निसर्ग आणि पर्यटन (भाग १)

शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या सुरु होऊ लागल्यामुळे घरोघरी भटकंतीचे बेत सुरू झाले असतील. दूरवरील भ्रमंतीसाठी तिकिटे, राहण्याजेवण्याच्या सोयी बघून-ठरवून झाल्या असतील, त्याचबरोबर छोट्या कार्यक्रमासाठी, दोन दिवसांच्या सुटीपुरते जाण्यासाठी जवळपासच्या ठिकाणांची चाचपणी सुरू झाली असेल. अशा वेळी मुंबईजवळील ठिकाणांचा व पर्यायाने रायगड जिल्ह्याचा विचार केला जातो. रायगड जिल्ह्यात उन्हाळी-दिवाळी-हिवाळी सुट्यांच्या काळात पर्यटकांची गर्दी असते; तशी ती वर्षभरातील दर शनिवार-रविवारीही असते. जिल्ह्यात ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळे आहेत; तो मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणांपासून जवळ आहे; रस्ते, रेल्वेमार्ग आणि जलमार्गाने जोडलेला आहे यामुळे पर्यटकांना इथे पोहोचणे सोयीचे ठरते, इथे राहण्या-जेवण्याचे घरगुतीपासून ते तारांकितपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत वगैरे कारणे पर्यटकांची गर्दी होण्याला आहेत. मात्र, या दुय्यम बाबी झाल्या. मुळात रायगड जिल्हा निसर्गरम्य आहे म्हणून पर्यटक इकडे आकर्षित होतो!
भौगालिकदृष्ट्या लहानशा, चिंचोळ्या कोकणकिनारपट्टीचा भाग असलेल्या रायगड जिल्ह्यात डोंगररांगांपासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध परिसंस्था आहेत. नद्या, खाड्या, पाणथळी आहेत; डोंगर, टेकड्या, बेटे आहेत; दाट जंगले, तिवरांची जंगले व माळराने आहेत; वाळूच्या पुळणी व अधूनमधून खडकाळ समुद्रकिनारे आहेत. या नैसर्गिक विविधतेमुळे इथे सांस्कृतिक विविधता निर्माण झाली आहे, भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे ऐतिहासिक महत्त्वाचे गडकिल्ले निर्माण झाले आहेत. तेव्हा, प्रामुख्याने इथली नैसर्गिक विविधता ही इथल्या पर्यटन व्यवसायाचा पाया आहे. इथे पर्यटन व्यवसायावर आधारित रोजगारनिर्मिती व्हावी, त्यातून स्थानिकांना पुरेसे पैसे मिळावेत, त्यांचे राहणीमान सुधारावे अशी अपेक्षा असेल; तर हा पाया सुस्थितीत राहायला हवा. आजघडीला इथे होत असलेले पर्यटन ही मुलभूत बाब लक्षात घेत नाहीसे दिसते.
एखाद्या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करताना फक्त पर्यटकांच्या तात्कालिक गरजांचा विचार पुरेसा ठरत नाही. भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घ्यावी लागते. दूरदृष्टीअभावी  उभारलेल्या राहण्या-जेवण्याच्या सोयींमुळे स्थानिक संसाधने – जसे अन्न-पाण्याचे स्रोत; पायाभूत सुविधा – कचरा व्यवस्थापन, सांडपाण्याची यंत्रणा यांवर ताण येतो. वाढता कचरा, सांडपाणी व त्यामुळे होणारे प्रदूषण ही या ताणाची बाह्यलक्षणे. जिल्ह्यात ठिकठिकाणी जाणीवपूर्वक, डोळे उघडे ठेवून फिरल्यावर ही लक्षणे दिसून येतात आणि स्थानिक लोकांशी बोलल्यावर त्यांचे गांभीर्य लक्षात येते.
‘दारू पिऊन, मोठमोठ्याने गाणी लावून दंगा करणारे उपद्रवी पर्यटक, गर्दीमुळे घाणेरडा झालेला किनारा’ या कारणास्तव अलिबागमधील रहिवासी शनिवार-रविवारी समुद्रावर जाणे टाळतात. अलिबागमध्ये गर्दी वाढली तसे तिथून पुढे मुरुडच्या दिशेने जाताना लागणाऱ्या लहानमोठ्या गावांलगत – काशीद,  मुरुड, किहीम, नागाव, आक्षी – असलेल्या समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटक वळू लागले. मुरुड, नागाव प्रसिद्ध झाले तसे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत इतर गावांमध्येही पर्यटकांसाठी राहण्या-जेवण्याच्या व्यवस्था उभ्या राहिल्या. काही ठिकाणी या व्यावसायिकांनी किनाऱ्यावर साहसी खेळांसाठी साधने उपलब्ध करून दिली. त्यातून पर्यटकांची गर्दी आणखी वाढू लागली. परिणामी, इथला निसर्ग पूर्वीइतका रम्य राहिलेला नाही. उरलेसुरले खाद्यपदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, थर्मोकोलच्या बश्या, पेले, पाण्यात पडलेले चपला-बूट , कपडे, काचेच्या बाटल्या, अल्युमिनियमचे टिन असा कचरा समुद्रकिनाऱ्यांवर पडलेला दिसतो. दिवेआगरसारखे देवस्थान जवळ असेल; तर या कचऱ्यात निर्माल्य, हारतुरे, नारळाच्या करवंट्यांची भर पडते. शनिवार-रविवार किंवा मोठी सुटी नुकतीच होऊन गेली असेल; तर कचऱ्याचे प्रमाण वाढलेले लक्षात येते. माथेरानमध्ये प्लास्टिकवर बंदी असल्याने तो एका प्रकारच्या कचऱ्याच्या बाबतीत अपवाद म्हणता येईल. एरवी, गडकिल्ले, नद्या-खाड्या, इतकेच नव्हे; तर जिल्ह्यातील दोन वन्यजीव अभयारण्यांमधील निसर्गही यातून सुटलेला नाही. चिंतेची बाब अशी की अवघ्या १०-१५ वर्षांत ही परिस्थिती उद्भवली आहे.
वाढता कचरा ही लगेचच दिसून येणारी बाब आहे. मात्र, पर्यटनामुळे निसर्गावर होत असलेले काही परिणाम हे दीर्घकाळाने दिसून येतात. वाळूच्या पुळणीवर माणसांच्या गर्दीचा सातत्याने होणारा वावर, साहसी खेळ करताना वापरली जाणारी विविध प्रकारची वाहने यांमुळे कालांतराने पुळण सैल होते. भूगोल विषयातील तज्ञ सांगतात, यामुळे समुद्रकिनाऱ्याची धूप होण्याचा वेग वाढतो. कधीकाळी सुरक्षित मानले गेलेल्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक बुडाल्याच्या वाढत्या घटना ऐकिवात येतात, तेव्हा ‘किनाऱ्याचा ढासळत चाललेला नैसर्गिक समतोल’ हे त्यामागील एक कारण असू शकते. तसेच, वाळूच्या पुळणीवर भरतीओहोटीच्या पाण्याबरोबर स्टारफिश, जेलीफिश, खेकडे विविध प्रकारचे जलचर ये-जा करीत असतात, समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतात. पुळणीवर होणाऱ्या माणसांच्या वावरामुळे या जलचरांना व त्यांच्या अधिवासाला कायमस्वरुपी हानी पोहोचू शकते. पर्यटनस्थळी समुद्रकिनारे हे लहानमोठ्या निवासी सुविधांनी भरून गेलेले दिसतात. सूर्यास्तानंतर पर्यटकांच्या सोयीसाठी, त्यांना आकर्षित करण्यासाठी म्हणून भडक विद्युत रोषणाई केली जाते. याचे दुष्परिणाम समुद्री कासवांवर दिसून आले आहेत. समुद्री कासवाची पिले अंड्यातून बाहेर पडल्यावर प्रकाशाच्या दिशेने समुद्राचा वेध घेत जातात. किनाऱ्यावरील रोषणाईमुळे त्यांची दिशाभूल होते व ती भक्ष्यस्थानी पडतात.
मानवी हस्तक्षेपामुळे सर्वच परिसंस्थांवर बरेवाईट परिणाम होतात, परंतु समुद्रकिनाऱ्याविषयी थोडे विस्ताराने सांगण्याचे कारण की जमीन व पाण्याच्या सीमारेषेवरील ही परिसंस्था विशेष नाजूक असते आणि किनारी राज्यांत पर्यटन विकासासाठी नेमक्या याच परिसंस्थेला प्राधान्य दिले जाते.
पर्यटन व्यवसायाचा पाया असलेल्या नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास झाला की शांततापूर्ण रम्य निसर्गाच्या अपेक्षेने येणारे पर्यटक कालांतराने अस्वच्छ, गर्दीच्या ठिकाणी फिरकेनासे होतात. तेव्हा निर्माण झालेल्या परिस्थितीचा, समतोल ढासळलेल्या निसर्गाचा, संसाधनांच्या अविचारी वापरामुळे उद्भवलेल्या टंचाईचा सामना करीत स्थानिकांना जगावे लागते. पर्यटनामुळे स्थानिक लोकांवर होणारे आर्थिक व सामाजिक दूरगामी परिणाम जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात अभ्यासले गेले आहेत. पर्यटनासाठी जागतिक पातळीवर फार पूर्वीपासून प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील स्थानिकांची जीवनशैली अशा  बऱ्यावाईट परिणामांमुळे ढवळून निघत असल्याचे उदाहरण आपल्या परिचयाचे आहे. आपल्याला त्याची पुनरावृत्ती टाळावयाची असेल; तर वेळीच ‘जबाबदार पर्यटना’चा आग्रह धरावयास हवा; अशा ‘जबाबदार पर्यटना’विषयी पुढच्या खेपेस.

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक कृषीवल एप्रिल २०१५)


Comments