चहापासून चिकनपर्यंत आणि पुढेही...

रासायनिक खता-कीटकनाशकांच्या निसर्गावर आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे रेचल कार्सन या लेखिकेचे ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक १९६२ मध्ये प्रकाशित झाल्याचे आपण गेल्या खेपेला वाचले. १९६० च्या दशकात कार्सन यांच्या पुस्तकामुळे प्रथमच जगासमोर आलेली ही समस्या आज अर्धे शतक उलटून गेले तरी कायम आहे. इतकेच नव्हे; तर तिची व्याप्ती आणि गांभीर्य सातत्याने वाढते आहे. तुमच्या-आमच्या आरोग्याचा, अगदी रोजच्या जेवणाबाबतचा हा प्रश्न असल्यामुळे आजच्या लेखात या विषयी थोडे जाणून घेऊ.एखाद्या सजीवाच्या शरीरात पर्यावरणातील घातक पदार्थाचा अंश साठून राहण्याच्या क्रियेला ‘बायोअक्युम्युलेशन’ – मराठीत ‘जैविक विषसंचय’ असे म्हणतात. एका प्रकारच्या सजीवांच्या शरीरात जैविक विषसंचय झाला की त्या सजीवामार्फत तो घातक पदार्थ अन्नसाखळीमध्ये शिरतो. अन्नसाखळीत जसजसे वरच्या टप्प्यात जावे तसतसे सजीवांच्या शरीरातील त्या पदार्थाचे प्रमाण वाढत जाते. हे प्रमाण वाढण्याला ‘बायोमैग्निफिकेशन’ – मराठीत ‘जैविक विषवृद्धी’ असे म्हणतात. समजा, एका वनस्पतीत एक थेंब विषसंचय झाला आहे; अशा दोन वनस्पतींपासून बनलेले खाद्य एका कोंबडीने खाल्ले; तर तिच्या शरीरात दोन थेंब विषसंचय होईल. अशा कोंबडीची दोन अंडी माणसाने खाल्ली; तर त्याच्या शरीरात चार थेंब विषसंचय होईल. इथे समजून घेण्यापुरते विषवृद्धी दुपटीने होते, असे म्हटले आहे; प्रत्यक्षात मात्र हे प्रमाण वेगळे – कितीतरी पटीने जास्त असल्याचे दिसून आले आहे.



या संकल्पनांचे उदाहरण वाचकांच्या परिचयाचे असेल. १९३० चे दशक संपता संपता डीडीटी हे रसायन कीटकनाशक म्हणून वापरले जाऊ लागले. पशुखाद्य बनविण्यासाठी घेतलेल्या पिकावर डीडीटी फवारले. डीडीटीच्या संपर्कात आलेल्या या वनस्पतीपासून कोंबड्यांसाठी व गाईगुरांसाठी खाद्य बनविले, तेव्हा या खाद्यामार्फत या पशुपक्ष्यांच्या शरीरात डीडीटीचा शिरकाव झाला. कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये व गायींच्या दुधात डीडीटीचा अंश आढळून आला. या पदार्थांचे सेवन करणाऱ्या माणसांच्या शरीरातही डीडीटी साठू लागले. डीडीटीमुळे माणसाच्या मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होऊन आरोग्य गंभीररित्या बिघडते, हे प्रयोगासह सिद्ध झाले तरीही डीडीटीचा वापर सातत्याने सुरू राहिल्याने डीडीटीचा संचय होण्याची क्रिया सुरू राहिली.
विविध रासायनिक खता-कीटकनाशकांचे अशा प्रकारचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. या घटनांवरून योग्य ते धडे आपण आजही घेतलेले नाहीत. वेगवेगळ्या प्रकारे, सातत्याने नवनव्या रासायनिक खता-कीटकनाशकांचा वापर शेतीत सातत्याने केला जातो. हा वापर जैविक विषसंचयाला आणि परिणामतः मानवी आरोग्यविषयक गुंतागुंतीच्या समस्यांना मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहे.
चहा हे भारतातील अत्यंत लोकप्रिय पेय. कधीही चहा केलेला नाही असे स्वयंपाकघर आपल्या देशात शोधूनही सापडणे अवघड आहे. सर्व वयोगटांमध्ये, सर्व सामाजिक-आर्थिक स्तरांमध्ये चहा आवर्जून प्यायला जातो. पाहुणचाराची सुरुवातही “चहा घेणार ना?” असे विचारूनच होते. हा चहासुद्धा रसायनांच्या कचाट्यातून सुटलेला नाही.
Camellia sinensis असे शास्त्रीय नाव असलेल्या वनस्पतीची पाने व कळ्यांपासून चहा बनवितात. थंड हवेच्या ठिकाणी डोंगरउतारावर या वनस्पतीची लागवड केली जाते. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ व आसामसह इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये चहाची शेती केली जाते. अशा भागात डोंगरउतारावर फक्त चहाची शेते पाहायला मिळतात. चहाची वनस्पती निसर्गातील हजारो सजीवांना – कीटकवर्गीय तसेच गांडूळसदृश प्राण्यांना अधिवास पुरविते. म्हणजेच हे प्राणी जगण्यासाठी चहाच्या वनस्पतीवर अवलंबून असतात. शेतात चहाची एकच एक वनस्पती सर्वत्र लावलेली पाहून साहजिकच हे प्राणी मोठ्या संख्येने शेतांच्या आसऱ्याला येतात. यातील काही प्राण्यांमुळे चहाच्या पिकाचे उत्पादन घटते. म्हणून, त्यांचा नायनाट करण्यासाठी माणूस रासायनिक कीटकनाशके फवारतो. ‘ग्रीनपीस’ या स्वयंसेवी संस्थेने जून २०१३ ते मे २०१४ या कालावधीत मुंबई, दिल्ली, बंगरूळू व कोलकाता या चार महानगरांमधून भारतात मिळणाऱ्या विविध कंपन्यांच्या चहाचे ४९ नमुने गोळा केले. साडेतीनशे प्रकारच्या कीटकनाशकांचे अंश आहेत काय, हे शोधण्यासाठी या नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ४६ नमुन्यांमध्ये डीडीटी व त्या सारख्या घातक ३४ रसायनांचे अंश आढळून आले आहेत.
वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांप्रमाणे प्राणिजन्य खाद्यपदार्थही रसायनांच्या अविचारी वापरामुळे आरोग्यदायी राहिलेले नाहीत. वर उल्लेख केल्यानुसार, दूषित पशुखाद्यातून पाळीव प्राण्यांच्या शरीरात रसायने जातात आणि त्यातून ती अंडी, दूध अशा प्राणिजन्य पदार्थांमध्ये उतरतात. या शिवाय, उत्पादन अधिक वेगाने घेण्यासाठी, वाढविण्यासाठी काही रसायनांचा प्राण्यांवर थेट वापर केला जातो.
‘सेंटर फॉर सायन्स एन्ड एन्वायर्न्मेंट’ (सीएसई) या स्वयंसेवी संस्थेने ऑगस्ट २०१३ ते जून २०१४ या काळात दिल्ली शहरातील विविध विक्रेत्यांकडून चिकनचे ७० नमुने गोळा केले. या नमुन्यांवर केलेल्या चाचण्यांमध्ये त्यातील २८ नमुन्यांमध्ये सहा प्रकारचे एन्टिबायोटिक म्हणजे प्रतिजैविकांचे अंश आढळले. कुक्कुटपालनात रोगांना प्रतिबंध करण्यासाठी, रोगावर उपचार म्हणून विविध प्रकारची प्रतिजैविके वापरली जातात.
निसर्गनियमानुसार, जीवाणू, विषाणू आदी सूक्ष्म जीवांचे जीवनचक्र लहान असते. त्यांची उत्क्रांती वेगाने होत असते. माणसाने त्रासदायक सूक्ष्म जीवांना नष्ट करण्यासाठी बनविलेल्या रसायनांवर मात करण्याची क्षमता सूक्ष्म जीवांच्या नवनव्या पिढ्यांमध्ये विकसित होते. त्यामुळे, कालांतराने ही रसायने निष्प्रभ ठरतात. प्रतिजैविकांच्या चुकीच्या अथवा अतिवापरामुळे कोंबड्यांच्या शरीरात या प्रतिजैविकांवर मात करू शकतील अशा जीवाणूंची निर्मिती होते. परिणामी, कोंबडीच्या शरीरावर प्रतिजैविके परिणामकारक ठरत नाहीत. हा निसर्गनियम मानवी शरीरालाही लागू आहे. प्रतिजैविकयुक्त चिकनच्या माध्यमातून मानवी शरीरात त्यांचा अंश साठत गेल्यास काही काळाने मानवी शरीर प्रतिजैविकांना दाद देईनासे होईल, अशी भीती जुलै २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या सीएसईच्या अभ्यास-अहवालात व्यक्त केली आहे.
आपल्या आहारातील प्रत्येक भाजी, फळ, धान्य व मांसाचा प्रकाराचा अशा प्रकारे अभ्यास झालेला नसला; तरीही आधुनिक शेतीपद्धती हे रासायनिक खता-कीटकनाशकांवर भर देणारी असल्याने, तसेच पशुपालन क्षेत्रही उत्पादन वाढविण्यासाठी रसायनांचा मुक्तहस्ताने वापर करणारे असल्यामुळे चहा व चिकन पासून सुरू होणारी ही यादी बरीच लांबलचक होऊ शकते.

(रविवार, दिनांक २९ मार्च २०१५ रोजी 'कृषीवल'मध्ये प्रकाशित)

Comments