Wednesday, December 14, 2016

हिरवी अक्षरे ८: माझा समुद्रशोध


शालेय जीवनात एखाद्या विषयात गोडी निर्माण होण्यासाठी विषयाचा अभ्यासक्रम, पुस्तकातील मांडणी आणि चांगले शिक्षक अशा अनेक बाबी जुळून याव्या लागतात. तुमच्या बाबतीत भूगोल विषयासंदर्भात हे समीकरण चुकले असेल; तर उशिरा का होईना पण ते दुरुस्त करण्यासाठी डॉ. श्रीकांत कार्लेकर यांच्या ‘माझा समुद्रशोध’ या पुस्तकाची नक्की मदत होईल! भूगोलाची थोडी नव्याने ओळख करून घेतली; तर आपल्या भोवताली असलेल्या भौगोलिक महत्त्वाची ठिकाणे पाहून, त्यांचे महत्त्व समजून घेता येईल. पर्यटनाला वेगळी, अभ्यासपूर्ण दिशा मिळेल. म्हणून आज या पुस्तकाची ओळख करून घेऊ.

भौगोलिक भिन्नतेमुळे निर्माण झालेल्या वैविध्यपूर्ण परिस्थितींना मानवी समाजाने दिलेला भिन्न-भिन्न प्रतिसाद एवढ्यापुरता भूगोल विषय मर्यादित नाही. ही भूगोलाची केवळ एक शाखा झाली. भूगोल विषयाची व्याप्ती मोठी आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक बाबींचा पाया भूगोल आहे. केवळ पुस्तकी अभ्यासाने भूगोल विषय समजून घेता येत नाही. तो समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष निरीक्षणाची जोड हवी. भूगोल विषयाचे अध्ययन, अध्यापन करण्यासाठी कोकण किनारपट्टी पिंजून काढताना लेखकाला आलेल्या अनुभवांचे कथन असे ‘माझा समुद्रशोध’ हे ललितलेखन स्वरुपातील पुस्तक आहे.

कोणताही समुद्र किनारा हा त्या परिसरातील समुद्राचे भूतकाळातील चित्र आपल्यासमोर उभे करू शकतो. म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील पुळण, वाळूचे किंवा खडकाळ किनारे, त्यालगत असलेली भूशिरे, किनाऱ्याजवळ आढळणाऱ्या समुद्री गुहा, कडे, भरतीरेषा, लाटा, प्रवाहांची दिशा अशा विविध घटकांचे निरीक्षण, अभ्यास करून एखाद्या ठिकाणी समुद्राची पातळी नेमकी कशी होती या विषयी अंदाज बांधता येतात. मोजमापे घेऊन, पुरावे अभ्यासून वैज्ञानिक निकषांवर उतरतील असे निष्कर्ष काढता येतात.

समुद्राचे आकर्षण नसलेली व्यक्ती विरळाच. समुद्राजवळ राहणाऱ्यांना कितीही नित्याचा झाला; तरी त्याचा कंटाळा येत नाही. त्यात, नित्याच्या किनाऱ्याचे भौगोलिक महत्त्व समजून घेतले; तर त्यातून आपला, आपल्या गावाच्या भूतकाळाचा एखाद-दुसरा पैलू जाणून घेता येईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्यांना, तसेच, वेळोवेळी पर्यटनासाठी कोकणात जाणाऱ्यांना आणि घरगुती पर्यटन व्यवसाय करणाऱ्यांना आपल्या पाहुण्यांना नवी माहिती देता यावी म्हणून इथल्या किनारपट्टीची भौगालिक वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी या पुस्तकाची मदत होईल. जसे; रेवसच्या किनाऱ्यावर चिखलाची पुळण व त्याखाली गाडले गेलेले खारफुटीचे जंगल आहे; समुद्राला समांतर दिघी-नानवेल-आडगाव-श्रीवर्धन रस्त्यावरून ठिकठिकाणी तयार झालेल्या पुळणी, समुद्री गुहा व समुद्रकडे ही भौगोलिक वैशिष्ट्ये दिसतात. सागरी मार्गाने तस्करीसाठी सोयीचे म्हणून व १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांमुळे कुप्रसिद्ध झालेल्या शेखाडी गावाचा समुद्रकिनारा ही कोकण किनारपट्टीत दुर्मिळ असलेले भौगोलिक वैशिष्ट्य आहे; गुळगुळीत दगडधोंड्यांचा बनलेला ‘शिंगल बीच’ इथे पाहायला मिळतो. असा एक लहानसा ‘शिंगल बीच’ उरणजवळ होता; मात्र, जेएनपीटी बंदराच्या निर्मितीनंतर तो नष्ट झाला. आपल्या जवळपास असलेल्या, आपण पूर्वी कधी भेट दिलेल्या किंवा आपल्या ऐकिवात असलेल्या ठिकाणांचे भौगोलिक महत्त्व पुस्तकात विषद केले आहे.

गड-किल्ले, जुने वाडे, बंदरे यांकडे भूगोलाच्या चष्म्यातून पाहण्याची दृष्टी हे पुस्तक देते. लेखक म्हणतात, “या गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व, त्याच्या स्थानमहात्म्याशीच निगडीत होते हे इतिहास वाचल्यावर लक्षात आले. कोकण किनाऱ्यावरचे किल्ले जेव्हा बांधले गेले, तेव्हाची किनार्याची ठेवण थोडी वेगळी होती आणि समुद्राची पातळी आजच्यापेक्षा वर होती याचे निश्चित पुरावे माझ्या संशोधनातून हाती आले होते...” असे सांगून लेखकाने स्पष्ट केले आहे की आज अलिबागच्या किल्ल्यावर ओहोटीच्या वेळी सहज चालत जाता येते तसे पूर्वी नव्हते. समुद्राची पातळी उंच होती त्यामुळे किल्ला असलेली खडकाळ जमीन हे बेट होते; ओहोटीच्या वेळीही तिथे जाणे शक्य नव्हते. तसेच, कोर्लई किल्ला हासुद्धा समुद्राची पातळी खालावल्यामुळे वाळूचे संचयन होऊन मुख्य भूमीशी जोडला गेला आहे.

संपूर्ण कोकण किनारपट्टीत ठिकठिकाणी आढळणाऱ्या अशा विविध गमतीजमती या पुस्तकात दिल्या आहेत. खेरीज, दीव आणि महाबलिपुरम या दोन ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्याबाबत दोन स्वतंत्र प्रकरणांचा पुस्तकात समावेश केला आहे. पुस्तकाच्या अखेरीस कोकण किनाऱ्याच्या रुपाने आपल्याला लाभलेला भूसामरिक वारसा जपण्याची गरज लेखकाने व्यक्त केली आहे. त्याकरिता करण्याजोगे साधेसोपे उपाय सुचविले आहेत. भौगोलिक वैशिष्ट्यांची रंगीत प्रकाशचित्रे पुस्तकात जागोजागी दिली आहेत. प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणचे हे फोटो आहेत. पुस्तकाला प्र. के. घाणेकर यांची प्रस्तावना आहे.

उपजत असलेली समुद्राची ओढ, त्याविषयी जाणिवे-नेणिवेतील कुतूहल आणि भूगोलाची आवड यातून आकाराला आलेले संशोधन, मिळविलेले विषयाचे ज्ञान लेखकाने पुस्तकात मांडले आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे ललितलेखन आहे. शोधप्रबंध किंवा वैज्ञानिक लेखन नाही. तरीदेखील पुस्तकातील भूगोलाची माहिती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून दिली आहे. भौगोलिक कारणमीमांसा करताना भाषा सर्वसामान्य वाचकाला समजेल अशी सोपी आहे. त्यामुळे भूगोल विषयाची पार्श्वभूमी नसलेल्या वाचकांनाही गुंतवून ठेवत भूगोलाची नव्याने ओळख करून देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरते.

No comments:

Post a Comment