निसर्गवाचन

निसर्ग म्हणजे अमर्याद विविधता आणि सतत बदल. ठिकठिकाणांमधील, प्राण्या-वनस्पतींमधील, प्रत्येक सजीवामधील वेगळेपण आणि यांतून निर्माण होणारी विविधता. या विविधतेला एकत्रित नांदता यावे यासाठी - म्हणजेच संतुलन राखण्यासाठी – वेगवेगळ्या क्रिया निसर्गात सातत्याने सुरू असतात. त्यातून निसर्ग सतत बदलत असतो. मात्र, निसर्गात होणारे बदल धक्कादायक नसतात. ते सातत्याने पण हळुवार होत असतात आणि म्हणून ते टिपण्यासाठी आपल्या संवेदना जागरूक असाव्या लागतात. त्या तशा असल्या म्हणजे मग ऋतूबदलाबरोबर आपल्या भोवताली असलेल्या वनस्पती फुलता-फळताना लक्षात येतात, पक्षी-प्राणी वेगळे वागताना दिसतात; प्रत्येक ऋतूत आपला परिसर वेगवेगळा दिसतो असे लक्षात येते. या बदलांप्रती आपण पुरेसे संवेदनशील असलो; तर आपले रोजचे जगणे छोट्याछोट्या आनंदांनी समृद्ध होते.

कोणे एके काळी माणूस निसर्गातील बदल टिपण्याबाबत फारच संवेदनशील असावा. अन्न, वस्त्र, निवारा मिळविण्याचे मुलभूत आव्हान त्याच्यासमोर होते. त्यामुळे ती संवेदनशीलता त्याला आपले अस्तित्त्व टिकविण्यासाठी आवश्यकच होती. निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करीत, बऱ्यावाईट म्हणता येतील अशा साध्यासोप्या अनुभवांपासून ते अगदी जीवघेण्या अनुभवांमधून शिकत, चुकतमाकत भटक्या जीवनशैलीपासून ते शेतीपर्यंतचा प्रवास त्याने केला. शेतीचा शोध लागल्यावर मुलभूत गरजांच्या पूर्ततेविषयी खात्री झाल्यावर माणसाच्या जगण्याला स्थैर्य आले. इथून पुढचा – आजच्या आधुनिक विकासापर्यंतचा टप्पा माणसाने वेगाने गाठला. माणूस स्थिर जीवन जगू लागला तसे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे माणसाने आपल्या ताकदीच्या मर्यादेवर मात केली आणि निसर्गाकडून तो ओरबाडून घेऊ लागला. निसर्गाप्रती त्याच्या संवेदनाही बोथट होत गेल्या.
दिवसेंदिवस माणसाचे जगणे व पर्यायाने त्याची मानसिकता अशी काही बदलली की त्याचे आनंद पैशांनी विकत घेता येण्याच्या क्षमतेशी निगडीत झाले. निसर्गातील विविधता व बदलांमुळे मिळणाऱ्या साध्या-छोट्या आनंदांचे मोल त्याला वाटेनासे झाले. अशा छोट्या आनंदांच्या आठवणी काढून हळहळणारी आज तिशीच्या घरात असलेली पिढी ही बहुदा भारतातील शेवटचीच पिढी. गेल्या दोन दशकांमध्ये जन्माला आलेल्या मुलांना हे आनंद ठाऊकही नाहीत, अनुभव तर दूरच!
आजही जगताना विविधता व बदल हवाहवासा वाटतो तेव्हा तो मिळविण्यासाठी माणूस अंतःप्रेरणेने निसर्गाकडे धाव घेताना दिसतो. मात्र, अनेक वेळा असे लक्षात येते की प्रवासात, निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावरही लोक निसर्गातील आनंद टिपण्याऐवजी माणसानेच निर्माण केलेल्या साधनांमध्ये – रेडिओ, टी.व्ही., कॅमेरा, स्मार्ट फोन इ. – अडकून राहिलेले दिसतात. साधेसोपे आनंद अनुभवण्याच्या क्षमतांचा आधुनिक माणसाला विसरच पडला आहे. या क्षमता नव्याने विकसित करावयाच्या; तर निसर्गवाचनाची सवय नव्याने करून घ्यायला हवी. याची सुरुवात आपल्या परिचयाच्या असलेल्या निसर्गातील छोट्या आनंदांच्या उजळणीने करता येईल.
आपल्या येण्याजाण्याच्या वाटेवरील ओळखीचे झाड फुललेले पाहून होणारा आणखी एक आनंद. जून महिना उजाडला की कधी एकदा येतो अशी वाट पाहता पाहता येणारा पहिला पाऊस, तोच पाऊस पावसाळ्याअखेरीस नकोसा होतो, पण मग त्या पाठोपाठ ऑक्टोबरचा उन्हाळा आणि थंडी येतेच. या प्रत्येक ऋतूबदलाची वर्दी घेऊन येणारे वेगवेगळे पक्षी, निसर्गात सर्व काही आलबेल सुरु असल्याचा प्रत्यय म्हणून ठराविक काळात फुलणाऱ्या वनस्पती आपल्या परिचयाच्या असतात. त्यांचा विसर पडला असेल; तर थोडा ताण द्या स्मरणशक्तीला, नक्की आठवेल.
या साध्यासुध्या आनंदांतील एक महत्त्वाचा आनंद आपल्या प्राथमिक गरजांच्या पूर्ततेशी निगडीत असतो. निसर्गातून थेट अन्न मिळविण्यासाठी पारंपरिक कौशल्य, सराव लागतो. पण, थेट अन्न रुपाने अन्न मिळविता आले; तर त्यातून प्राथमिक स्वरुपाचा – primitive म्हणतात तो आनंद मिळत असावा. घराजवळील खाडीत मासेमारी करून एकवेळच्या कालवणापुरते मासे मिळविता आले म्हणजे होणारा आनंद, तसेच आपल्या बाल्कनीत कुंडीत लावलेला कढीलिंब किंवा परसबागेत उगवलेला अळू स्वयंपाकात वापरताना मनाचा एक कोपरा खास सुखावतो; हे त्या प्राथमिक स्वरुपाच्या आनंदाचेच प्रकार.
अनेकांच्या सहज लक्षात येत नसले तरी; नैसर्गिक विविधतेचा आपल्या रोजच्या आहाराशी थेट संबंध आहे. धान्य, भाज्या, फळे, मांस-मासे यांचे नानाविध प्रकार, झालेच तर; ऋतूमानानुसार अवतीभवतीच्या निसर्गातून थेट मिळणाऱ्या रानभाज्या, फळे, कंदमुळे म्हणजे निसर्गातील विविधताच की! त्या त्या ऋतूची खास चव अनुभवावयास मिळाली म्हणजे होणारा आनंद खासच.
...आणि आता एक गंभीर बातमी; ही जाणून घेतल्याने आपला निसर्गवाचनाचा निश्चय दृढ होण्यास मदतच होईल म्हणून इथे देत आहे.
विक्रमी तापमानवाढ, पावसाची कमी-जास्त तीव्रता, दुष्काळ अशा शतकभरातून एखाद वेळेस उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती नजीकच्या भविष्यात वारंवार घडतील आणि लक्षावधी लोकांच्या उपजीविकेच्या साधनांवर त्यांचे दुष्परिणाम दिसून येतील, हा इशारा जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या एका शास्त्रीय अभ्यासाने दिला आहे.
त्याचवेळी भारतातील ‘सेंटर फॉर सायन्स एन्ड एन्वोयर्न्मेंट’ या संस्थेने अशाच स्वरुपाची महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविली आहेत; त्यानुसार वर्ष २०१४ हे आजवरच्या माणसाच्या इतिहासात सगळ्यात उष्ण वर्ष ठरले आहे; तर २००१ ते २०१० या दशकाची भारतासाठी उष्ण दशक ठरले आहे. जगभरातील ३३ टक्के गरीब जनता भारतात राहते. ही लोकसंख्या उपजीविकेसाठी शेती, वनोपज, मासळी आणि पशुपालनावर अवलंबून आहे. या सर्व साधनांपासून मिळणाऱ्या उत्पादनांचे प्रमाण सामान्य परिस्थतीतही निसर्गाच्या मर्जीनुसार कमी-जास्त होत राहिले आहे. तेव्हा, हवामान-पर्यावरणातील मोठ्या बदलांचे दुष्परिणाम या साधनांवर आणि पर्यायाने त्यावर अवलंबून लोकसंख्येच्या उपजीविकेवर दिसून येणार, असा इशाराही या संस्थेने अलीकडे प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात दिला आहे.
निसर्गातील बदलांविषयी अलीकडे वाचनात येणाऱ्या बातम्या या बहुदा निसर्गातील समस्यांविषयी असतात. त्या समस्या समजून, त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत, हे खरे; मात्र हे काम फक्त सरकारचे किंवा पर्यावरणतज्ञांचे आहे असे नव्हे. या कामात तुम्हीआम्ही आपापला खारीचा वाटा नक्की उचलू शकतो आणि हे निसर्गवाचन ही त्याची आनंददायी सुरुवात ठरावी!

(रविवार, दिनांक ११ जानेवारी २०१५ रोजी 'कृषीवल'मध्ये प्रकाशित)

Comments