Wednesday, December 14, 2016

हिरवी अक्षरे १६: अर्थविचार सर्वांसाठी!

अर्थशास्त्राचा पर्यावरणाशी असलेला संबंध ‘अर्थविचार, अर्थव्यवहार - सर्वांसाठी’ या पुस्तिकेतून प्रकाश गोळे यांनी सोप्या भाषेत उलगडून सांगितला आहे.

या लेखकाच्या इतर पुस्तकांविषयी या सदरात पूर्वी लिहिलेले आहे. त्यांच्या आणखी एका पुस्तकाचा इथे समावेश करावासा वाटण्यामागे कारण आहे. ‘नैसर्गिक साधनसंपत्तीचे शाश्वत विकासासाठी व्यवस्थापन’ या विषयावर सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत पर्यावरणातील तसेच अर्थशास्त्रातील क्लिष्ट संकल्पना स्पष्ट करणारी, ओघवती शैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. तरीदेखील, त्यांची पुस्तके ठराविक वर्तुळांपुरती मर्यादित राहिली आहेत. ही पुस्तके केवळ पर्यावरण अभ्यासकांसाठी आहेत, असे नसून सर्वांसाठी उपयुक्त ठरतील अशी आहेत.

 
बांधकाम व्यावसायिक शहरात इमारती उभ्या करतात तेव्हा इमारतीतील रहिवाशांना वाहने उभी करण्यासाठी इमारतीच्या आवारात पुरेशी जागा ठेवत नाहीत. परिणामी, रहिवासी रस्त्यावर वाहने उभी करतात आणि त्यातून रहदारीला अडथळे निर्माण होतात. शहरात विशेषतः शहरातील जुन्या गल्लीबोळात, गर्दीच्या भागात अशा उभ्या केलेल्या वाहनांनी रस्ता अडविल्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, पादचाऱ्यांना अडथळे निर्माण झालेले आपणा सर्वांनी अनुभवले असेलच. यामध्ये बांधकाम व्यावसायिक जास्तीत जास्त जागा इमारतीतील घरांसाठी वापरताना वाहने उभी करण्यासाठी रहिवाशांना सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करण्यास भाग पाडत असतो.
अनेक कारखानदार कारखान्यातून बाहेर पडणारा धूर व सांडपाणी शुद्ध करण्याचा खर्च वाचवून ते सरळ हवेत किंवा नदीत सोडून देऊन समाजाला प्रदूषण भोगायला लावतात.
या दोन्ही उदाहरणांमध्ये उत्पादक आपल्या उत्पादन खर्चाचा काही भाग इतरांवर ढकलून जास्त नफा कमावितो. दुसऱ्यांना भरावी लागणारी ही किंमत किंवा खर्च – जो प्रत्येक वेळी पैशातच असेल असे नाही – त्याला अर्थशास्त्राच्या परिभाषेत ‘बहिर्वर्ती खर्च’; इंग्रजीत 'एक्स्टर्नेलिटी' असे म्हणतात.

नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरामध्ये ‘बहिर्वर्ती खर्च’ लक्षातच न घेण्याची प्रवृत्ती मानवी समाजात पूर्वापार रूढ झालेली आहे. खाणमालक खनन करून मिळविलेली खनिजे विकून नफा कमावितात तेव्हा खाणकामामुळे त्या ठिकाणची सर्व प्रकारची जैवविविधता नष्ट होते. या जैवविविधतेवर अवलंबून - प्रामुख्याने थेट अवलंबून – जगणाऱ्या समूहांना त्यांच्या जीवनशैलीत बदल; तर खाणीच्या जवळपास वसलेल्या मानवी समूहांना प्रदुषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांच्या रूपात आदी विविध प्रकारे हा बहिर्वर्ती खर्च सोसावा लागतो.

सरकारकडून विविध सेवा, सुविधा, वस्तूंमध्ये मिळणारे आर्थिक अनुदान अर्थात ‘सबसिडी’ ही संकल्पना समाजातील सर्व स्तरांतील जनतेला परिचयाची आहे. मात्र, ‘नैसर्गिक सबसिडी’ ही संज्ञा या सबसिडीचा कुठेही, कसल्याही नोंदण्या न करता आपण सर्व सातत्याने वापर करत असूनही आपल्यापैकी फार कमी जणांना माहीत असेल.
निसर्गातील विविध चक्रांमुळे निर्माण होणारे विविध घटक – जसे जलचक्राचा भाग असलेला पाऊस म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या, पिण्यायोग्य पाण्यात नैसर्गिकरित्या होणारे रुपांतर; किंवा शेतात साचलेल्या पुराच्या पाण्याचा निचरा झाल्यावर मागे उरणारा गाळ म्हणजे शेतातील माती सुपीक करण्याची नैसर्गिक तऱ्हा. अशा अनेक प्रकारे निसर्गातून मिळणारे विविध घटक आपण वापरत असतो. मानवी समाजाचे जगणे सुकर करणारी नैसर्गिक क्रियांमधून होणारी अशी मदत म्हणजे ‘नैसर्गिक सबसिडी’.

या आणि अशा ‘पर्यावरणीय अर्थशास्त्र’ विषयक इतर संकल्पनांची प्रभावी मांडणी लेखकाने या पुस्तिकेत केली आहे. वर उल्लेख केलेल्या संकल्पनांच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध बाबी पुस्तिकेत विस्ताराने दिल्या आहेत.

दैनंदिन जगण्यात गृहीत धरलेल्या आर्थिक व्यवहारांची मानवी समाजात सुरुवात कशी झाली, हे सांगून लेखकाने प्राचीन व्यापाराचे स्वरूप, आधुनिक आर्थिक व्यवहार, त्यातून आर्थिक सत्ता व अर्थविचारांची निर्मिती, युरोपीय, अमेरिकी यांबरोबर भारतीय अर्थव्यवस्था या मुद्द्यांच्या विस्तृत पार्श्वभूमीवर मानवी आर्थिक व्यवहारांच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेतला आहे.

‘रोअरिंग ट्वेन्टीज्’ म्हणजे १९२० च्या दशकात, पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकी उद्योगांची झालेली भरभराट, त्यापाठोपाठ उद्भवलेली जागतिक मंदी – ज्याला इंग्रजीत ‘द ग्रेट डिप्रेशन’ असे म्हणतात, असे जगाच्या आर्थिक इतिहासातील महत्त्वाचे ठरलेले टप्पे व त्यांच्यामुळे जगाच्या आणि भारताच्याही अर्थव्यवस्थेवर झालेल्या दूरगामी परिणामांची चर्चा लेखकाने केली आहे.

लेखकाने खुली स्पर्धा आणि बोकाळलेली चंगळवादी, ‘फेक दो’ संस्कृती अशा विविध मुद्द्यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला आहे.
बाजारपेठेत खुल्या स्पर्धेचा पुरस्कार करताना खुल्या स्पर्धेसाठी आवश्यक वातावरणाचे निकषसुद्धा चर्चिले गेले होते. वानगीदाखल लेखकाने दिलेले अॅडम स्मिथचे हे निकष पाहा; सुशिक्षित, उच्च नैतिक मूल्यांचे पालन करणारा समाज, सामाजिक जबाबदारीची जाण ठेवणारे नागरीक आणि प्रामाणिक, सचोटीने वागणारे, मालाचा दर्जा व वैशिष्ट्ये याबाबत सामाजिक जबाबदारी जाणणारे, पाळणारे असे पुरवठादार असतील; तरच खुल्या स्पर्धेमुळे सामाजिक कल्याण साधता येईल. अन्यथा खुल्या स्पर्धेचा फायदा समाजविघातक शक्तीच घेतील असा इशारा स्मिथने दिला होता. मात्र, पुढे त्याच्या या इशाऱ्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. अर्थशास्त्राच्या कोणत्याही पाठ्यपुस्तकात खुल्या स्पर्धेस आवश्यक वातावरणाचे विश्लेषण समाविष्ट करण्यात आले नाही, याकडे लेखकाने लक्ष वेधले आहे. अखेरच्या भागात शाश्वत विकासाची संकल्पना लेखकाने विस्ताराने मांडली आहे.

पुस्तकाच्या मुख आणि मलपृष्ठावर साधे – दिखाऊ, आकर्षक नसलेले – मात्र, सत्य परिस्थिती दर्शवणारे फोटो आहेत. अवघड विषय सोपा करून मांडणारी ही लहानशी पुस्तिका ‘पर्यावरणीय अर्थशास्त्रा’ची तोंडओळख करून घेण्यासाठी उपयुक्त आहे.

No comments:

Post a Comment