पुढच्यास ठेच, पण मागचा होईल का शहाणा?

निसर्गातील सर्व वनस्पती काही प्राथमिक कार्ये करीत असतात; ते म्हणजे मुळांच्या साह्याने माती धरून ठेवणे, जमिनीचा ओलसरपणा व थंडावा राखणे, हवा आर्द्र व थंड ठेवणे आणि माती व हवेतील विविध घटकांचा समतोल राखणे. मात्र, त्यापुढे वनस्पती इतर विशेष कार्ये करीत असतात. जसे; काही वनस्पती विविध प्रकारच्या प्राण्यांना अन्न पुरवितात, पक्ष्यांना घरटी करण्यासाठी आवश्यक सामान पुरवितात, सुरक्षित आसरे पुरवितात. या कार्यांना आपण ‘पर्यावरणशास्त्रीय सेवा’ असे म्हणू.
मात्र, हे नंतरची विशेष कार्ये वनस्पतींना करता यावीत, यासाठी त्या वनस्पती आपापल्या नैसर्गिक अधिवासात असणे गरजेचे असते. म्हणजे, वाळवंटातील वनस्पती वाळवंटात, वर्षावनातील वनस्पती वर्षावनात आणि त्याही पुढे जाऊन मादागास्करच्या वर्षावनातील वनस्पती मादागास्करमध्ये, आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशातील वनस्पती आफ्रिकेत असावी लागते. अशा त्या त्या ठिकाणी उत्क्रांत झालेल्या, नैसर्गिक अधिवासात निसर्गनियमानुसार कार्यरत असलेल्या वनस्पतींना त्या त्या ठिकाणच्या स्थानिक किंवा देशी वनस्पती असे म्हणतात. या संकल्पनेला इंग्रजीत ‘नेटिव’ असा शब्द आहे. या उलट मूळ स्थानापेक्षा वेगळ्या, इतरत्र ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पतींना उपऱ्या किंवा परदेशी वनस्पती असे म्हणतात. या संकल्पनेला इंग्रजीत ‘एक्झॉटिक’ असा शब्द आहे. अशा उपऱ्या वनस्पती फारशा पर्यावरणशास्त्रीय सेवा पुरवू शकत नाहीत. मात्र, त्यांच्यामुळे परिसंस्थेत काही समस्या निर्माण होतात. जसे; मातीतील घटकांचा समतोल ढळतो. ज्यामुळे त्या परिसरातील इतर वनस्पतींच्या वाढीवर दुष्परिणाम होतात. इथे निलगिरी वृक्षाचे उदाहरण लक्षात घेऊ. हा वृक्ष मूळचा ऑस्ट्रेलियातील. मात्र, १९ व्या शतकात तो इंग्रजांनी भारतात आणला. इंधन व लाकूड पुरवठा करण्यास उत्तम असे मानून प्रायोगिक तत्त्वावर त्याची प्रथम निलगिरी पर्वतीय प्रदेशात त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली गेली. म्हणून कदाचित त्याचे नाव निलगिरी पडले असावे. हा वृक्ष भरभर वाढत असला; तरी त्याला मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. जमिनीतून तो मोठ्या प्रमाणावर पाणी शोषून घेत असल्याने मातीतील पाण्याचा समतोल ढळतो व इतर वनस्पतींना पुरेसे पाणी मिळत नाही. दुसरी बाब अशी की या वृक्षाच्या पानांचे झटपट विघटन होत नाही. त्यामुळे त्यांचा थर जमिनीवर साचून राहतो आणि एरवी विघटनातून मातीला अन्नांश मिळणे अपेक्षित असते ती प्रक्रिया बाधित होते. त्यातून पुन्हा इतर वनस्पतींच्या वाढीवर परिणाम  होतो. या वृक्षाच्या मूळ ऑस्ट्रेलियातील अधिवासातील जमीन मात्र त्याला पूरक आहे. खेरीज, तिथे असलेला कोआला हा प्राणी मोठ्या प्रमाणावर या वृक्षाची पाने खातो. त्यामुळे, त्यांच्या विघटनाची समस्या तिकडे निर्माण होत नाही. मात्र, पर्यावरणशास्त्रातील असे बारकावे लक्षात न घेता सुरुवातीला इंग्रज सरकारने अनेक परदेशी वनस्पती भारतात आणून लावल्या. इंग्रजांनी ही नसती उठाठेव केवळ भारतातच नाही; तर जगात इतरत्रही केली आहे. त्यांनी हिमालयात आढळणारी ऱ्होडोडेन्ड्रोन वनस्पती शोभेसाठी म्हणून इंग्लंडमध्ये नेऊन लावली; तिने तिथे मूळच्या वनस्पतींच्या अधिवासावर अतिक्रमण केले आहे.
कधी भराभर वाढतात म्हणून, कधी जमिनीची धूप रोखण्यासाठी म्हणून, कधी लाकूड चांगले म्हणून; तर कधी नुसतेच शोभेसाठी म्हणून अशा विविध कारणांनी आणलेल्या परदेशी वनस्पती भारतभर पसरलेल्या आढळतात. पुढे, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ते धोरण कायम ठेवले. आता यातील बहुतेक वनस्पतींना भारतीय नावे दिली गेल्याने त्या मूळच्या इथल्याच आहेत, असा सर्वसामान्यांचा गैरसमज होऊ शकतो. जसे; आपल्याकडे रस्त्याच्या कडेने आढळणारी अनेक झाडे उपरी आहेत. गुलमोहोराचे झाड मूळचे मादागास्कर बेटावरील आहे; तर त्याच्याशी साम्य असलेले पिवळ्या फुलांचे – क्वचित सोनमोहोर नावाने ओळखले जाणारे झाडसुद्धा परदेशी आहे; त्याचा मूळ अधिवास फिलिपिन्स, सिलोन, मलाया आणि उत्तर ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये आहे. आफ्रिकन टयूलिप वृक्षाचे नावच त्याचा मूळ प्रदेश कोणता हे सांगते.
उपऱ्या वनस्पती प्रत्येक वेळी मुद्दामहून आणल्या जातात असे नाही; तर काही चुकूनही येतात. भारताने अन्न सुरक्षा कार्यक्रमांतर्गत अमेरिकेतून ‘पी एल ४८०’ गहू आयात केला; तेव्हा त्यातून चुकून काँग्रेस गवत म्हणून ओळखली जाणारी वनस्पती इथे आली असावी, असे संशोधकांनी मांडले आहे. चुकून आलेली ही उपरी वनस्पती भारतात फोफावली आणि तिने इथल्या स्थानिक वनस्पतींच्या अधिवासावर कधीही समूळ नष्ट करता येणार नाही असे अतिक्रमण केले आहे. बारक्या रंगीत फुलांची घाणेरी किंवा टणटणी म्हणून ओळखली जाणारी वनस्पती, रस्त्याच्या कडेला फोफावलेली युपेटोरिअम ही वनस्पती या त्रासदायक ठरलेल्या उपऱ्या वनस्पतीच. घाणेरीचे अतिक्रमण भारतात व आफ्रिकेतील केन्या, टांझानिया या देशांतील राष्ट्रीय उद्यानांमध्येही झाल्याचे आढळले आहे.
वनस्पतींप्रमाणे प्राण्यांनाही नेटिव आणि एक्झॉटिक या संकल्पना लागू आहेत. उपऱ्या प्राण्यामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या समस्या लक्षात घेण्यासाठी एक वास्तवातील घटना पाहू. १८५९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय किनाऱ्यावरील प्रदेशात शिकारीच्या खेळासाठी २४ ससे युरोपातून आणून माणसाने सोडले. ससा हा प्राणी विविध प्रकारच्या हवामानाशी जुळवून घेत वेगाने प्रजोत्पादन करतो. सशाची एक मादी वर्षभरात साधारणपणे ३० पिल्ले जन्माला घालते. सशांच्या मूळच्या अधिवासात कोल्हे असतात; त्यांच्यामुळे सशांच्या संख्येवर नियंत्रण राहते. ऑस्ट्रेलियात त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारे भक्षक नसल्याने सशांची संख्या वेगाने वाढत गेली. हे ससे मिळतील त्या सर्व वनस्पती कुरतडून खाऊ लागले. जमीन ओसाड होऊ लागली. परिणामी, दुभत्या जनावरांना चारण्यासाठी कुरणे पुरेनाशी झाली. ऑस्ट्रेलियातील मार्सुपिअल या जंगली प्राण्याच्या अस्तित्त्वालाही पुरेशा अन्नाअभावी धोका निर्माण झाला. ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था त्याकाळी दुभत्या जनावरांवर अवलंबून असल्याने ती कोलमडू लागली. तेव्हा, नानाविध उपाययोजना करून सशांची संख्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न माणसाने सुरू केले. मात्र, त्यांना यश येईना. अखेर, तब्बल १०० वर्षांनी एक विषाणू सशांमध्ये सोडून कृत्रिमरित्या रोग निर्माण करून ससे मारले. तरीदेखील १०-२० टक्के ससे वाचले. त्यांनी निर्माण केलेली प्रजा २० व्या शतकात ३० कोटीच्या घरात गेली. थोडक्यात, ऑस्ट्रेलियातून सशांचे समूळ उच्चाटन करणे माणसाला जमलेच नाही.

तेव्हा, पर्यावरणशास्त्रातील संकल्पना लक्षात न घेता घेतलेले निर्णय कोणते दूरगामी परिणाम करू शकतात, याची कल्पनाही माणूस बहुतेक वेळा करू शकत नाही.

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक कृषीवल सप्टेंबर २०१५)

Comments