हिरवी अक्षरे १:आईस्क्रीम खावे की खाऊ नये?!

वाचक हो, लक्षवेधी शीर्षक हवे म्हणून आईस्क्रीमचा उल्लेख केला आहे! या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लेखात मिळेलच, पण सुरुवात मूळ विषयाने करू.


पर्यावरणीय समस्यांची व्याप्ती व गांभीर्य मोठे आहे, त्या अत्यंत गुंतागुंतीच्या आहेत, त्यांची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे, गेल्या दशकभरात पर्यावरण हा विषय ऐरणीवर राहिला आहे. प्रदूषण, तापमान वाढ, हवामान बदल, शाश्वत विकास असे शब्द अधूनमधून कानावर पडत असतात, या विषयांवरील चर्चा प्रसारमाध्यमांतून होताना दिसते. पर्यावरणविषयक गप्पा मारणारे खूप भेटतात, कुणी सांगतात ‘इकोफ्रेंडली’ वस्तू वापरा; तर कुणी सांगतात शहरापेक्षा गावाकडे जाऊन राहा! मात्र, ‘इकोफ्रेंडली’ म्हणजे नेमके काय? आणि पर्यावरणाविषयी खूप वाटते हो, पण म्हणून एकदम गावाकडे जाऊन राहणे जमेल असे वाटत नाही किंवा हे सगळे केले; तरी पर्यावरणाला त्यातून फायदा होतो किंवा नाही हे कसे ठरविणार? पर्यावरणाच्या अक्राळविक्राळ समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी स्थानिकपासून ते जागतिक पातळीवरील तज्ञ, सत्ताधारी मंडळी अधूनमधून सभा-बैठका-परिषदा आयोजित करतात, त्यातूनही काही ठोस बदल घडताना दिसत नाही. अशा परिस्थितीत मी – एक सर्वसामान्य व्यक्ती – काय करणार? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास ‘दैनंदिन पर्यावरण’ हे पुस्तक मदत करते.

‘विचार वैश्विक, कृती स्थानिक आणि प्रतिसाद वैयक्तिक’ ही लेखक दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाची मुख्य संकल्पना. पर्यावरणीय समस्यांना कमीअधिक प्रमाणात तुमच्याआमच्या दैनंदिन कृती कशा कारणीभूत आहेत याचा ऊहापोह या पुस्तकात केला आहे. घरात, स्वयंपाकघरात, न्हाणीघरात, परसात, दुकानात, उपाहारगृहात, विधायक उपक्रम-सणसमारंभात, कार्यालयात, प्रवासात, शाळेत, शेतीत, सहलीत आपण करीत असलेल्या लहानसहान, वरवर निरुपद्रवी भासणाऱ्या वेगवेगळ्या कृती आणि त्यांच्या पर्यावरणीय परिणामांमागील कारणमीमांसा हे पुस्तक समजावून सांगते. तसेच, खऱ्या अर्थाने ‘पर्यावरणस्नेह’ जपता यावा यासाठी या प्रत्येक कृतीत व्यवहार्य बदल सुचविते. हे बदल – आपल्या गरजा मर्यादित ठेवून बिनगरजेच्या वस्तूंचा ‘वापर पूर्णपणे टाळणे’, हे शक्य नसल्यास ‘कमीत कमी वापर करणे’, हा वापर वस्तू अर्धवट वापरून फेकून न देता ‘पूर्णपणे करणे’ आणि शक्यतो वस्तूंचा ‘पुनर्वापर(reuse) व पुनर्घटन (recycle) करणे’ या चतुःसूत्रीवर आधारित आहेत. नमुन्यादाखल; आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादली वापरण्याचा सल्ला लेखकाने दिला आहे. त्यामुळे, पाण्याची बचत होते. ही झाली अनावश्यक वस्तूचा वापर टाळण्याची बाब. पुरेपूर वापराचा हा नमुना पाहा; उपाहारगृहात ग्राहकासमोर ठेवलेला पेला सतत पाण्याने भरलेला राहावा म्हणून ग्राहकाने घोटभर पाणी प्यायले; तरी तो थोडासा रिकामा झालेला पेला वेटर घाईने उचलून घेऊन जातात व भरलेला पेला समोर ठेवतात किंवा ग्राहकाला गरज असो अगर नसो पेल्यात पाण्याची भर घालत राहतात. अशा प्रसंगी ग्राहकानेच पटकन पाणी हवे-नको हे स्पष्ट सांगितले; तर पाण्याचा होणारा प्रचंड अपव्यय सहज टाळता येईल, असे लेखक सुचवितो.

प्लास्टिकच्या अविघटनशीलतेचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि...’ या भगवद् गीतेतील श्लोकाचा वापर असो किंवा वीज बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी सांगितलेला स्कॉच माणसाच्या चिक्कूपणाचा किस्सा असो; विषय गंभीर असला; तरी खुसखुशीत शैलीत मांडलेला आहे. मुद्दे सोपे करून परिणामकारकरित्या वाचकासमोर ठेवले आहेत. इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द हे देखील या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. कालांतराने पर्यावरण सुधारल्यामुळे हे पुस्तक निरुपयोगी ठरावे, अशी अपेक्षा लेखकाने प्रस्तावनेत व्यक्त केली आहे. आपले लेखन कालातीत ठरावे, अशी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांच्या भाऊगर्दीत खऱ्याखुऱ्या पर्यावरणस्नेहाला महत्त्व देत पुस्तकाची उपयुक्तता लवकरच संपुष्टात येवो, असे म्हणणारा लेखक विरळा!

जाता जाता आईस्क्रीमविषयी; लेखकाच्याच शब्दांत “दूध गोठवण्यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च करायची. गोठलेल्या स्थितीतच त्याची वाहतूक करण्यासाठी ऊर्जा वापरायची. दुकानात, उपाहारगृहात ते विकलं जाईपर्यंत शून्याखालील तापमानात ठेवायचं! किती प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागत असेल या सगळ्यासाठी! – केला आहे आपण कधी ह्याचा विचार आईस्क्रीम खाताना?”

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अलिकडेच कपडे धुण्याच्या पावडरींमध्ये फॉस्फेट वापरण्यावर बंदी घालण्याबाबत वक्तव्य केले. फॉस्फेटच्या या समस्येकडे १९९४ साली प्रकाशित झालेल्या ‘दैनंदिन पर्यावरण’ने लक्ष वेधले आहे आणि त्याला साधासोपा व्यवहार्य पर्यायही दिला आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व आता हळूहळू महानगरपालिकांच्या लक्षात येऊ लागले आहे. कचरा व्यवस्थापन या बाबीवरही या पुस्तकात नेमके भाष्य केले आहे.

Comments