सण, समाज आणि पर्यावरण

श्रावण महिना संपला की गणपतीचे वेध लागतात. गणपतीनंतर पितृपक्ष होतो की पाठोपाठ नवरात्र, दसरा, दिवाळी; त्यानंतर काही काळातच मकरसंक्रांत; त्या आधी नवे वर्ष म्हणजे गुढीपाडवा नव्हे; तर ३१ डिसेंबर. मग गुढीपाडवा, होळी वगैरे. वर्षभर साजरीकरणाची काही ना काही निमित्त सुरु असतात. भारतातील वेगवेगळ्या जातिधर्मांचे वेगवेगळे सण. सणांचे महत्त्वही वेगवेगळ्या ठिकाणी कमीजास्त असते; किंबहुना ‘होते’ असे म्हणू. गेल्या काही वर्षांत सण साजरा करण्यामध्ये स्थानानुसार, जातिधर्मानुसार असलेले फरक नाहीसे होऊ लागले आहेत. उदाहरणार्थ भावाबहिणीचा सण म्हणून महाराष्ट्रात भाऊबीजेला महत्त्व होते, रक्षाबंधनाचे महत्त्व उत्तर भारतात अधिक. मात्र, हल्ली सरसकट सर्वत्र राखीपौर्णिमा साजरी केली जाते आणि भाऊबीजसुद्धा सारख्याच उत्साहाने सर्वत्र साजरी केली जाते. प्रादेशिक सणांमध्ये पाश्चात्य साजरीकरणांचीही भर पडली आहे, त्यामुळे ३१ डिसेंबर सर्व आर्थिक स्तरांमध्ये, सर्व वयोगटात साजरा होताना दिसतो. खेरीज, मदर्स डे, फादर्स डे इत्यादी असतातच. तेवढीच साजरीकरणाला आणखी काही निमित्त, असा विचार तरुण पिढी करताना दिसते. एकूणात सणसमारंभांचे प्रमाण वाढले आहे असे दिसून येते.
    दैनंदिन जगण्यातून बदल, रुचिपालट, लोकांना एकत्र येण्याचे निमित्त म्हणून अधूनमधून सणसमारंभ केले जातात. सण साजरे करण्याची ही कारणे कायम राहिली असली; तरी साजरीकरणामागचा विचार मात्र बदलला आहे. मराठी किंवा भारतीय सणवार विचारपूर्वक पाहिले; तर लक्षात येते की प्रत्येक सण हा निसर्गातील बदलाशी संबंधित आहे. ऋतूबदल, त्यानुसार बदलणारी खाद्यपदार्थांची उपलब्धता, आरोग्यावर होणारे परिणाम या बाबी लक्षात घेऊन सणवार आणि ते साजरा करण्याच्या पद्धती ठरल्या आहेत. या पद्धती आजही यथाशक्ती पाळल्या जाताना दिसतात, पण त्यामागचा ‘निसर्गातील बदलांच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवनशैलीकडे जाणीवपूर्वक पाहण्याबाबतचा’ मूळ विचार मात्र गळून गेला आहे. गणपती साजरा करताना विविध प्रकारच्या वनस्पती पूजेसाठी, नैवेद्यात वापरण्याची पद्धत आहे; गणेशचतुर्थीनंतर ऋषिपंचमीला ऋषीची भाजी करण्याची पद्धत आहे. मकरसंक्रांतीला बाजरीची भाकरी, तिळगूळ करण्याची पद्धत आहे. त्या त्या ऋतूत ठराविक धान्य, वनस्पती आरोग्यदायी ठरतात म्हणून त्या आहारात असाव्यात, अशी आठवण करून देणाऱ्या या पद्धती आहेत. मात्र, आता त्या केवळ प्रतीकात्मक उरल्या आहेत. मकरसंक्रातीपुरता सोयीस्कररित्या तिळगूळ केला किंवा आणला जातो पण एरवी त्या ऋतूत बाजरीचा, तिळाचा वापर म्हणावा तितका होताना दिसत नाही. बहुतेक घरांत ऋषिपंचमीला ऋषीची भाजी होते, पण तो दिवस संपला की त्या भाजीचे महत्त्व संपले. दिवसाचे महत्त्व जाणून त्या दिवशी भाजीवालेसुद्धा या भाज्या महाग विकतात. आधी महिनाभर व नंतर काही काळ या भाज्या बाजारात दिसतात, पण त्यांना फारशी मागणी नसते.
     सणवार साजरा करण्याचे स्वरुप बदलण्यात बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. गणपतीपासून बाजारपेठेचा ‘फेस्टिव्हल सीझन’ सुरू होतो. लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांतून आकर्षक, लक्षवेधी जाहिरातींचा मारा सातत्याने एरवीही होत असतो, त्यात फेस्टिव्हल सीझनच्या ऑफर, डिस्काऊंट, सेलच्या जाहिरातींची भर पडते. कथित उंची, प्रतिष्ठित, आरामदायी जगण्याची स्वप्न जाहिराती मांडतात आणि ती साध्य करण्यासाठी उत्पादने विकत घेण्याचा एकमेव मार्ग सुचवितात. नसलेल्या गरजा आहेत हे जनमानसावर ठसवितात. नातेसंबंधात भावना व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू वापरण्याची पद्धत जाहिरातबाजीमुळे वाढली आहे. कोणताही सण असो त्यासाठी खरेदी करण्यास बाजारपेठ कारण व प्रोत्साहन देते. बिनगरजेची उत्पादने खपविण्यासाठी सण निर्माणही केले जातात; फ्रेन्डशिप डे, वेलेंटाइन डे, साखरपुडा, लग्न, मुंजी, बारसे, वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस इत्यादी.
       यामुळे सर्व सणउत्सव साजरा करण्यामध्ये सारखेपणा आला आहे. सण म्हणजे भरपूर खरेदी करणे, ज्यांना भरपूर खायला आहे त्यांनाच वारंवार पक्वान्नाचे जेवण देणे हे कौटुंबिक पातळीवरील समीकरण बनले आहे; तर सार्वजनिक पातळीवर उत्सव म्हणजे डीजे, नाचगाणी; हे करताना समाजातील इतर घटकांप्रती संवेदनशीलता न बाळगणे. “रीतसर परवानगी मिळाली नाही; तरी गणेशोत्सव दणक्यात साजरा करू” हे उद्गार असंवेदनशीलतेचेच लक्षण आहेत. कौटुंबिक व सार्वजनिक पातळीवर ‘सेलिब्रेशन म्हणजे मद्यपान’ असाही समज रूढ झाला आहे. त्यातून उद्भवलेल्या सामाजिक समस्या सर्वपरिचित आहेत.
त्याचबरोबर, साजरीकरणामध्ये देण्याघेण्याला अवास्तव महत्त्व आले आहे. भेटवस्तू देणे ही औपचारिकता व सक्तीची बाब बनली आहे - “नाही दिले काही; तर लोक काय म्हणतील?” त्यामुळे, ज्या व्यक्तीला भेटवस्तू द्यायची तिची आवडनिवड, गरज लक्षात न घेता वस्तू दिल्या जातात. महागड्या, निरुपयोगी वस्तू प्रतिष्ठेची बाब म्हणून दिल्या जातात. उच्च व मध्यमवर्गातही गरजेच्या सर्व वस्तू हल्ली घरोघरी असतात, तरीही प्रत्येक सणवारी घरात वस्तूंची भर पडत असते. भेटवस्तू देऊन भावना व्यक्त करण्याचा पर्याय मोहक वाटला; तरी त्या मोहात पडण्यापूर्वी सामाजिक आणि पर्यावरणीय भान बाळगणे गरजेचे नाही का?
    आपले घर बिनगरजेच्या वस्तूंनी ओसंडून वाहात आहे; त्यावेळी देशातील बहुसंख्य जनतेच्या प्राथमिक गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत. सणवार साजरा करताना नको असलेल्या, चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्यापेक्षा बहुसंख्य वंचित जनतेसाठी काही करता येईल का, असा विचार म्हणजे सामाजिक भान. पर्यावरणीय भान म्हणजे बिनगरजेच्या, चैनीच्या वस्तू निर्माण करण्यासाठी नैसर्गिक संसाधने वापरली जातात. वरकरणी वस्तू लहान, क्वचित पर्यावरणस्नेही भासली; तरी प्रत्यक्षात तिच्या उत्पादनात पर्यावरणाची बरीच हानी झालेली असू शकते. खेरीज, अतिरिक्त उपभोगाचे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होत असतात. उदाहरणार्थ थर्मोकोलची सजावट पर्यावरणासाठी घातक ठरते, हे लक्षात आल्यावर बाजारपेठेत कागदी मखरे आली. मात्र, कागदाचा पर्यावरणस्नेही गुणधर्म हा त्याचे विघटन होते इतकाच आहे. कागद तयार करण्यासाठी जंगलतोड केली जाते. शिवाय, कागदाचा पुनर्वापर करण्यासाठी भरपूर पाणी, घातक रसायने वापरावी लागतात. हे लक्षात घेता कागदाचा वापर, मग तो पुनर्वापर असला; तरीही पर्यावरणासाठी घातकच. आपल्या वापरातील प्रत्येक वस्तूच्या निर्मितीसाठी निसर्गातील कायकाय साहित्य कोणकोणत्या पद्धतीने मिळवून वापरले आहे, हे लक्षात घेतले; तर आपल्या सण साजरा करण्याची पर्यावरणीय किंमत वाचकांच्या लक्षात येईल!


(पूर्वप्रसिद्धी: दैनिक कृषीवल सप्टेंबर २०१५)

Comments

  1. Well written Reshma. We have lost simple meanings behind the festivals and made it costly affair. There is more show off and marketing gimmicks that most of the people fall prey to it.

    ReplyDelete
  2. विविध सणांचे व्यवसायावर होणारे परिणाम

    ReplyDelete
  3. की विविध सणांचे निसर्गावर होणारे परिणाम? उदाहरणार्थ: वटपौर्णिमेला वडाच्या फांद्या; तर दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने ओरबाडून विक्रीसाठी आणतात.

    ReplyDelete
  4. Beautiful write up on our festivals.

    ReplyDelete
  5. विविध सणांचे व्यवसायावर व पर्यावरणावर होणारे परिणाम

    ReplyDelete
  6. Please write on effect on festival and ceremony on today please

    ReplyDelete

Post a Comment