भरपूर बातम्या... अरे बापरे! उत्तरार्ध

भरपूर बातम्या... अरे बापरे! या पोस्टनंतर सहकारी आणि मित्रमैत्रिणींशी झालेल्या चर्चेचे फलित म्हणून महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्रातील बातम्यांचे त्रैमासिक प्रकाशित करण्याचे ठरले.  Protected Area Update प्रकाशित करणाऱ्या कल्पवृक्ष या संस्थेच्या पुढाकाराने हे त्रैमासिकही प्रकाशित केले जाणार आहे.
या नव्या बातमीपत्राविषयी...

संरक्षित क्षेत्र वार्तापत्र या वन्यजीवविषयक त्रैमासिक बातमीपत्राची संकल्पना पी.. अपडेट अर्थात प्रोटेक्टेड एरिआ अपडेट या इंग्रजी द्वैमासिक बातमीपत्रावर आधारलेली आहे. कल्पवृक्ष ही बिगर-सरकारी संस्था गेली २५ वर्षे सातत्याने पी.. अपडेट प्रकाशित करत आहे. हे नवे त्रैमासिकही कल्पवृक्षच्या पुढाकाराने सुरू होत आहे.
पी.. अपडेटची सुरुवात १९९४ मध्ये जे.पी..एम. अपडेट अर्थात जॉइंट प्रोटेक्टेड एरिया मॅनेजमेंट अपडेट या नावाने झाली. त्या वर्षी झालेल्या लोकसहभागातून संरक्षित क्षेत्रांचे व्यवस्थापन विषयक एका राष्ट्रीय कार्यशाळेचा अनुभव हा कल्पवृक्षला जे.पी..एम. अपडेट सुरू करण्यासाठी प्रेरणादायी ठरला.
प्रोटेक्टेड एरिआज् म्हणजे १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अधिसूचित केलेली संरक्षित क्षेत्रे. लोकसहभागाने त्यांच्या व्यवस्थापनाबाबत माहिती, ज्यात बातम्यांचाही समावेश असेल, असा मजकूर जे.पी..एम. अपडेटमध्ये असावा, असे ठरले. मात्र, मिळणाऱ्या बहुतांशी बातम्यांचे स्वरूप आणि काही वाचकांचे अभिप्राय, सूचना लक्षात घेऊन १९९९ पासून त्याचे नाव बदलून प्रोटेक्टेड एरिआ अपडेट असे काहीसे व्यापक करण्यात आले.
संरक्षित क्षेत्रे म्हणजे वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, हत्ती प्रकल्प, राखीव वा संरक्षित जंगल  इत्यादी. भारतीय उपखंडातील संरक्षित क्षेत्रांशी संबधित घटना जसे की या क्षेत्रांची निर्मिती किंवा पुनर्रचना, त्यांच्या संरक्षण, संवर्धनात येणाऱ्या अडीअडचणी, आव्हाने, या क्षेत्रांवर बरेवाईट परिणाम करू शकतील असे धोरणात्मक निर्णय, वन्यजीवविषयक अभ्यास, संशोधन याविषयी प्रामुख्याने इंग्रजीतील काही दैनिकांत (अलीकडे मुख्यतः त्यांच्या संकेतस्थळांवर) प्रकाशित झालेल्या निवडक बातम्यांचे संकलन त्यांवर संपादनाचे सोपस्कार करून प्रत्येक बातमीच्या मूळ प्रकाशनाचा स्रोत देऊन त्या पी.. अपडेटमध्ये दिल्या जातात.
वन्यजीवविषयक अभ्यासक, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी, वनाधिकारी कर्मचारी आणि पर्यावरण आदिवासी-हित विषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांचा पी.. अपडेटच्या वाचकवर्गात समावेश आहे.
पी.. अपडेट इंग्रजी भाषेत असल्यामुळे त्याला मर्यादा आहेत. संरक्षित क्षेत्रांच्या परिसरात, जवळपास राहणारे बहुसंख्य लोक हे प्रादेशिक भाषक आहेत. संरक्षित क्षेत्रांमध्ये दररोज फिरून काम करणारा वन विभागाचा बहुसंख्य कर्मचारी वर्ग हा प्रादेशिक भाषक आहे. आजच्या सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीवर संरक्षित क्षेत्रांचे महत्त्व, त्यांच्या समोरील आव्हाने संरक्षित क्षेत्रांशी थेट जवळून संबंधित असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रादेशिक भाषांना पर्याय नाही. या जाणिवेतून महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्रांशी संबंधित बातम्यांचे पी.. अपडेटसारखे बातमीपत्र मराठी भाषेत प्रकाशित करण्याचे ठरले आहे. मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्रांशी संबंधित बातम्या इंग्रजी पी.. अपडेटमधील महाराष्ट्राशी संबंधित निवडक बातम्या संकलन, संपादन करून संरक्षित क्षेत्र वार्तापत्र या त्रैमासिकात दिल्या जाणार आहेत. प्रत्येक बातमीबरोबर तिच्या मूळ प्रकाशनाचा स्रोत त्यात दिला जाणार आहे.
पी.. अपडेट आणि प्रस्तुत मराठी बातमीपत्र ही दोन्ही परिपूर्ण नाहीत, याची आम्हाला जाणीव आहे. खेरीज, एकदा प्रकाशित झालेल्या बातम्या पुन्हा देण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न तुम्हाला पडणेही अपेक्षित आहे. या बातमीपत्रांचा हेतू असा की वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्रातील घडामोडींविषयी बातम्या एकत्र पाहण्याचा पर्याय उपलब्ध असावा. तसेच, इंग्रजीतील बातमीपत्र जवळपास दोन दशके सातत्याने प्रकाशित होत असल्यामुळे या काळात इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये संरक्षित क्षेत्रांविषयीचे वृत्तांकन कसे होते, त्यात काही बदल झाले का याचे दस्तावेजीकरण आपोआपच या बातमीपत्राच्या रुपाने उपलब्ध झाले आहे. तसे, मराठीतील वृत्तांकनाचेही व्हावे, अशी अपेक्षा आहे. मुख्य म्हणजे, ही सुरुवात आहे. वन्यजीव संरक्षणाबाबत अशी बातमीपत्रे जास्तीत जास्त प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित झाली तर हवी आहेतच.
तेव्हा, तुमच्या संपर्कातील विद्यार्थी, शिक्षक, वार्ताहर, पर्यावरण-वन्यजीव प्रेमी या विषयात रुची असणारे इतर वाचक, कार्यकर्ते यांच्यापर्यंत हे बातमीपत्र पोहोचावे, असे तुम्हाला वाटत असेल; तर त्या सर्वांचे ईमेल, पत्ते आणि संपर्क क्रमांक आम्हाला पाठवा. या वर्षातील चार अंक त्यांना पाठवण्याची व्यवस्था आम्ही करू. तसेच, तुम्ही स्वतः शिक्षक, पत्रकार, कार्यकर्ते असाल आणि तुमच्या कामाच्या निमित्ताने संरक्षित क्षेत्रांच्या परिसरातील विद्यार्थी, वाचक इतर रहिवाशांच्या संपर्कात असाल, त्यांच्यापर्यंत हे बातमीपत्र नेण्यास, जनजागृतीसाठी त्याचा वापर करण्याची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी तुमची योजना, तुम्हाला लागणाऱ्या प्रतींची संख्या आणि अर्थातच तुमचा पत्ता आम्हाला कळवा. त्या तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था आम्ही करू.
अधिक माहितीसाठीः
संरक्षित क्षेत्र वार्तापत्र,  C/o कल्पवृक्ष, अपार्टमेंट , श्री दत्त कृपा, ९०८, डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४, महाराष्ट्र, भारत. फॅक्सः ०२० २५६५४२३९-मेलःmarathipaupdate@gmail.com

Comments