलबजावणी करणे, अंमलबजावणीदरम्यान लक्षात आलेल्या चुकांमधून शिकत पुढे जाणे, हेच तर नेमके माणूस-वन्यजीव संघर्षावर उपाययोजना करण्यासाठी अपेक्षित आहे.
- पूर्वप्रसिद्धी महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्र खंड २, अंक ३, जुलै २०२१ (क्र. ६)

Comments

  1. महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्राचा अंक ई-मेल किंवा पोस्टाने छापील प्रत हवी असल्यास संपर्क - marathipaupdate@gmail.com

    ReplyDelete

Post a Comment