Wednesday, December 14, 2016

हिरवी अक्षरे १२: अंदमान निकोबार द्वीपसमूहाची व्यथा

अंदमान निकोबार म्हटले की स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील काळ्या पाण्याची शिक्षा आठवते किंवा मग निसर्गरम्य पर्यटनस्थळ अशी ओळख आठवते. या पलिकडे या बेटांबाबत आपल्याला फारशी माहिती नसते.

अंदमान आणि निकोबार हा बंगालच्या उपसागरातील सगळ्यात मोठा द्वीपसमूह आहे. द्वीपसमूह म्हणजे अनेक लहानमोठ्या बेटांचा समूह. भारताच्या मुख्य भूमीपासून १,००० किलोमीटर अंतरावर असलेल्या अंदमान निकोबार द्वीपसमूहात ३०६ बेटे आणि २०६ खडक व खडकाळ पठारे आहेत. विषुववृत्ताजवळ असलेल्या या द्वीपसमूहावर वैशिष्ट्यपूर्ण विषुववृत्तीय हवामान आहे, वर्षावने आहेत, जैवविविधतेने समृद्ध असा हा प्रदेश आहे. मात्र, या सगळ्याच बेटा-पठारा-खडकांवर मानवी वस्ती नाही; तर अंदमान समूहातील ११ व निकोबार समूहातील १३ बेटा-पठारा-खडकांवर मानवी वस्ती आहे.

द्वीपसमूहावर आता आधुनिक माणूस वसला आहे. त्याची लोकसंख्या सातत्याने वाढते आहे; कित्येक शतके आधुनिक माणसाचे पाऊल न पडलेल्या अनेक ठिकाणी त्याने प्रवेश केला आहे. दुसरीकडे, या बेटांवर पूर्वापार वसलेले आदिवासी समूह इथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर पूर्णपणे अवलंबून जीवन जगत आहेत. महत्त्वाची बाब अशी की या आदिवासी समूहांची परिस्थिती भारताच्या मुख्य भूमीवरील आदिवासी समूहांच्या परिस्थितीपेक्षा खूप वेगळी आहे. मुख्य भूमीवरील आदिवासी समूह आधुनिक माणसाच्या, त्याने निर्माण केलेल्या अर्थव्यवस्थेच्या संपर्कात फार पूर्वीच आले आहेत. त्यांची जीवनशैली बऱ्याच प्रमाणात भोवतालच्या जंगलांवर थेट अवलंबून असली; तरी ती त्यांच्या मूळ जीवनशैलीइतकी पारंपरिक राहिलेली नाही. या उलट अंदमान निकोबारमधील आदिवासी समूह मात्र आजही पारंपरिक पद्धतीने जगतात. त्यांच्या सर्व गरजा भागविण्यासाठी ते पूर्णपणे त्यांच्या सभोवती असलेल्या निसर्गावर अवलंबून आहेत. जंगलात भटकून शिकार आणि वनोपज गोळा करून ते आपली उपजीविका करतात. अर्थव्यवस्थेशी तर नाहीच; पण यातील काही समूहांचा आधुनिक माणसाशीदेखील संपर्क आलेला नाही. किंबहुना, यातील ठराविक समूह आधुनिक माणसापासून आवर्जून दूर राहतात. त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या आपल्या प्रयत्नांना ते दाद देत नाहीत आणि त्यांच्या हद्दीत प्रवेशही करू देत नाहीत.

नैसर्गिक, सांस्कृतिक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण द्वीपसमूहावरील पर्यावरण, इथे नांदणाऱ्या आदिम जमाती आणि आधुनिक माणसाने त्यांच्यासमोर निर्माण केलेल्या गंभीर समस्या, इथल्या निसर्गाचा चालविलेला ऱ्हास या सगळ्याचा उहापोह पंकज सेखसरिया यांच्या ‘ट्रबल्ड आयलंड्स’ या पुस्तकात येतो. अंदमान निकोबार द्वीपसमूहावरील परिस्थितीचा अभ्यास करताना लेखकाने वेळोवेळी इंग्रजी नियतकालिकांमध्ये लिहिलेल्या लेखांचे संकलन असे या पुस्तकाचे स्वरुप आहे.

अंदमान निकोबार द्वीपसमूहाची वैशिष्ट्ये आणि तिथल्या अनेक समस्या, निसर्गसंवर्धनाच्या आव्हानांविषयी पुस्तकात विस्ताराने मांडणी केली आहे. पुस्तक इंग्रजीत असले; तरी भाषा सोपी आहे. ओघवत्या शैलीत सत्य घटनांची पेरणी करीत मुद्दे समजावून दिले आहेत.

द्वीपसमूहाविषयी थोडी माहिती, इथल्या जंगलतोडीच्या उद्योगाचा इतिहास यांची माहिती पहिल्या भागात येते. दुसऱ्या भागात द्वीपसमूहावरील आदिम समूहांविषयीचे लेख आहेत. त्यानंतर इथल्या निसर्गसंवर्धनासाठी सर्वोच्च न्यायालयात मागितलेली दाद व त्याविषयी अधिक माहिती दिली आहे. पर्यावरणशास्त्रीय समस्यांबाबत माहिती अखेरच्या भागात येते. रंगीत छायाचित्रांची पाने आहेत. याखेरीज, इतर संबंधित माहिती, आकडेवारी पुस्तकाच्या अखेरीस दिली आहे.

अंदमानमध्ये ब्रिटीशांनी आणि स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राबविलेली धोरणे ही कायमच आधुनिक अर्थव्यवस्थेला पूरक राहिली आहेत. त्यामुळे, भारताच्या मुख्य भूमीवर आहेत तशा पर्यावरणाच्या गंभीर समस्या या द्वीपसमूहावरदेखील निर्माण झालेल्या आहेत. इथल्या पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने मौल्यवान जैवविविधता नष्ट होत आहे; त्याचबरोबर जगण्यासाठी सर्वस्वी त्यावर अवलंबून आदिम समूहांच्या जीवनशैलीला; नव्हे त्यांच्या अस्तित्त्वालाच धोका निर्माण झाला आहे.

इथे लक्षात घ्यायला हवे की या आदिवासी समूहांना मुख्य प्रवाहात आणणे जवळपास अशक्य आहे. पूर्वापार आधुनिक माणसाशी संपर्कात नसल्याने या समूहांमध्ये नव्या जगातील अनेक रोगांना प्रतिकारशक्ती नाही. आधुनिक माणसाने तिथे वस्ती केल्यामुळे त्यांचा जो काही थोडाफार संपर्क त्याच्याबरोबर आला आहे, त्याचे त्या समूहावरील दुष्परिणाम वेळोवेळी दिसून येत आहेत. त्यांच्यात पसरलेल्या गोवर किंवा अशा एखाद्या साथीत त्यांची लोकसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यांच्याबरोबर त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, सभ्यता अस्तंगत होते आहे. जीवशास्त्राच्या दृष्टीने पहिले असता इथल्या निसर्गाच्या ऱ्हासामुळे वेगळ्या जनुकीय उत्क्रांतीच्या शक्यता कायमच्या नाहीशा होण्याची भीती आहे.

जैवविविधतेचा ऱ्हास आणि मनुष्यजातीचे कायमस्वरुपी नुकसान टाळायचे असेल; तर आताच पावले उचलायला हवीत. महत्त्वाची बाब अशी की त्यासाठी उपाययोजना या आधुनिक माणसाने म्हणजे तुम्हीआम्हीच केल्या पाहिजेत. कारण, आपलेच ‘जाति’बांधव (इथे जाति हा शब्द इंग्रजीतील स्पिशीज् या अर्थाने) संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांविषयी अनभिज्ञ असूनही एक पर्यावरणस्नेही जीवनशैली जगत आहेत. आधुनिक, सुसंस्कृत समाज म्हणून आपल्यापेक्षा वेगळ्या सभ्यतेचा आदर करण्याची, त्यांच्या जीवनशैलीला वाव देण्याची जबाबदारी आपली आहे. मात्र, आजवरचा इतिहास पाहता आपण त्यात अयशस्वी ठरलो आहोत, याची जाणीव हे पुस्तक करून देते.

No comments:

Post a Comment