Saturday, April 18, 2015

आगळेवेगळे, पण जंगलच!

समुद्र आणि जमिनीच्या सीमारेषेवर वाढणारी वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती म्हणजे तिवर. तिवराच्या जंगलाला इंग्रजीमध्ये mangrove forest असे म्हणतात. ‘तिवर’ हे mangrove प्रकारातील एका वनस्पतीचे मराठी नाव आहे. या प्रकारातील वनस्पतींच्या ५९ जाति भारतात आढळतात. आपल्या सवयीचे म्हणून या परिसंस्थेला आपण ‘तिवराचे जंगल’ असे म्हणू. हे जंगल निसर्गात महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत असते. आज या परिसंस्थेची ओळख करून घेऊ.
महाराष्ट्रात ही परिसंस्था मुंबई-रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीलगत दिसून येते.
समुद्राच्या भरती-ओहोटीचा प्रभाव, क्षारयुक्त पाणी, आर्द्र हवा, चिखलमय सैलसर भूपृष्ठ, वेगाने वाहणारे वारे हे सर्वसाधारण घटक असलेल्या प्रदेशात तिवराचे जंगल आढळते. समुद्र किनाऱ्यालगत, नदी समुद्राला येऊन मिळते त्या खाडी मुखाजवळ, खाडीच्या मुखातून भरती-ओहोटीचे पाणी नदीच्या पात्रात जिथपर्यंत ये-जा करते तिथवर नदीकिनाऱ्यालगत ही परिसंस्था दिसून येते.
समुद्र आणि जमिनीच्या सीमारेषेवर जिथे इतर वनस्पती जगू शकत नाहीत अशा अधिवासात तिवर प्रकारातील वनस्पती वाढतात. खारे पाणी, भरती-ओहोटीनुसार नेमाने बदलणारी पाण्याची पातळी व चिखलमय भूपृष्ठ याच्याशी जुळवून घेण्याची क्षमता तिवर प्रकारातील वनस्पतींमध्ये असते. त्यासाठी या वनस्पतीची रचना – विशेषतः मुळे – वैशिष्ट्यपूर्ण  असते. पुरेसा प्राणवायू शोषून घेता यावा म्हणून या वनस्पतीची मुळे चिखलात वरवर पसरलेली असतात; त्याबरोबर चिखलातून वर हवेत वाढलेली मुळेही असतात – यांना इंग्रजीत ‘एरिअल रूट्स’ म्हणतात. ओहोटीच्या वेळी तिवराखालील चिखलात पाहिले असता काटक्या रोवून ठेवल्याप्रमाणे दिसतात ती हीच मुळे! सैलसर चिखलात रोवून उभे राहता यावे याकरिता या प्रकारातील काही वनस्पतींना बाकदार आधारमुळे असतात.
सर्वसाधारणपणे वनस्पती फुलते, फळते व त्यानंतर फळातील बी जमिनीवर पडून रुजते. तिवर प्रकारातील अनेक वनस्पतींमध्ये बी वनस्पतीवरच रुजते. त्यातून येणारी नवी वनस्पती ही हिरव्या रंगाच्या लांब शेंगेसारखी दिसते. ती वजनाला हलकी असून तीत जादा अन्नसाठा असतो; जेणेकरून झाडावरून गळून पडल्यावर ती भरती-ओहोटीनुसार पाण्यावर तरंगत दूरवर जाऊ शकते. योग्य अधिवास मिळाल्यावर ती चिखलात मूळ धरून वाढू लागते. बी झाडावरच अंकुरण्याच्या प्रकाराला vivipary ही शास्त्रीय संज्ञा आहे.
तिवराच्या जंगलामुळे किनाऱ्याची धूप होत नाही. तिवराचे जंगल माती धरून ठेवते व मातीची निर्मितीही करते. समुद्राकडून जमीन ‘रीक्लेम’ करण्याची ही दीर्घकालीन नैसर्गिक क्रिया आहे. वादळी वारे, समुद्राच्या लाटांच्या माऱ्याला तोंड देण्याची क्षमता या जंगलात असते. पुराचे अतिरिक्त पाणी ते रिचवू शकते. जमीन आणि समुद्राच्या मध्ये हे जंगल संरक्षक भिंतीसारखे काम करते. दक्षिण भारतात २००५ साली आलेल्या त्सुनामीमध्ये किनारी भागात तिवराचे जंगल असलेल्या भागात झालेल्या नुकसानाची तीव्रता इतर भागातील नुकसानाच्या तुलनेत कमी राहिली.
तिवर प्रकारातील वनस्पती छोटे झुडूप ते मोठा वृक्ष अशा विविध आकाराच्या असतात. तिवराचे मोठ्ठाले वृक्ष बंगालमधील सुंदरबनात आहेत; तिथे घनदाट वाढलेल्या तिवराच्या जंगलाने वाघसुद्धा सहज सामावून घेतला आहे. रायगड जिल्ह्यात आपटा-खारपाड्यानजीक पाताळगंगेच्या काठावर असे मोठे वृक्ष आहेत; तर तिवराची झुडुपे किनारपट्टीलगत राहणाऱ्यांना सहज पाहायला मिळतात. अशा झुडुपाळ जंगलातही विविध प्रकारचे अन्न उपलब्ध असल्याने मासे, इतर जलचर, पक्षी, छोटे सस्तन प्राणी राहताना दिसतात. लाटांच्या माऱ्यापासून सुरक्षित जागा, अन्नाची मुबलकता यामुळे विविध प्रकारचे मासे अंडी घालण्यासाठी या जंगलात येतात. त्यांची पिले इथे वाढतात म्हणून तिवराच्या जंगलाला ‘माशांची नर्सरी’ म्हणतात.
तिवराच्या जंगलातून लाकूड, जळण, पशूंना चारा मिळतो; खेरीज जलचर, रानभाज्या व औषधी वनस्पतीही मिळतात. घोळासारखी दिसणारी खारी भाजी म्हणजे तिवराखाली वाढणारी ‘सेसुवियम पोर्तुलाकॅस्ट्रम’ या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी वनस्पती. दात घासण्यासाठी वापरली जाणारी मेसवाकची वनस्पती ‘साल्वाडोरा पर्सिका’ तिवराच्या जंगलात आढळते. मात्र, या दोन्ही वनस्पती तिवर प्रकारच्या नाहीत. त्या तिवर प्रकारातील वनस्पतींच्या जवळपास वाढतात. तिवराच्या जंगलापासून जमिनीच्या दिशेने येऊ लागता पाण्याचे प्रमाण कमी होऊन माती घट्ट झाल्याचे दिसते. या घट्ट जमिनीवर तिवराच्या जंगलाजवळ बिगर-तिवर प्रकारची काही झाडे वाढू लागतात. अशा वनस्पतींना mangrove associate म्हणतात. पांगारा, भेंड ही झाडेसुद्धा या प्रकारात मोडतात.
वीसएक वर्षांपूर्वी तिवरांच्या जंगलाची गणना पडीक, निरुपयोगी जमिनींमध्ये केली जात असे. मात्र, या परिसंस्थेचे पर्यावरणशास्त्रीय महत्त्व लक्षात आल्यावर त्यांचे संरक्षण आवश्यक मानले जाऊ लागले. आजघडीला या परिसंस्थेला कायदेशीर संरक्षण आहे. तरीदेखील, विविध प्रकल्पांसाठी कधी उघडउघड तोडून, भराव घालून; तर कधी छुप्या पद्धतीने – भरतीओहोटीचा मार्ग बुजवून – तिवराची जंगले नष्ट केली जातात. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील ‘एस्सेल वर्ल्ड’ १९८९ मधील त्याच्या निर्मितीपासून आजतागायत तिवराची जंगलतोड केल्याप्रकरणी बातम्यांत राहिला आहे; तर नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीसाठी शेकडो एकरवरील तिवराचे जंगल नष्ट करण्याचा सरकारचा निर्णय ताजा आहे.
अत्यंत गुंतागुंतीच्या या परिसंस्थेचा तोल ढासळल्यास तो पुनःप्रस्थापित करणे अवघड आहे; तसेच या वनस्पतीचे यशस्वीरित्या पुनर्रोपण करून हे जंगल कृत्रिमरित्या निर्माण करणे जवळजवळ अशक्य आहे.
आता, या जंगलातील काही वनस्पतींची ओळख करून घेऊ.
तिवर
‘एविसेनिआ मरिना’ या वनस्पतीशास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीला मराठीमध्ये ‘तिवर’ असे नाव आहे. आपल्याकडे तिवराची झाडे मोठ्या संख्येने आढळत असल्याने त्या परिसंस्थेला सरसकट तिवराचे जंगल म्हटले जाते.
तिवराच्या फांद्या पांढुरक्या दिसतात. पाने लहानशी, तुकतुकीत, वरच्या बाजूला गडद हिरवी; तर खाली फिकट असतात. एप्रिल-मे महिन्यांत लहानशा पिवळ्या फुलांचे गुच्छ झाडावर दिसू लागतात. फळे लांबुळकी असतात.
या झाडाची पाने पाळीव जनावरांना खाण्यासाठी, कठीण लाकूड होड्या बांधण्यासाठी; तर काटक्या जळण म्हणून वापरतात. चामडे बनविण्यासाठी लागणारा द्राव याच्या खोडापासून मिळतो.
कांदळ
‘ऱ्हायझोफोरा म्युक्रोनाटा’ या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीला आपल्याकडे ‘कांदळ’ म्हणतात. त्यावरुन ‘कांदळवन’ असा शब्द वापरला जातो. हे झाड आधारमुळांवर उभे असते. झाडाच्या खोडाची सुरुवात भरतीच्या पाण्याची पातळी दर्शवते. अर्थातच भरतीच्या वेळी आधारमुळे पाण्याखाली जातात.
चिपी
चिपी हे झाड ‘सोनारेशिआ एपेटाला’ या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. पाकळ्या नसलेली फुले हे या झाडाचे वैशिष्ट्य. फेब्रुवारी ते मे महिन्यांदरम्यान झाडावर फुले येतात.
या झाडाच्या खोडापासून कागदाच्या निर्मितीसाठी आवश्यक लगदा, काडेपेटीतील काड्या बनविता येतात. चिपीच्या फळांची भाजी किंवा लोणचे करून खातात.

(रविवारदिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी 'कृषीवल'मध्ये प्रकाशित)

Sunday, April 5, 2015

चहापासून चिकनपर्यंत आणि पुढेही...

रासायनिक खता-कीटकनाशकांच्या निसर्गावर आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे रेचल कार्सन या लेखिकेचे ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक १९६२ मध्ये प्रकाशित झाल्याचे आपण गेल्या खेपेला वाचले. १९६० च्या दशकात कार्सन यांच्या पुस्तकामुळे प्रथमच जगासमोर आलेली ही समस्या आज अर्धे शतक उलटून गेले तरी कायम आहे. इतकेच नव्हे; तर तिची व्याप्ती आणि गांभीर्य सातत्याने वाढते आहे. तुमच्या-आमच्या आरोग्याचा, अगदी रोजच्या जेवणाबाबतचा हा प्रश्न असल्यामुळे आजच्या लेखात या विषयी थोडे जाणून घेऊ.एखाद्या सजीवाच्या शरीरात पर्यावरणातील घातक पदार्थाचा अंश साठून राहण्याच्या क्रियेला ‘बायोअक्युम्युलेशन’ – मराठीत ‘जैविक विषसंचय’ असे म्हणतात. एका प्रकारच्या सजीवांच्या शरीरात जैविक विषसंचय झाला की त्या सजीवामार्फत तो घातक पदार्थ अन्नसाखळीमध्ये शिरतो. अन्नसाखळीत जसजसे वरच्या टप्प्यात जावे तसतसे सजीवांच्या शरीरातील त्या पदार्थाचे प्रमाण वाढत जाते. हे प्रमाण वाढण्याला ‘बायोमैग्निफिकेशन’ – मराठीत ‘जैविक विषवृद्धी’ असे म्हणतात. समजा, एका वनस्पतीत एक थेंब विषसंचय झाला आहे; अशा दोन वनस्पतींपासून बनलेले खाद्य एका कोंबडीने खाल्ले; तर तिच्या शरीरात दोन थेंब विषसंचय होईल. अशा कोंबडीची दोन अंडी माणसाने खाल्ली; तर त्याच्या शरीरात चार थेंब विषसंचय होईल. इथे समजून घेण्यापुरते विषवृद्धी दुपटीने होते, असे म्हटले आहे; प्रत्यक्षात मात्र हे प्रमाण वेगळे – कितीतरी पटीने जास्त असल्याचे दिसून आले आहे.या संकल्पनांचे उदाहरण वाचकांच्या परिचयाचे असेल. १९३० चे दशक संपता संपता डीडीटी हे रसायन कीटकनाशक म्हणून वापरले जाऊ लागले. पशुखाद्य बनविण्यासाठी घेतलेल्या पिकावर डीडीटी फवारले. डीडीटीच्या संपर्कात आलेल्या या वनस्पतीपासून कोंबड्यांसाठी व गाईगुरांसाठी खाद्य बनविले, तेव्हा या खाद्यामार्फत या पशुपक्ष्यांच्या शरीरात डीडीटीचा शिरकाव झाला. कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये व गायींच्या दुधात डीडीटीचा अंश आढळून आला. या पदार्थांचे सेवन करणाऱ्या माणसांच्या शरीरातही डीडीटी साठू लागले. डीडीटीमुळे माणसाच्या मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होऊन आरोग्य गंभीररित्या बिघडते, हे प्रयोगासह सिद्ध झाले तरीही डीडीटीचा वापर सातत्याने सुरू राहिल्याने डीडीटीचा संचय होण्याची क्रिया सुरू राहिली.
विविध रासायनिक खता-कीटकनाशकांचे अशा प्रकारचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. या घटनांवरून योग्य ते धडे आपण आजही घेतलेले नाहीत. वेगवेगळ्या प्रकारे, सातत्याने नवनव्या रासायनिक खता-कीटकनाशकांचा वापर शेतीत सातत्याने केला जातो. हा वापर जैविक विषसंचयाला आणि परिणामतः मानवी आरोग्यविषयक गुंतागुंतीच्या समस्यांना मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहे.
चहा हे भारतातील अत्यंत लोकप्रिय पेय. कधीही चहा केलेला नाही असे स्वयंपाकघर आपल्या देशात शोधूनही सापडणे अवघड आहे. सर्व वयोगटांमध्ये, सर्व सामाजिक-आर्थिक स्तरांमध्ये चहा आवर्जून प्यायला जातो. पाहुणचाराची सुरुवातही “चहा घेणार ना?” असे विचारूनच होते. हा चहासुद्धा रसायनांच्या कचाट्यातून सुटलेला नाही.
Camellia sinensis असे शास्त्रीय नाव असलेल्या वनस्पतीची पाने व कळ्यांपासून चहा बनवितात. थंड हवेच्या ठिकाणी डोंगरउतारावर या वनस्पतीची लागवड केली जाते. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ व आसामसह इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये चहाची शेती केली जाते. अशा भागात डोंगरउतारावर फक्त चहाची शेते पाहायला मिळतात. चहाची वनस्पती निसर्गातील हजारो सजीवांना – कीटकवर्गीय तसेच गांडूळसदृश प्राण्यांना अधिवास पुरविते. म्हणजेच हे प्राणी जगण्यासाठी चहाच्या वनस्पतीवर अवलंबून असतात. शेतात चहाची एकच एक वनस्पती सर्वत्र लावलेली पाहून साहजिकच हे प्राणी मोठ्या संख्येने शेतांच्या आसऱ्याला येतात. यातील काही प्राण्यांमुळे चहाच्या पिकाचे उत्पादन घटते. म्हणून, त्यांचा नायनाट करण्यासाठी माणूस रासायनिक कीटकनाशके फवारतो. ‘ग्रीनपीस’ या स्वयंसेवी संस्थेने जून २०१३ ते मे २०१४ या कालावधीत मुंबई, दिल्ली, बंगरूळू व कोलकाता या चार महानगरांमधून भारतात मिळणाऱ्या विविध कंपन्यांच्या चहाचे ४९ नमुने गोळा केले. साडेतीनशे प्रकारच्या कीटकनाशकांचे अंश आहेत काय, हे शोधण्यासाठी या नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ४६ नमुन्यांमध्ये डीडीटी व त्या सारख्या घातक ३४ रसायनांचे अंश आढळून आले आहेत.
वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांप्रमाणे प्राणिजन्य खाद्यपदार्थही रसायनांच्या अविचारी वापरामुळे आरोग्यदायी राहिलेले नाहीत. वर उल्लेख केल्यानुसार, दूषित पशुखाद्यातून पाळीव प्राण्यांच्या शरीरात रसायने जातात आणि त्यातून ती अंडी, दूध अशा प्राणिजन्य पदार्थांमध्ये उतरतात. या शिवाय, उत्पादन अधिक वेगाने घेण्यासाठी, वाढविण्यासाठी काही रसायनांचा प्राण्यांवर थेट वापर केला जातो.
‘सेंटर फॉर सायन्स एन्ड एन्वायर्न्मेंट’ (सीएसई) या स्वयंसेवी संस्थेने ऑगस्ट २०१३ ते जून २०१४ या काळात दिल्ली शहरातील विविध विक्रेत्यांकडून चिकनचे ७० नमुने गोळा केले. या नमुन्यांवर केलेल्या चाचण्यांमध्ये त्यातील २८ नमुन्यांमध्ये सहा प्रकारचे एन्टिबायोटिक म्हणजे प्रतिजैविकांचे अंश आढळले. कुक्कुटपालनात रोगांना प्रतिबंध करण्यासाठी, रोगावर उपचार म्हणून विविध प्रकारची प्रतिजैविके वापरली जातात.
निसर्गनियमानुसार, जीवाणू, विषाणू आदी सूक्ष्म जीवांचे जीवनचक्र लहान असते. त्यांची उत्क्रांती वेगाने होत असते. माणसाने त्रासदायक सूक्ष्म जीवांना नष्ट करण्यासाठी बनविलेल्या रसायनांवर मात करण्याची क्षमता सूक्ष्म जीवांच्या नवनव्या पिढ्यांमध्ये विकसित होते. त्यामुळे, कालांतराने ही रसायने निष्प्रभ ठरतात. प्रतिजैविकांच्या चुकीच्या अथवा अतिवापरामुळे कोंबड्यांच्या शरीरात या प्रतिजैविकांवर मात करू शकतील अशा जीवाणूंची निर्मिती होते. परिणामी, कोंबडीच्या शरीरावर प्रतिजैविके परिणामकारक ठरत नाहीत. हा निसर्गनियम मानवी शरीरालाही लागू आहे. प्रतिजैविकयुक्त चिकनच्या माध्यमातून मानवी शरीरात त्यांचा अंश साठत गेल्यास काही काळाने मानवी शरीर प्रतिजैविकांना दाद देईनासे होईल, अशी भीती जुलै २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या सीएसईच्या अभ्यास-अहवालात व्यक्त केली आहे.
आपल्या आहारातील प्रत्येक भाजी, फळ, धान्य व मांसाचा प्रकाराचा अशा प्रकारे अभ्यास झालेला नसला; तरीही आधुनिक शेतीपद्धती हे रासायनिक खता-कीटकनाशकांवर भर देणारी असल्याने, तसेच पशुपालन क्षेत्रही उत्पादन वाढविण्यासाठी रसायनांचा मुक्तहस्ताने वापर करणारे असल्यामुळे चहा व चिकन पासून सुरू होणारी ही यादी बरीच लांबलचक होऊ शकते.

(रविवार, दिनांक २९ मार्च २०१५ रोजी 'कृषीवल'मध्ये प्रकाशित)