निसर्गात वनस्पती महत्त्वाची भूमिका बजावतात.
प्रत्येक वनस्पतीवर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक सजीव अन्न व आसऱ्यासाठी अवलंबून असतात.
वनस्पतींची विविधता जेवढी जास्त तेवढा त्यांच्यावर अवलंबून जगणाऱ्या सजीवांमध्ये वैविध्य
निर्माण होण्याला अधिक वाव असतो. एखाद्या परिसरात वनस्पतींमधील वैविध्य कमी झाले; तर
त्याचा परिणाम म्हणून त्या परिसरातील प्राणी-पक्षी, कीटक आदींचे वैविध्यही कमी
होते. विविधतेच्या अशा ऱ्हासाचा परिणाम माणसाच्या जगण्यावरही दिसून येतो; कारण
गुहेत राहणाऱ्या आदिमानवाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारे सिमेंट-कॉन्क्रीटची मोठी शहरे
वसविण्यापर्यंतचा टप्पा गाठला असला; तरी अन्न-वस्त्र-निवारा या प्राथमिक गरजांसह
औषधे व दैनंदिन वापराच्या इतर अनेकविध वस्तूंसाठी माणूस कायमच वनस्पतींवर अवलंबून
राहिला आहे. तेव्हा, वनस्पतींमधील विविधता टिकविणे हे निसर्गाच्याच नव्हे; तर
माणसाच्या दीर्घकालीन हितासाठी गरजेचे आहे.
विविधता टिकविण्याकरिता त्या विविधतेची
आपल्याला ओळख असायला हवी. कोकणात सहज आढळणाऱ्या
चार झाडांची आज आपण ओळख करून घेऊ. काही जाणत्या वाचकांच्या ती परिचयाची असतीलही,
पण जगण्याच्या धबडग्यात त्यांचा विसर पडला असेल; तर तेवढीच उजळणी!
‘बायनॉमिअल सिस्टिम’ किंवा ‘द्विनामपद्धती’नुसार
वनस्पतींना शास्त्रीय नावे दिली जातात. यातील पहिले नाव हे प्रजातीचे; तर दुसरे
नाव हे त्या वनस्पतीचे खास वैशिष्ट्य सांगणारे जातिनाम असते. एकाच वनस्पतीला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी नावे
असतात. त्यामुळे वनस्पतींविषयी माहितीची देवाणघेवाण करताना भाषेची अडचण येऊ नये
म्हणून शास्त्रीय नावे देण्याची पद्धत आहे. या लेखात वनस्पतिशास्त्रज्ञांनी
लिहिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांतील निवडक माहिती व कोकणात फिरताना स्थानिक लोकांनी
दिलेली पारंपरिक माहिती याबरोबरच झाडाचे वनस्पतिशास्त्रीय नावही देत आहे.
आईन
कोकणात सर्वत्र सहज दिसून येणारा वृक्ष म्हणजे आईन. याच्या वैशिष्ट्यपूर्ण सुसरीच्या पाठीसारख्या खरबरीत खोडामुळे हा वृक्ष नेमका ओळखता येतो. याची पाने लंबवर्तुळाकार, चिवट, जाड असतात. पानाच्या जमिनीकडे असलेल्या बाजूवर देठाच्या जवळ दोन ग्रंथी असतात. हा पानगळी वृक्ष आहे. हिवाळ्यात याची पाने गळून जातात; मग उन्हाळ्यात नवी पालवी फुटते. मात्र, लावणीसाठी पावसाळ्यापूर्वी शेत तयार करताना राब जाळतात, त्याकरिता आईनाची पाने वापरतात. त्यामुळे, कोकणातील भातखाचरांच्या आजूबाजूला असलेली आईनाची झाडे दरवर्षी उन्हाळा सरता सरता पाने छाटल्यामुळे बोडकी झालेली दिसतात.
मात्र, छान वाढलेला मोठा वृक्ष असेल; तर
पावसाळ्याअखेरीस त्याला हिरवी फळे येतात. फळाला पाच पातळ पंख असतात, आत एक बी
असते. वाळलेले फळ तपकिरी रंगाचे असते. ते वजनाला हलके असते; जेणेकरून, वाऱ्यामार्फत
बीजप्रसार व्हावा.
आईनाचे वनस्पतिशास्त्रीय नाव ‘टर्मिनालिया एलिप्टिका’
असे आहे. या झाडाची फुले फांदीच्या टोकाशी येतात म्हणून ‘टर्मिनालिया’; तर पाने
लंबवर्तुळाकार असतात म्हणून ‘एलिप्टिका’.
कुंभा


कुंभाला वनस्पतिशास्त्रात ‘कॅरेया अर्बोरिआ’
असे नाव आहे. कॅरे नावाच्या वनस्पतिशास्त्रज्ञाच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘कॅरेया’ असे
प्रजातीनाम दिले आहे; तर ‘अर्बोरिआ’ म्हणजे वृक्ष.
पूर्वी मासेमार तागाची किंवा सुती जाळी घरीच
विणत. ते जाळे ताठ राहावे व टिकाऊ व्हावे यासाठी त्याला ‘कसं’ करावे लागत असे. ही
प्रक्रिया करण्यासाठी आईनाची किंवा कुंभाची साल वापरीत. या खेरीज या दोन्ही झाडांचे
लाकूड व इतर भागही वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त आहेत.
उंडी

उंडीची पाने मोठी, जाड, चकचकीत व हिरवीगार
असतात. पानावर देठापासून ते पानाच्या शेवटपर्यंत गेलेली मध्यशिर असते आणि तीपासून
निघणाऱ्या बारीकबारीक, एकमेकीला समांतर अशा अनेक उपशिरा असतात. हा सदाहरित वृक्ष
आहे; पानगळीचा नव्हे. हिवाळ्यात याला पांढरी, सुवासिक फुले येतात.
उंडीचे शास्त्रीय नाव ‘कॅलोफायलम इनोफायलम’
असे आहे. ‘कॅलोफायलम’ म्हणजे सुंदर पाने असलेला; तर ‘इनोफायलम’ म्हणजे ज्याच्या
पानांवरील शिरा सुस्पष्ट आहेत असा.
भेरली माड


आपल्या ओळखीच्या नारळी-पोफळीचा भाऊबंद असलेले भेरली माड किंवा सूरमाडाचे झाड किनारपट्टीपासून ते उंच डोंगरावरील भागात सर्वत्र निसर्गतः वाढते, हे याचे वैशिष्ट्य. सह्याद्रीच्या उतारावरील दाट जंगलात मधूनच सर्व झाडांच्या वर उंच वाढलेला भेरली माडाचा शेंडा हे कोकणात सहज आढळणारे दृश्य. लहानमोठ्या त्रिकोणी पर्णिकांचे मिळून भेरली माडाचे एक पान बनलेले असते. प्रत्येक त्रिकोणी पर्णिकेचा पाया कातरल्यासारखा दिसतो; जणू माशाची शेपटीच! म्हणूनच या झाडाला इंग्रजीमध्ये ‘फिश टेल पाम’ असे नाव आहे. पानांखाली खोडालगत हिरव्या-पिवळ्या मण्यांच्या भरपूर माळा एकत्र धरल्यासारखा भेरली माडाचा फुलोरा दिसतो. लहान, गोलाकार फळांच्या आतील बियांपासून बटणे-गुंड्या, मणी तयार करतात.
भेरली माडापासून नीरा व त्यापासून मग माडी
बनवितात. कांडेचोर किंवा काळींदर या नावाने ओळखला जाणारा ‘स्मॉल इंडियन सिवेट’ हा
निशाचर प्राणी सूरमाडावर चढून नीरा काढण्यासाठी लावलेल्या मडक्यातून नीरा पिताना
आढळत असल्याचे कोकणातील लोकांचे निरीक्षण आहे. या झाडाच्या खोडापासून मिळणाऱ्या
पिठुळ पदार्थाची भाकरी किंवा खीर बनवून खातात.
भेरली माडाचे वनस्पतिशास्त्रीय नाव आहे ‘कॅरियोटा
युरेन्स’. ‘कॅरिओ’ याचा अर्थ जंगली खजुराची एक जात ज्यापासून मद्य मिळते; तर ‘युरेन्स’
म्हणजे दाहक. सूरमाडाचे फळ चाखल्यास अंगाचा दाह होतो.
शब्दमर्यादेमुळे या झाडांविषयी सगळी माहिती देता
आलेली नाही. खेरीज, वेगवेगळ्या भागातील जाणकार मंडळींशी गप्पा मारल्या म्हणजे या
माहितीत भर पडते, असा अनुभव आहे. तुम्ही प्रयत्न करून पाहा; तुम्हालाही हे अनुभवास
येईल!
(रविवार, दिनांक २५ जानेवारी २०१५ रोजी 'कृषीवल'मध्ये प्रकाशित)
Nice reshma ji
ReplyDeleteसरु वृक्षांची माहिती पाहिजे
ReplyDeleteBhokran
ReplyDeleteधन्यवाद...
ReplyDelete