Wednesday, December 14, 2016

हिरवी अक्षरे ९: पक्षी आणि वनस्पतीसृष्टी

उत्क्रांतीच्या सिद्धांताचे जनक चार्ल्स डार्विन यांनी १८५९ साली एक प्रयोग केला होता. रेड-लेग्ड पार्टरिज या पक्ष्याच्या पावलाला चिकटलेला चिखल काढून घेतला. त्यातील आर्द्रता राखून ठेवली, परिणामी चिखलात असलेल्या बिया रुजून तब्बल ८३ रोपे तयार झालेली त्यांना आढळली. एका पक्ष्याच्या लहानशा पावलाला चिकटलेल्या चिखलातून केवढ्या मोठ्या प्रमाणात बीजवहन होते याची ही झलक होती!

केवळ मॉरिशस बेटावर आढळणारे एक ठराविक झाड झपाट्याने नाहीसे होत चालल्याचे पर्यावरण अभ्यासकांच्या लक्षात आले. बेटावर त्या प्रकारचे मोजके वृक्ष उरले होते; ते सुद्धा खूप जुने तीनेकशे वर्षे वयाचे. त्यांच्या बिया रुजत नसल्याने नवी रोपे निर्माण होत नाहीत, असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदविले. सखोल अभ्यासांती त्यांनी अनुमान काढले की डोडो पक्ष्याने या झाडाची फळे खाल्ली व त्याच्या बिया डोडोच्या विष्ठेतून बाहेर पडल्यानंतरच त्या रुजण्यायोग्य होतात. हा डोडो पक्षी शिकार करून माणसांनी कायमचा नष्ट केला. त्यामुळे आता डोडोपाठोपाठ त्याचे ते विशिष्ट झाडही अस्तंगत होण्याची शक्यता आहे.

पक्षी आणि वनस्पतींचे अशा विविध प्रकारे एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांचा हा परस्परसंबंध स्पष्ट करून सांगणाऱ्या एका इंग्रजी पुस्तकाची ओळख आजच्या लेखात आपण करून घेणार आहोत. पक्षी आणि वनस्पतींची निसर्गचक्रातील भूमिका बारकाव्यांनिशी समजावून सांगणारे ‘बर्ड्स एन्ड प्लान्ट रीजनरेशन’ हे पुस्तक तारा गांधी या पक्षीअभ्यासक लेखिकेने लिहिले आहे. ‘बर्ड्स एन्ड प्लान्ट रीजनरेशन’ म्हणजे पक्षी आणि वनस्पतींचे पुनरुज्जीवन. वर उल्लेख केलेली आणि अशी अनेक उदाहरणे देत हे पुस्तक पक्षी व वनस्पतींमधील गुंतागुंतीचे नाते स्पष्ट करते.

वनस्पतींच्या बिया रुजण्यापासून ते त्या पुरेशा मोठ्या वाढेपर्यंतचा काळ ही त्यांच्यासाठी अडथळ्यांची शर्यत असते. आधी बिया योग्य ठिकाणी पडायला हव्यात, मग हवा, पाणी, मातीचे समीकरण जुळून यावे लागते, ते जुळून बी रुजली तरी त्यातून निर्माण झालेले रोप प्रचंड संख्याबळ असलेले झपाट्याने वाढणारे नानाविध प्रकारचे कीटक, उंदीरवर्गीय प्राणी यांच्या भक्ष्यस्थानी पडले नाही; तर जगते वाचते. असे सर्व अडथळे पार करून टिकाव धरणारी रोपे पुढे फुलतात, फळतात. त्यामध्ये त्यांना पक्ष्यांची कोणकोणत्या प्रकारे मदत होते, या मुख्य सूत्राच्या अनुषंगाने पुस्तकातील प्रकरणे लिहिली आहेत.

पक्ष्यांचे त्यांच्या आहारानुसार विविध प्रकार – मिश्राहारी पक्षी, कीटकभक्षी, फलाहारी पक्षी, शिकारी पक्षी; वेगवेगळ्या परिसंस्थेत नांदणारे वेगवेगळे पक्षी, त्या त्या परिसंस्थेत निसर्गाने त्यांना नेमून दिलेली कामे हे विषय पुस्तकात विस्ताराने मांडले आहेत. वनस्पतींच्या पुनरुज्जीवनात बीजवहन, रोपाचे संरक्षण, परागीभवन करतात; तसेच वनस्पतीच्या वाढीसाठी पोषक अन्नांश पुरवितात. या सर्व क्रिया सुरळीत व्हाव्यात म्हणून पक्ष्यांची योजना निसर्गाने कशी केली आहे, हे भरपूर उदाहरणांच्या आधारे लेखिकेने समजावून दिले आहे. परिसंस्थेचे स्वास्थ्य पक्ष्यांमुळे सुधारते, तिचे – अखंड परिसंस्थेचे पुनरुज्जीवन त्यांच्यामुळे शक्य होते; तर दुसरीकडे, काही ठराविक प्रसंगी पक्ष्यांच्या माध्यमातून परिसंस्थेची हानी देखील होते, हे वाचकांसमोर मांडले आहे. तुमच्या आमच्या परिचयाची घाणेरी ही वनस्पती मुळात देशी नाही. पण तिचा भारतात शिरकाव झाला इतकेच नव्हे; तर ती सर्वत्र पसरली, फोफावली असून इथल्या स्थानिक वनस्पतींवर तिने अतिक्रमण केले आहे. तिचा हा पसारा असा वाढण्यास पक्षी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरले. घाणेरीची छोटी फळे पक्ष्यांना आकर्षित करतात. साळुंकी, ब्राह्मणी मैना, लाल बुडाचा बुलबुल, लाल गालाचा बुलबुल असे आपल्या भोवती खूप सहज दिसून येणारे पक्षी मोठ्या प्रमाणावर ही फळे खातात. त्यामुळे त्यांच्यामार्फत या तणाचा प्रसार होतो.

शिकारी पक्षी ज्या प्राण्यांची, छोट्या पक्ष्यांची शिकार करतात त्यांच्या पोटात न पचलेल्या अन्नात बिया असतात. या बिया शिकारी पक्ष्यांच्या विष्ठेतून न पचलेली हाडे, पिसे याबरोबर बाहेर पडतात. शिकारी पक्षी मोठ्या व लांब अंतरावर भराऱ्या घेतात त्यामुळे कमी प्रमाणात का होईना पण या पक्ष्यांमार्फत दूर अंतरापर्यंत बीजवहन होते. अशा अनेक गमतीजमती लेखिकेने या पुस्तकात नोंदविल्या आहेत.

शास्त्रीय संज्ञा व संकल्पना पुस्तकात असल्या; तरी त्या सोप्या भाषेत उलगडून स्पष्ट केल्या आहेत. मजकुराला रेखाचित्रे, रंगीत छायाचित्रे आणि क्वचित आकृत्यांची जोड दिली आहे. समजण्यास क्लिष्ट होऊ शकेल असा विषय अवघ्या ७०-८० पानांमध्ये सोप्या, रंजक भाषेत छान समजावून दिला आहे. देशोदेशी झालेल्या अभ्यासातील अनुमाने, दाखले, उदाहरणे देताना जागोजागी त्या त्या माहितीचा स्रोत दिला आहे. वैज्ञानिक लेखनाचे नियम पाळताना मजकूर कंटाळवाणा होऊ नये, संदर्भांमुळे वाचनाला अडथळे निर्माण होऊ नयेत, असे लेखन आहे. पुस्तकातील माहिती मनोरंजक आहे आणि थोडा प्रयत्न केला; तर त्यातील काही भाग आपल्यालाही निरीक्षणातून ती पडताळून पाहता येण्याजोगे आहेत. निसर्ग अभ्यासकासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते, पण त्याचबरोबर, नुसताच छंद म्हणून निसर्गनिरीक्षण करणाऱ्यांनाही ते आवडेल असे आहे.

No comments:

Post a Comment