हिरवी अक्षरे १८: एका प्राणिसंग्रहालयाची गोष्ट!

पर्यावरण विषयाशी थेट अथवा अप्रत्यक्षपणे संबंध असलेल्या काही पुस्तकांची ओळख करून देणाऱ्या या सदरात जेराल्ड डरेल यांच्या एखाद्या तरी पुस्तकाचा समावेश करायला हवा, असे वाटण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे डरेल यांनी पर्यावरण संवर्धनासाठी ठोस व भरीव कामगिरी केली आहे; त्यांच्या या कार्यातील अनुभवावर त्यांचे लेखन आधारलेले आहे. दुसरे कारण सोपे आहे, त्यांचे पुस्तक वाचणे हा निखळ आनंददायी अनुभव असतो. पर्यावरणाविषयक वाचन, अभ्यास करणाऱ्याला हा अनुभव आवडेल, अशी खात्री वाटते म्हणून.

जेराल्ड डरेल यांच्या ‘द स्टेशनरी आर्क’ या पुस्तकाविषयी आज आपण जाणून घेऊया.

पर्यावरण संरक्षण-संवर्धन करण्याचे विविध मार्ग आहेत. जंगलाचा एखादा तुकडा देवराईसारखा राखून ठेवणे, एखाद्या ठराविक नैसर्गिक अधिवासाला संरक्षण देणे, एखादा अधिवास निर्माण होण्याला वाव देणे किंवा ऱ्हास झालेल्या एखाद्या अधिवासाचे पुनरुज्जीवन करणे किंवा ठराविक वनस्पती, प्राण्याच्या संरक्षण-संवर्धनासाठी प्रयत्न करणे इत्यादी. डरेल यांनी निवडलेला मार्ग प्राणी संवर्धनाशी संबंधित आहे. वन्यप्राण्यांचे विशेषतः दुर्मिळ झालेल्या, कायमचे नाहीसे होण्याचा धोका असलेल्या प्राण्यांचे ‘एक्स-सिटू’ संवर्धन करण्यासाठी प्राणिसंग्रहालय ही संकल्पना लेखकाने मांडून प्रभावीपणे प्रत्यक्षात आणली. ‘एक्स-सिटू’ संवर्धनात प्राण्याला त्याच्या मूळ, नैसर्गिक अधिवासापासून इतरत्र – प्रयोगशाळा किंवा तत्सम ठिकाणी ठेवून त्याला जगविण्याचे, त्याची संख्या वाढविण्याचे प्रयत्न केले जातात.

डरेल यांनी प्राणिसंग्रहालय सुरू केले तेव्हा – सुमारे १९६० चे दशक - प्राणिसंग्रहालय ही संकल्पना नवी नव्हती. मात्र, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा माणसाच्या मनोरंजनासाठी, त्याला वन्यप्राणी सहज, सुरक्षित राहून पाहता यावेत म्हणून प्राणिसंग्रहालय असा होता. त्यामध्ये, प्राण्याची सोय आणि संवर्धनासाठी प्राणिसंग्रहालयाचा उपयोग याचा विचार फारसा गांभीर्याने झालेला नव्हता. डरेल यांनी नेमके हे साध्य केले. किंबहुना, त्यांचा मुख्य हेतू हा दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून चालविलेले प्राणिसंग्रहालय असाच कायम राहिला. त्यांची प्राणिसंग्रहालयाची ही संकल्पना ‘द स्टेशनरी आर्क’ या पुस्तकात विस्ताराने मांडली आहे.

‘द स्टेशनरी आर्क’ असे लेखकाने प्राणिसंग्रहालयाला म्हटले आहे. जलप्रलयाची सूचना मिळताच नोआने सर्व प्रकारच्या प्राण्यांचे अस्तित्व टिकून राहावे या हेतूने मोठी होडी बांधून त्यात प्राण्यांना ठेवले होते, या ‘नोआज् आर्क’च्या गोष्टीचा संदर्भ लक्षात घेणारे हे शीर्षक समर्पक आहे. पुस्तकात प्राणिसंग्रहालय कसे असावे, हे लेखकाने स्वतःच्या प्रदीर्घ अनुभवाचे दाखले देत स्पष्ट केले आहे.

प्रत्येक प्रकरणाची सुरुवात साहित्यातील त्या त्या प्रकरणातील मुद्द्यांशी संबंधित विधानांची खुसखुशीत पेरणी करून केली आहे. पहिल्या प्रकरणात प्राणिसंग्रहालय निर्माण करण्याचा आपला हेतू लेखकाने स्पष्ट केला आहे. वन्य स्थितीतून कायमचे नाहीसे होण्याचा धोका असलेल्या प्राण्यांचे राखीव साठे म्हणून प्राणिसंग्रहालये असावीत. जीवशास्त्रज्ञांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी तसेच वन्यजीव आणि नैसर्गिक वारशाविषयी जनजागृती होण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेता येईल; हा दुय्यम हेतू. दुर्मिळ प्राण्याची संख्यावाढ पुरेशा प्रमाणात झाली, त्याच्या अस्तित्त्वाला वन्य स्थितीत असलेले धोके नाहीसे झाले की त्याचे वन्यस्थितीत पुनर्वसन करता येणे, हा सुद्धा प्राणिसंग्रहालयाचा हेतू असला पाहिजे. प्राणिसंग्रहालयात प्राण्याचे संवर्धन करावे लागणे हा त्याच्या संवर्धनासाठीचा शेवटचा उपाय म्हणून पाहिले पाहिजे.

पुढच्या प्रकरणात प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची निवासस्थाने – ज्याला आपण खूप सहज पिंजरा म्हणतो ते – कशी असावीत, ती बांधताना कोणती काळजी आणि का घ्यावी, याविषयी दिले आहे. प्राण्याच्या गरजा, सोयी, सवयींना प्राधान्य, त्यापाठोपाठ प्राणिसंग्रहालयाचे व्यवस्थापन करणाऱ्याची सोय आणि अखेरीस प्रेक्षकांची सोय असा हा प्राधान्यक्रम असावा, असे लेखकाने म्हटले आहे. त्या पुढील प्रकरण प्राण्यांच्या आहारविषयक आहे. प्राणी पकडला म्हणजे पुरेसे होत नाही; तर त्याच्या आहारावर त्याचे आरोग्य, त्याचे जगणे-वाचणेसुद्धा अवलंबून असते. प्रत्येक वेळी प्राण्याचे नैसर्गिक खाद्य पुरविणे शक्य नसेल; किंबहुना ते तसे नसतेच; तेव्हा प्राण्यांच्या आरोग्याचा आणि खाद्याच्या उपलब्धतेचा विचार करून त्याचा आहार ठरवावा लागतो. नव्या आहाराची सवय त्याला लावावी लागते. हे सगळे कसे साध्य करता येईल हे पुन्हा स्वतःच्या अनुभवांधारे लेखकाने मांडले आहे. पकडून ठेवलेल्या प्राण्यांचे पुनरुत्पादन यशस्वीरित्या घडवून आणण्यातील अनंत अडचणी लेखकाने एका प्रकरणात मांडल्या आहेत. माणसाला आपल्या भोवतालच्या जगाविषयी, निसर्गातील विविध घटकांच्या चलनवलनाविषयी, त्यातील एकेका सजीवाच्या भूमिकेविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे, प्राणिसंग्रहालयाचे व्यवस्थापन किंवा एकूणच प्राणी संवर्धनाचे काम करताना ते यशस्वी व्हावे अशी इच्छा असेल; तर आपले अज्ञान ही बाब कायम लक्षात घ्यायला हवी, याकडे लेखकाने पुढील प्रकरणात लक्ष वेधून घेतले आहे. अखेरीस, लेखकाने लोकांनी घातलेली वेगवेगळ्या प्रकारची भीती, दिलेले अनाहूत सल्ले, केलेली टीका, घेतलेल्या शंका यांना अनुभवाच्या जोरावर, नम्रपणे, वस्तुनिष्ठ उत्तरे दिली आहेत.

पुस्तकात लेखकाच्या प्राणिसंग्रहालयातील दुर्मिळ प्राण्यांचे फोटो आहेत. भाषा शैली खुसखुशीत, हलकीफुलकी मात्र अत्यंत परिणामकारक आहे.

जाता जाता एक बाब नमूद करायला हवी; ती अशी की, डरेल यांचा कल प्रामुख्याने संवर्धन कार्याकडे होता. त्या कार्यासाठी आवश्यक पैशाची तरतूद करण्यासाठी म्हणून त्यांनी लेखन केले. लेखनाची त्यांना फारशी आवड नव्हती, हे त्यांच्या पुस्तकांची लोकप्रियता पाहता अविश्वसनीय वाटते!

Comments