Friday, October 30, 2015

स्थलांतर

पक्ष्यांचे स्थलांतर हा आश्चर्यजनक निसर्गक्रम आहे आणि शास्त्रीय अभ्यासाचा विषयदेखील! स्थलांतरामुळे पक्षीसृष्टीत होणारे बदल फार पूर्वी – म्हणजे ख्रिस्तपूर्व काळातील ग्रीक तत्त्ववेत्ता एरिस्टोटलने लक्षात घेतल्याच्या नोंदी आढळतात. या जुन्या नोंदी ठराविक पक्षी ठराविक काळात दिसत नसल्यापुरत्या मर्यादित आहेत. हे पक्षी स्थलांतर करून इतरत्र जातात हे माणसाच्या लक्षात येण्यास बराच मोठा काळ जावा लागला. जेमतेम दोन शतकांपूर्वी ‘पक्षी स्थलांतर करतात’ हे माणसाच्या लक्षात आले.काडेपेटीएवढ्या वजनाचा पक्षी ८ हजार किलोमीटर अंतर प्रवास करून युरोपातून आफ्रिकेपर्यंत जातो. विविध लहानमोठे पक्षी आपापल्या गरजेनुसार कधी जवळच्या प्रदेशात, देशांतर्गत; तर कधी एका खंडातून दुसऱ्या खंडावर असे विविध प्रकारे, विविध मार्गाने स्थलांतर करतात. जगातील पक्ष्यांच्या एकूण जातिंपैकी ४० टक्के जाति स्थलांतर करतात.ऋतूमानानुसार खाद्य मिळविण्यासाठी, तीव्र हवामानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी, घरटी करण्यासाठी व पिल्ले वाढविण्यासाठी सुरक्षित आसरे मिळविण्यासाठी, इतर पक्ष्यांमुळे निर्माण होणाऱ्या जगण्याच्या स्पर्धेत टिकाव लागावा म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांनी पक्षी स्थलांतर करतात. स्थलांतराच्या मुद्द्यावर कोणत्याही ठिकाणी आढळणाऱ्या पक्ष्यांचे ढोबळमानाने पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल; निवासी पक्षी - हे कायम त्या ठिकाणी राहतात व प्रजोत्पादनही त्याच ठिकाणी करतात; निवासी मात्र प्रजोत्पादन न करणारे – हे पक्षी बहुतांश काळ त्या ठिकाणी घालवितात, प्रजोत्पादनासाठी मात्र इतरत्र जातात, हिवाळी पक्षी – हे हिवाळ्यात त्या ठिकाणी येतात; उन्हाळी पक्षी – हे  उन्हाळ्यापुरते त्या ठिकाणी येतात; मार्गक्रमणा करणारे – स्थलांतराच्या मार्गात ते ठिकाण आहे म्हणून स्थलांतरादरम्यान ठराविक काळापुरते त्या ठिकाणी येतात. देशांतर्गत आणि जगभरात पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक मार्ग पक्षीशास्त्रज्ञांनी अभ्यास करून शोधून काढले आहेत. काही देशांतर्गत मार्ग सोबत दिलेल्या नकाशावर दाखविले आहेत.पृथ्वीवर कोणत्याही प्रदेशात ऋतू बदलू लागला की दिवस-रात्रीतील सूर्यप्रकाशाची उपलब्धता कमी-जास्त होते. हिवाळ्यात अंधार लवकर पडतो. म्हणजे, अन्न गोळा करण्यासाठी पक्ष्यांना कमी वेळ मिळतो. सूर्यप्रकाशाच्या बदलत्या उपलब्धतेला, बदलत्या तापमानाला पक्षी संवेदनशील असतात. त्यांच्या शरीरात स्रवणारी संप्रेरके त्यांना स्थलांतराची वेळ जवळ आल्याची जाणीव करून देतात. स्थलांतर करण्यापूर्वी पक्षी त्यासाठी तयारी करतात. प्रवास सुरू करण्याची वेळ जवळ आली की पक्षी सातत्याने खातात. त्यांचे शरीर खाल्लेल्या अन्नाचे मेदात रूपांतर करून त्याचा साठा करून ठेवते. काही पक्षी प्रत्यक्ष प्रवास सुरू करण्यापूर्वी कमी अंतर प्रवास करून सराव करीत असल्याची निरीक्षणे पक्षीअभ्यासकांनी नोंदविली आहेत. तयारी पूर्ण झाली की पक्षी स्थलांतर सुरू करतात. वर्षानुवर्षे स्थलांतराचा नेमका काळ कायम राहिल्याचे माणसाच्या अनुभवास आले आहे. ही वेळ चुकली; तर पक्ष्यांच्या जीवावर बेतते. ठराविक ठिकाणी ठराविक वेळेला पोहोचले नाही; तर अन्न मिळण्याची शाश्वती नसते; तसेच वाटेत धोकादायक हवामानाचा सामना करावा लागू शकतो.काही पक्षी दिवसा; तर काही रात्री प्रवास करतात. दिवसा सूर्य, रात्री आकाशातील तारे यांवरून पक्ष्यांना प्रवासाची दिशा समजत असावी, असे काही प्रयोगांती दिसून आले आहे. वाऱ्याचा वेग, दिशा यावर त्यांचा प्रवास अवलंबून असतो. वादळी हवामान, धुके यामुळे त्यांच्या प्रवासाची गती प्रभावित होते. स्थलांतराच्या मार्गावर अंतर, अन्नाची उपलब्धता, सुरक्षा या दृष्टीने सोयीस्कर ठिकाणी उतरून पक्षी पुन्हा मेदाचा साठा करून घेतात. सलग, न थांबता प्रवास करून विस्तीर्ण वाळवंट, विशाल समुद्र ओलांडणाऱ्या पक्ष्यांच्या जाति ज्ञात आहेत. मोठ्या अंतरावर स्थलांतर करणारे पक्षी बहुतेक वेळा कीटकभक्षी असतात, बिया खाणारे पक्षी तुलनेने कमी अंतरावर स्थलांतर करतात; तर फळे खाणारे पक्षी हे सर्वसाधारणपणे निवासी पक्षी असतात.गेली अनेक शतके दरवर्षी पक्ष्यांचे स्थलांतर सुरळीत पार पडले आहे. त्यांच्या अंगभूत प्रेरणा जशा त्यासाठी कारणीभूत आहेत; तसे निसर्गनियमानुसार सृष्टीतील इतर घटकांचे चलनवलन सुरळीत असल्याचाही त्यात मोठा हातभार राहिला आहे. अलिकडे काही वर्षे मात्र स्थलांतरित पक्ष्यांच्या येण्याजाण्याच्या काळात, संख्येत चिंताजनक बदल होऊ लागले आहेत, अशी निरीक्षणे पक्षीअभ्यासकांनी नोंदविली आहेत. जसे; शेतीच्या बदललेल्या पद्धती व पिके यामुळे एकेकाळी भारतात मोठ्या संख्येने येणाऱ्या क्रौंच पक्ष्यांच्या संख्येत ७५ टक्क्यांनी घट झाली आहे. आणखी एक निरीक्षण सांगते, पूर्वी चार-पाच हजारांच्या संख्येने येणाऱ्या ठराविक प्रकारच्या पाणपक्ष्याची संख्या किमान निम्म्याने घटली आहे. तळी-सरोवरांत मुक्काम करणाऱ्या पक्ष्यांचे अधिवास आटत चालले आहेत, त्यांना पुरेसे खाद्य, घरटी बांधण्यायोग्य आसरे मिळेनासे झाल्याने अनेक पक्षी स्थलांतरादरम्यान मुक्कामाच्या पारंपरिक ठिकाणी फिरकेनासे झाले आहेत. निसर्गात सर्व काही आलबेल नसल्याची ही लक्षणे आहेत. यावर विचार-कृती होण्याची गरज आहे. दरम्यान, आजवर कधी पक्षीसृष्टीतील बदल तुम्ही नोंदविले नसतील; तर यंदा सुरुवात करा. हिवाळा सुरू झाला की उरण परिसरात, कर्नाळा अभयारण्यात, कोकणातील समुद्रकिनाऱ्यालगत विविध ठिकाणी एरवी नजरेस न पडणारे पक्षी दिसून येतात. स्थलांतरित पक्षी येण्याचा काळ जवळ आला आहे; तेव्हा, फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे, फिकट गुलाबी रंगाच्या रोझी स्टार्लिंग, सी-गल्स अशा पक्ष्यांच्या आगमनाकडे जरूर लक्ष ठेवा!

  • स्थलांतरित पक्ष्यांच्या येण्याचा काळ सुरू झाला आहे. मात्र, यंदा ऑक्टोबर महिन्यातील तापमान सामान्य तापमानाहून तीन अंश सेल्सिअसने जास्त असल्याने दिल्ली परिसरातील जैवविविधता उद्यानांमध्ये स्थलांतरित पक्षी अपवादानेच दिसत आहेत.
  • ओदिशातील चिलिका सरोवर व्यवस्थापनाने स्थलांतरित पक्ष्यांच्या व ते पाहण्याकरिता येणाऱ्या पक्षीनिरीक्षकांच्या आगमनासाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या हिवाळ्यात इथे १७२ प्रकारचे साडेसात लाखांहून अधिक पक्षी आले होते.
  • ईशान्य भारतात नागालँड इथे २०१३ च्या हिवाळ्यात उपग्रहाशी जोडलेली चिप बसवून सोडलेल्या तीन अमूर फाल्कन पक्ष्यांपैकी दोन पक्षी गेल्या हिवाळ्यात नागालँडमध्ये परतले. हे पक्षी नागालँड ते दक्षिण आफ्रिका आणि तिथून पुन्हा मंगोलिआ मार्गे नागालँडमध्ये असा २२,००० किलोमीटर प्रवास करून आले!

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक कृषीवल सप्टेंबर २०१५)