Monday, August 3, 2015

शेती आणि मौसमी पाऊस

नेमेचि येतो असे असले तरी भर पावसाळ्यात पावसाने ओढ दिली किंवा तो जास्त बरसला की शेतकऱ्यांच्या आणि बहुदा त्यांच्याहीपेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळते. मे महिन्यात पाणीटंचाईच्या बातम्यांपासून ते पावसाळ्याअखेरीपर्यंत कधी कोरड्या, कधी ओल्या दुष्काळाच्या बातम्या, त्यावर अवलंबून पीकपाण्याच्या नुकसानाच्या बातम्या प्रसारमाध्यमांत दिसून येतात. त्यानंतर मात्र, पावसाळ्याचे चार महिने उलटले की पुढील वर्षी उन्हाळा येईपर्यंत ‘पाऊसपाणी’ हा विषय विस्मृतीत जातो तो अध्येमध्ये अवेळी पावसाने शेतीचे नुकसान होईतोवर. हा दरवर्षीचा घटनाक्रम आहे. वास्तविक, भारतीय उपखंडात गेली कित्येक शतके लहरी पण वैशिष्ट्यपूर्ण मौसमी हवामान आहे. मात्र, आमच्या नियोजनकर्त्यांच्या ते अंगवळणी पडलेले दिसत नाही. शेती आणि भारतातील मौसमी पाऊस याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याचा आज प्रयत्न करूया.
पर्यावरणशास्त्रानुसार शेती ही अनैसर्गिक कृती आहे. निसर्गात कुठेही फक्त आंब्याची शेकडो झाडे एकाच परिसरात उगवलेली आढळतात का? नैसर्गिक परिस्थितीत कोणतीही एकाच प्रकारची वनस्पती वरचढ ठरून विविधतेला मारक ठरू नये अशी काळजी सातत्याने घेतली जाते. वनस्पतीच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी निसर्गाने पक्षी, कीटक अशा भक्षक जीवांची योजना केलेली असते. शेतीमध्ये नेमका हाच निसर्गनियम डावलला जातो. जमिनीच्या तुकड्यावरील लहानमोठ्या विविध वनस्पती तोडून टाकून तिथे एकाच प्रकारची वनस्पती वाढविणे म्हणजे शेती. त्यामुळे शेत लावले की निसर्गक्रमाला धक्का पोहोचतो आणि निसर्गाचे आपात्कालीन व्यवस्थापन सुरू होते म्हणजे, एकाच प्रकारच्या वनस्पतीच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शेतातील पिकाचे नैसर्गिक भक्षक शत्रू जमा होऊ लागतात. त्यातून मग पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी या शत्रूंना दूर ठेवण्याच्या नानाविध क्लृप्त्या करतो. म्हणजेच शेती करण्याचे आणि तीतून अधिकाधिक उत्पादन मिळविण्याचे नवनवे उपाय शोधत राहतो. पूर्वी या क्लृप्त्या साधेसोपे नैसर्गिक घटक वापरून केल्या जात, मिश्र पिके लावणे हा त्यातील एक उपाय होता. म्हणजे एखाद्या पिकावर रोग आला; तर इतर पिके तरी हातात येतील, असा विचार शेतकरी करीत असे. औद्योगिक प्रगतीनंतर नैसर्गिक घटकांची जागा रासायनिक खता-कीटकनाशकांनी घेतली. एकाच पिकाचे अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी म्हणून इतर पिके वगळून एखादेच नगदी पीक शेतकरी घेऊ लागला. त्यामुळे पिकाला सोसेनासे हवामान, एखाद्या किडीचा हल्ला अशा बाबींमुळे संपूर्ण शेतालाच नुकसान पोहोचते. ठराविक मर्यादेपर्यंत निसर्ग मानवी हस्तक्षेपाशी जुळवून घेऊ शकतो, पण शेतीपद्धत जसजशी आक्रमक होऊ लागते; तसतसा नैसर्गिक समतोल ढासळू लागतो. त्याचा परिणाम अंतिमतः शेती नुकसानकारक बनण्यात होतो.
शेतीविषयक दुसरी बाब अशी की पृथ्वीवर आढळणाऱ्या विविध परिसंस्थांपैकी काही ठराविक परिसंस्थांमध्ये ठराविक प्रकारे शेती करणे अधिक सोयीचे आहे. जसे; गवताळ प्रदेश. माणसाच्या आहारातील बहुतांश पिके ही वनस्पतीच्या ‘गवत’ या प्रकारातील आहेत. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, ऊस या गवतवर्गीय वनस्पती आहेत. अमेरिकेतील प्रेअरीसारख्या विस्तीर्ण पसरलेल्या गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गव्हाचे पीक घेणे माणसाला साध्य करता आले. भारतात सर्वत्र नैसर्गिक परिस्थिती ही कधीही एकसारखी व अशा प्रकारच्या शेतीसाठी योग्य नव्हती. भारतात वैविध्यपूर्ण परिसंस्था आहेत. त्या त्या प्रदेशात पूर्वापार राहिलेल्या लोकांनी आपापल्या प्रदेशातील भौगोलिक परिस्थिती आणि पर्जन्यमान लक्षात घेऊन शेतीच्या पद्धती विकसित केल्या. जसे उत्तर भारतातील मोठ्या नद्यांच्या विस्तीर्ण गाळाच्या प्रदेशात होणारी शेती वेगळी; डोंगरी प्रदेशात उतारावर केली जाणारी शेती वेगळी. ठिकठिकाणची पिकेही वेगवेगळी.
भारतीय उपखंडात वैशिष्ट्यपूर्ण मौसमी हवामान आहे. त्याचाच भाग म्हणून पावसाळा हा ऋतू आपल्याला अनुभवता येतो. सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाळ्याचे मानले जातात. त्याखेरीज, इतर महिन्यांमध्ये पाऊस झाला; तर तो अवकाळी पाऊस म्हणतात. मात्र, अवकाळी पाऊस म्हणजे माणसाच्या, शेतीच्या दृष्टीने अयोग्य वेळी पडलेला पाऊस. हा पाऊस निसर्गचक्रात अनपेक्षित नसतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी सांगितले, “भारतात बहुतेक ठिकाणी एकूण पर्जन्यमानाच्या ८० ते ८५ टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पडतो. उरलेला १५ ते २० टक्के पाऊस इतर आठ महिन्यांत पडतो. हा सगळाच पाऊस अनपेक्षित नसतो. हवामान विभागाकडील आकडेवारी पाहिली; तर लक्षात येते की महाराष्ट्राच्या सर्व भागांत ऑक्टोबर, नोवेंबर व मे महिन्यांत बऱ्यापैकी पाऊस पडतो. डिसेंबर, जानेवारी व एप्रिल हे महिने कुठेही कोरडे जात नाहीत आणि फेब्रुवारी, मार्च महिन्यांतसुद्धा पावसाची शक्यता नाकारता येत नाही.” या खेरीज जूनमध्ये होणाऱ्या मौसमी पावसाच्या आगमनापूर्वी आणि सप्टेंबरनंतर मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर पडणाऱ्या पावसाला, गारपीटीला हवामानशास्त्रीय कारणमीमांसा आहे. मौसमी पावसाचे सर्वसाधारण वेळापत्रक ठरलेले असले; तरी तो कॅलेंडरवरील तारखा तंतोतंत पाळत नाही. त्यामुळे, तो एक जूनऐवजी त्यानंतर दोनचार दिवसांनी केरळात दाखल झाला; तर यंदा मौसमी पाऊस उशीरा आला, असा निष्कर्ष काढणे अशास्त्रीय आहे.
शेती आणि पावसामागील शास्त्रीय कारणमीमांसा समजून घेतली म्हणजे शेतीचे नियोजन त्या त्या प्रदेशातील भौगोलिक परिस्थिती, जमिनीचा प्रकार, हवामान, पर्जन्यमान आदी नैसर्गिक बाबींना अनुसरून करण्यातील सोय लक्षात येते. देशाच्या विविध भागांतील पारंपरिक शेती पद्धती व स्थानिक पिके, त्यांचे नियोजन पाहता हवा, पाणी, जमीन या नैसर्गिक बाबींच्या क्षमता-मर्यादांशी ते जुळवून घेणारे आहे, हा योगायोग खचितच नाही! कोकणातील जुन्या, जाणत्या मंडळींशी गप्पा मारल्या; तर लक्षात येते इथेही नैसर्गिक घटकांवर आधारित शेती पद्धती आणि पारंपरिक बियाणी होती, काही प्रमाणात आजही शिल्लक आहेत. पारंपरिक पद्धतीने शेत लावणारा, पिकांची स्थानिक बियाणी वापरणारा शेतकरी नगदी पीक घेणाऱ्या शेतकऱ्याच्या तुलनेत निसर्गातील लहानमोठ्या आकस्मिक बदलांमुळे कमी चिंतेत पडतो, असेही दिसून येते. त्यामुळे, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी शतकानुशतके वापरात असलेल्या शेतीच्या पद्धती व पारंपरिक बियाणीही एकदम मोडीत काढणारी धोरणे रेटत राहण्यापूर्वी एकदा नीट विचार व्हायला हवा.

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक कृषीवल जुलै २०१५)