Wednesday, December 14, 2016

हिरवी अक्षरे १३: सागरी कासवांचे संरक्षण-संवर्धन

दीर्घायुष्यी असली; तरी अंडी घालणे वगळता सागरी कासवांचे आयुष्य समुद्रातच जात असल्याने त्यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र, जी माहिती उपलब्ध आहे; ती रंजक आणि पुरेशी कुतूहलजनक आहे. जसे; कासवाची पिल्ले रात्रीच्या वेळी अंड्यातून बाहेर आली; तरी नेमकी समुद्राच्या दिशेने जातात. सागरी कासवे हजारो किलोमीटर पोहून जाऊ शकतात. सागरी कासवांनी एका दिवसात ८२ किलोमीटर अंतर कापल्याची नोंद आहे; तर ओदिशात खुणेचा बिल्ला लावून सोडलेली कासवे श्रीलंकेपर्यंत गेल्याची नोंद आहे आणि पुढेही जात असावीत, असा अंदाज आहे. मृत आणि आजारी मासे किंवा इतर जलचर खाऊन कासवे समुद्रसफाईचे काम करतात. काही कासवे निव्वळ पाणवनस्पती खाऊन गुजराण करत असल्याने या वनस्पतींच्या वाढीवर नियंत्रण राहते आणि निसर्गाचे संतुलन टिकून राहण्यास मदत होते. कासवांचे संरक्षण करण्याची गरज व्यक्त करणारी ही आणि अशी विविध कारणे, उपयुक्त माहिती ‘सह्याद्री निसर्गमित्र’ या संस्थेचे भाऊ काटदरे व राम मोने लिखित ‘सागरी कासवे संरक्षण – संवर्धन’ या पुस्तिकेत आहे.

समस्त कोकणवासियांनी आवर्जून वाचली पाहिजे अशी ही पुस्तिका आहे. याचे कारण, कोकणकिनाऱ्यावर ठिकठिकाणी वीणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी सागरी कासवे येतात. हॉक बिल, लेदर बॅक प्रकारची कासवे फार क्वचित; तर ठराविक किनाऱ्यांवर ग्रीन टर्टल आणि संपूर्ण कोकणकिनाऱ्यावर ऑलिव रिडले कासवे येतात. त्यांचे संरक्षण-संवर्धन करण्याची जबाबदारी इथल्या स्थानिक जनतेची आहे. इथल्या जैवविविधतेचा एक भाग ही कासवे आहेत आणि ही जैवविविधता जगली-वाचली; तर इथल्या पर्यावरणाचे व पर्यायाने माणसाचे आरोग्य चांगले राहील. खेरीज, अंड्यांतून बाहेर पडून त्यांची पिल्ले हजारोंच्या संख्येने किनाऱ्यावरून तुरूतुरू पळत समुद्राकडे जातात; हे दृश्य फार गंमतशीर दिसते! अशा छोट्याछोट्या, निखळ आनंदांसाठीही जैवविविधतेचे संरक्षण-संवर्धन करायला हवे.

पुस्तिकेत ‘महाराष्ट्रातील सागरी कासवे’ या प्रकरणात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध किनाऱ्यांसह संपूर्ण भारतात आढळणाऱ्या कासवांच्या जमिनीवरील, गोड्या पाण्यातील व सागरी कासवांच्या जातिंविषयी दिले आहे. कासवाची अन्नसाखळीतील भूमिका, त्याचे खाद्य, वीणीचा हंगाम याविषयी सामान्य माहिती या प्रकरणात आहे. ‘सावधान! कासवे धोक्यात आहेत’ या प्रकरणात सागरी कासवांना असलेल्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष धोक्यांची माहिती विस्ताराने दिली आहे. अंडी पळविणे, वन्य व पाळीव प्राण्यांपासून अंड्यांना असलेला धोका, मांसासाठी केली जाणारी कासवाची हत्या, मच्छिमारी बोटींच्या जाळ्यात अडकल्यामुळे होणारे कासवांचे मृत्यू याबरोबरच मासेमारी जाळीत चुकून अडकलेल्या कासवाला बाहेर जाण्यासाठी जाळीला बसविता येईल अशा ‘टर्टल एक्स्क्लुडर डिवाइस’चा उपाय दिला आहे. अप्रत्यक्ष धोक्यांमध्ये वाळू उत्खनन, धूप प्रतिबंधात्मक बंधारे, वृक्षलागवड, बंदर उभारणी, किनाऱ्यावरील विद्युतप्रकाश, पर्यटन, प्रदूषण या बाबींवर चर्चा केली आहे.

‘कासवांचे संरक्षण’ या प्रकरणात संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती व प्रत्यक्ष कृती त्यांच्या फायद्यातोट्यांसह दिली आहे. संपूर्ण किनाऱ्याचे संरक्षण आणि निव्वळ घरट्यांचे संरक्षण असे दोन प्रमुख मुद्दे इथे मांडले आहेत. महत्त्वाची बाब अशी की उपाययोजना नेमक्या कशा कराव्यात, त्याकरिता कोणते साहित्य वापरावे, नोंदी कशा ठेवाव्यात हे नीट समजावून दिले आहे. आपल्या जवळच्या किनाऱ्यावर कासवाने अंडी घातली आहेत, असे कळले असता वाचकाला या पुस्तिकेच्या आधारे त्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येक टप्प्यावर – घरट्याला, अंड्यांना संरक्षण देण्यापासून ते पिल्ले समुद्रात सोडेपर्यंत – योग्य त्या उपाययोजना करता येतील. खेरीज, अंड्यांच्या संरक्षणासाठी पूर्णपणे कृतीशील होता येणार नसेल; तर व्यक्तिगत पातळीवर त्यातल्या त्यात त्यांच्या रक्षणासाठी काय करता येईल, याचेही मार्गदर्शन पुस्तिकेत केले आहे. त्याचबरोबर सागरी कासव मिळाले; तर काय करावे हेदेखील सांगितले आहे.

‘सागरी कासवांचा अभ्यास’ या प्रकरणात कासवांचा अभ्यास करण्यासाठी वाचकांना प्रोत्साहन दिले आहे; तसेच तो नेमका कसा करता येईल हे विषद केले आहे. कासवाची जात कशी ओळखावी, त्याच्या शरीराचे मोजमाप कसे घ्यावे हे रेखाचित्रांच्या सहाय्याने स्पष्ट केले आहे. पिल्लांची मापे कशी घ्यावीत, कासवाचे वजन, अंड्यांचे वजन, आकार यांच्या नोंदी कशा कराव्यात हे दिले आहे. अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक उपकरणांची माहिती दिली आहे. प्रत्येक घरट्यासंबंधीचा तपशील कसा ठेवावा हे सविस्तर दिले आहे.

‘भारतातील सागरी कासवे’ या प्रकरणात या कासवांच्या जातिंची वाचकांना व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त ठरेल अशी वैज्ञानिक माहिती दिली आहे. पुस्तिकेत सागरी कासवांची, त्यांच्या खाणाखुणा, घरट्यांची, पिल्लांची रंगीत प्रकाशचित्रे दिली आहेत. पुस्तिकेतील माहिती आणि प्रकाशचित्रांच्या आधारे कासवांच्या जाति ओळखण्यास वाचकाला अडचण येऊ नये, अशी सोय लेखकांनी केली आहे.

पुस्तिकेच्या अखेरीस कासव संरक्षणासाठी काम करणाऱ्या मुंबई आणि कोकणातील संस्था व व्यक्तिंचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक अथवा ईमेल पत्ते दिले आहेत. तसेच, वाचकांना कासवांची अधिक माहिती मिळविता यावी, यासाठी उपयुक्त संकेतस्थळांची यादी दिली आहे. पुस्तकाची भाषा सोपी आहे. वैज्ञानिक संज्ञांना सोपे मराठी प्रतिशब्द दिले आहेत. जिथे प्रतिशब्द देणे शक्य नाही अशा ठिकाणी इंग्रजी शब्द देवनागरी लिपीतही दिले आहेत. एकूणात, कोकणकिनारपट्टीत अंडी घालण्यासाठी येणाऱ्या सागरी कासवांचे संरक्षण-संवर्धन करण्याच्या दृष्टीने ही पुस्तिका निश्चितच उपयुक्त आहे.

No comments:

Post a Comment