हिरवी अक्षरे १४: चार्ल्स डार्विन – व्यक्ती, कृती आणि उत्क्रांती

चार्ल्स डार्विन आणि उत्क्रांतीवाद या विषयाचा समावेश केला नाही; तर निसर्ग-पर्यावरणविषयक वाचन अपुरे राहील.

कोणताही विषय आपल्या मातृभाषेतून शिकला; तर तो अधिक चांगला समजतो. मात्र, तर्कशुद्ध दृष्टिकोन बाळगून पर्यावरणशास्त्रातील मूलभूत वैज्ञानिक संकल्पनांवर लिहिलेली अभ्यासपूर्ण पुस्तके मराठी भाषेत अपवादानेच आहेत. उत्क्रांती; ज्याला इंग्रजीत ‘इवोल्यूशन’ म्हणतात ही अत्यंत गुंतागुंतीची, समजून घेण्यास अवघड अशी संकल्पना आहे. या संकल्पनेवर मराठी भाषेत लिहिलेले एक जुने – १९८० च्या दशकात प्रकाशित झालेले चांगले पुस्तक वाचनात आले. ‘चार्ल्स डार्विन – व्यक्ती, कृती आणि उत्क्रांती’ असे या पुस्तकाचे नाव आहे आणि लेखकाचे नाव भा. रा. बापट असे आहे.

पर्यावरणशास्त्र, जैवविविधता, उत्क्रांती या विषयांचा अभ्यास करणारे मराठी भाषिक विद्यार्थी, या विषयांचे शिक्षक व त्याचबरोबर या विषयांची आवड असणाऱ्या हौशी मंडळींसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल. हे पुस्तक सहजासहजी मिळेल, असे वाटत नाही. जुने, दुर्मिळ असले; तरी पर्यावरण विषयाशी संबंधित चांगले पुस्तक म्हणून त्याचा या सदरात समावेश केला आहे. इच्छुक वाचकांनी शाळा-महाविद्यालयाच्या किंवा जुन्या सार्वजनिक वाचनालयात किंवा व्यासंगी परिचिताच्या संग्रही ते आहे काय, हे जरूर पाहावे.

कोपर्निकसने १६ व्या शतकात सूर्यकेन्द्री उपपत्ती – ‘विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी नाही; तर ती सूर्याभोवती फिरते’ – मांडली तेव्हापासून ते १९ व्या शतकात डार्विनने सजीवांच्या जातींच्या नैसर्गिक निवडीची उपपत्ती मांडली तोपर्यंत; दोन-अडीचशे वर्षांच्या कालावधीत पाश्चात्त्य समाजमन कसे आणि का बदलले होते, हे पुस्तकाच्या प्रस्तावनेत विषद केले आहे. लेखकाने म्हटले आहे की वास्तविक डार्विनने मांडलेला सिद्धांत हा अधिक मूलभूत होता. कोपर्निकसने जडसृष्टीविषयी संकल्पना मांडली होती; तर डार्विनने सजीवांची निर्मिती या विषयाला हात घातला होता. या विषयी बायबलमध्ये ठाम विधाने आहेत. त्याला आव्हान देणारा हा सिद्धांत होता. तरीही, डार्विनच्या वेळेपर्यंत पाश्चात्त्य समाजात सत्य व धर्माकडे तर्कशुद्ध दृष्टीने पाहावे, असे मानणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते, म्हणून डार्विनच्या आधीच्या वैज्ञानिकांचा जसा छळ झाला, तसा डार्विनचा छळ झाला नाही. अर्थात, डार्विनवाद – म्हणजेच उत्क्रांतीवाद – सर्वमान्य आहे असे नाही; त्याला आक्षेप घेणारी विचारधारा अजूनही अस्तित्त्वात आहे. पण, डार्विनवादामुळे पाश्चात्त्य समाजाची मनुष्यजातीकडे पाहण्याची दृष्टी बदलली. धार्मिक असत्यांच्या मगरमिठीतून माणूस सुटला. या संदर्भाला धरून लेखकाने पुढे भारतीय समाजातील अंधश्रद्धेचा मुद्दा मांडला आहे आणि या पार्श्वभूमीवर डार्विनच्या चरित्राचा अभ्यास उपयुक्त ठरेल, या हेतूने हे पुस्तक लिहिल्याचे म्हटले आहे.

हे केवळ उत्क्रांतीच्या सिद्धांताची चर्चा करणारे पुस्तक नाही; तर व्यक्ती म्हणून डार्विनविषयी माहिती, त्याने केलेले प्रचंड काम – डार्विन म्हटले की बहुतेकांना उत्क्रांतीविषयक त्याचे काम ऐकिवात असते; मात्र त्याने निसर्गातील इतरही बाबींवर अभ्यास, संशोधन केले आहे – या विषयी माहिती पुस्तकात आहे. पुस्तकाची मांडणी ही ‘व्यक्ती’, ‘कृती’ आणि मग, ‘उत्क्रांती’ अशा क्रमाने केलेली आहे. त्यामुळे, उत्क्रांतीच्या अवघड संकल्पनेकडे जाण्यापूर्वी तिची, ती मांडणाऱ्या वैज्ञानिकाची पार्श्वभूमी वाचाकाला माहीत झालेली असते. ‘व्यक्ती’ आणि ‘कृती’ या भागांची मांडणी ओघवत्या शैलीत, गोष्ट सांगितल्याप्रमाणे केलेली असल्याने अवघड भागापर्यंत जाईतोवर वाचकाच्या मनात पुरेसे कुतूहल व उत्कंठा निर्माण झालेली असते. त्यामुळे, पुढे येणारी वैज्ञानिक विषयाची मांडणी समजून घेणे फार कठीण अथवा कंटाळवाणे वाटत नाही. खेरीज, कोणताही एकच भाग वाचण्यात रस असला; तर प्रत्येक भाग स्वतंत्ररित्या पूर्ण आहे.

‘व्यक्ती’ या भागात डार्विनचा जन्म, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याचे शिक्षण (ज्यात त्याला फारसा रस नव्हता), त्याचे जिवलग व मित्र आणि मुख्य म्हणजे त्याने एच.एम.एस. बीगल या जहाजावरून केलेला प्रवास याविषयी माहिती दिली आहे. ‘कृती’ या भागात डार्विनने केलेले संशोधन आणि लेखन याविषयी माहिती दिली आहे. ‘उत्क्रांती’ या भागात उत्क्रांतीची संकल्पना विस्ताराने मांडली आहे. आवश्यक तिथे आकृत्या दिल्या आहेत. तसेच या संकल्पना समजून घेण्यासाठी आवश्यक इतर वैज्ञानिक संकल्पना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने डार्विनचे समकालीन संशोधक, त्यांचे कार्य, पुढच्या शतकातील संशोधन याविषयी माहिती दिली आहे. परिशिष्टात चार्ल्स डार्विनच्या जीवनातील महत्त्वाच्या तारखा दिल्या आहेत.

पुस्तकाची भाषा सरळ, सोपी आहे. इंग्रजीतील वैज्ञानिक संज्ञांसाठी ठिकठिकाणी वापरलेले मराठी प्रतिशब्द सहज समजण्याजोगे आहेत. पर्यावरणविषयक लेखन करताना ‘स्पीशिज’ या शब्दासाठी ‘जाती’ हा शब्द सर्रास वापरला जातो. ‘कास्ट’ या अर्थी ‘जाती’ शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा उच्चार वेगळ्या प्रकारे करतात आणि ‘स्पीशिज’ या अर्थी वापरल्या जाणाऱ्या ‘जाती’ या शब्दाचा उच्चार वेगळा असतो, हे स्पष्टीकरण या पुस्तकात दिले आहे. मुखपृष्ठावर डार्विनचे प्रसिद्ध व्यंगचित्र आहे.

विज्ञानजगतात डार्विनचे स्थान व कार्य महत्त्वाचे आहे; हा विषयही रंजक आहे. त्यामुळे त्याची मांडणी करताना भारावून जात लेखन व्यक्तिपूजेकडे झुकण्याचा धोका होता. तो लेखकाने यशस्वीरित्या टाळला आहे, ही एक बाब आणि दुसरी बाब म्हणजे पुस्तकाअखेरीस दिलेली संदर्भग्रंथ यादी पाहता पुस्तकाची मांडणी तर्कशुद्ध व अभ्यासपूर्ण होण्यामागील कारणे सुज्ञ वाचकांच्या लक्षात येतील!

Comments