महत्त्वाची, तरीही दुर्लक्षित पाणथळ परिसंस्था

माणसाला पूर्वापार भव्यदिव्याचे आकर्षण असल्याने निसर्गरम्य स्थळ म्हटले म्हणजे उंच, भक्कम वाढलेल्या झाडांचे, वाघ-अस्वल अशा मोठ्या वन्य प्राण्यांचा वावर असलेले निबीड अरण्य’, ‘आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच पर्वतरांगाकिंवा लांबचलांब पसरलेली वाळूची पुळण आणि पलीकडे क्षितिजाला भिडणारा अथांग समुद्रअशा ठराविक परिसंस्था डोळ्यासमोर येतात. या परिसंस्था आकर्षक व महत्त्वाच्या खऱ्या; पण त्याहून वेगळ्या, कदाचित रूढार्थाने भव्यदिव्य म्हणता येणार नाहीत अशा; तरीही निसर्गाविषयी मनात कुतूहल जागविणाऱ्या व निसर्गसान्निध्याचा भरभरून आनंद देणाऱ्या कितीतरी परिसंस्था आपल्या अवतीभवती आहेत. त्यातील एका वैशिष्ट्यपूर्ण आणि भोवताली सहज दिसून येणाऱ्या परिसंस्थेकडे लक्ष वेधून घेण्याचा हा प्रयत्न आहे. नेमक्या याच हेतूने राखून ठेवलेला जागतिक दिवस नुकताच झाला, हे या विषयासाठी चांगले निमित्त ठरावे.


२ फेब्रुवारीला World Wetlands Day अर्थात जागतिक पाणथळ दिवसझाला. पाणथळ जमिनीवर निर्माण होणाऱ्या परिसंस्थेची दखल घेण्यासाठी, तिचे महत्त्व आणि म्हणून तिच्या संरक्षण-संवर्धनाची गरज लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. पाणथळ जमिनींवरील परिसंस्था नष्ट होण्याचा धोका असल्याची जाणीव १९६२ मध्ये जगाला झाली. तेव्हा, जगभरातील पाणथळ जमिनींच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय करारनामा व्हावा, असे ठरून त्याचा मजकूर तयार करण्यास सुरुवात झाली. तो तयार झाल्यावर १९७१ साली २ फेब्रुवारी या दिवशी इराणमधील रामसार शहरात भरलेल्या एका परिषदेत त्याला मान्यता मिळाली. करारनामा संमत झाल्याला १६ वर्षे झाली त्या वर्षीपासून म्हणजे १९९७ पासून दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ दिवसपाळला जाऊ लागला.
खेरीज, जानेवारी-फेब्रुवारी महिने हे पाणथळी परिसंस्थेसाठी खास लगबगीचे असतात. या काळात देशोदेशीच्या स्थलांतरित पक्ष्यांचे थवेच्या थवे आल्यामुळे लहानमोठ्या पाणथळी गजबजून गेलेल्या दिसतात. वाटलेच; तर जवळच्या एखाद्या पाणथळीला भेट देण्यासाठी हा उत्तम काळ आहे. म्हणूनही आज या परिसंस्थेची ओळख करून घ्यायला हरकत नसावी!
उथळ पाणीसाठा, त्या साठ्यात पाणी शिरण्यासाठी व त्यातून पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग, या मार्गांनी ठराविक नियमितपणे होणारी पाण्याची ये-जा व त्यामुळे पाण्याच्या स्तरात होणारे बदल या घटकांवर पाणथळ परिसंस्थेची निर्मिती व चलनवलन अवलंबून असते. पाणीसाठा उथळ असायला हवा कारण त्यामुळे पाण्याच्या तळापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकतो. उथळ पाण्यात ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर मिसळला जातो. प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्ननिर्मिती करण्यासाठी वनस्पतींना हे दोन मुख्य घटक भरपूर प्रमाणात मिळाल्याने अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नोत्पादन होते. त्यावर अवलंबून गुंतागुंतीच्या अन्नसाखळ्या निर्माण होतात. म्हणजेच मोठ्या संख्येने विविध वनस्पती, प्राणीपक्षी इथे जगू शकतात. या उलट, खोल पाण्यात मात्र जीवांचे फारसे वैविध्य व संख्याही नसते. खोल समुद्र व मोठ्या धरणांचे खोल जलाशय आठवून पाहा. भरपूर पाणी असूनही तेथे प्राण्यापक्ष्यांचा वावर फारसा दिसत नाही. समुद्र किनाऱ्याजवळ किंवा जलाशयाच्या कडेने उथळ पाण्याच्या परिसरात हा वावर जास्त असल्याचे दिसते. अशा ठिकाणी पाणथळ परिसंस्था बहरण्यास वाव मिळतो.
भारत १९८२ मध्ये रामसार करारनाम्यात सामील झाला. करारनाम्याने ठरविलेल्या निकषांमध्ये बसणाऱ्या काही पाणथळींना रामसार स्थळाचा दर्जा दिला जातो. अशा पाणथळींच्या संरक्षण-संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातात. भारतातील नैसर्गिक व मानवनिर्मित अशा लाखो पाणथळींपैकी फक्त २६ पाणथळींना रामसार दर्जा मिळालेला आहे. जगप्रसिद्ध रामसार दर्जाचे भरतपूर पक्षी अभयारण्य ही मानवनिर्मित पाणथळ आहे. महाराष्ट्रातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य ही देखील मानवनिर्मित पाणथळ आहे.
भारतात नैसर्गिक पाणथळी या हिमालय, गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांची गाळाची मैदाने व त्रिभुज प्रदेश आणि किनारपट्टीच्या प्रदेशात आहेत. या खेरीज बांधबंधारे, धरणे-जलवाहिन्या बांधल्यामुळे, रस्ते-लोहमार्ग बांधण्यासाठी घातलेल्या भरावामुळे पाणी अडल्यामुळे, मिठागरे, तळी-तलाव, मत्स्यपालनाकरिता टाक्या बांधल्यामुळे मानवनिर्मित पाणथळी तयार झाल्या आहेत. २०१० या वर्षी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने देशातील पाणथळींची नकाशासाहित आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार रायगड जिल्ह्यात १७६०; तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पश्चिम किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये मिळून पाच हजारांहून अधिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात ४४ हजारांहून अधिक लहानमोठ्या पाणथळी आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात परिस्थिती वेगळी होती. पर्यावरणतज्ञ व पक्षी निरीक्षक प्रा. प्रकाश गोळे यांनी केलेली एक नोंद पाहा; ते लिहितात एके काळी महाराष्ट्रात फारशा पाणथळी नसाव्यात. स्थलांतर करून भारतात येणारी विविध प्रकारची बदके महाराष्ट्र ओलांडून कर्नाटकात जात कारण तिथे सिंचन योजनांमार्फत बांधलेले अनेक पाणीसाठे होते. बार-हेडेड गूज हा पक्षी स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात क्वचितच दिसत असे, त्या नंतरच्या काळात मात्र तो हिवाळ्यात मोठ्या संख्येने महाराष्ट्रात आढळू लागला.
या उदाहरणावरून वाचकांनी असा समज करून घेऊ नये की मोठ्या संख्येने पाणथळी निर्माण झाल्यामुळे निसर्ग संवर्धन साध्य होत आहे. कारण, प्रत्यक्षात या बहुसंख्य पाणथळी दुर्लक्षित आहेत. त्यामध्ये प्लास्टिक व इतर घनकचरा टाकला जातो. कारखान्यांतील दूषित पाणी, मानवी वसाहतीतील सांडपाणी पाणथळींमध्ये सोडले जाते. शेतांमधून वाहून येणारी रसायने त्यांत मिसळतात. परिसंस्थेसाठी हानिकारक जलपर्णी, बेशरमीसारखी तणे पाण्यावर माजलेली दिसतात. त्यामुळे वैविध्यपूर्ण वनस्पतींच्या वाढीला वाव मिळत नाही आणि प्राण्यापक्ष्यांचे वैविध्य, संख्या कमी झालेली दिसते. संख्येवर नियंत्रण ठेवणाऱ्या भक्षकांअभावी डासांची बेसुमार पैदास झालेली दिसते. पाणथळ जमिनी या शेतीसाठी अयोग्य म्हणून पडीक समजून भराव घालून त्यांचा वापर कायमचा बदलला जातो.
इथे लक्षात घ्यायला हवे की पाणथळ असलेल्या परिसरात भूजल स्तर चांगला राहतो. पूरपरिस्थितीत पाण्याचा लोंढा प्रथम पाणथळीत शिरतो. त्यामुळे पुराचा जोर ओसरतो आणि परिसरात जीवित व वित्तहानी कमी करता, टाळता येऊ शकते. तसेच उत्तम स्थितीतील पाणथळी परिसंस्थेत वनस्पती, प्राण्यापक्ष्यांची विविधता व संख्याही मोठी असल्याचे दिसून येते. अशा पाणथळीतून मिळणाऱ्या माशांमुळे, तसेच तिथे येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक लोकांना उपजीविकेचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. म्हणूनच या वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्थेचे पर्यावरणशास्त्रीयदृष्ट्या सुयोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

(रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०१५ रोजी 'कृषीवल'मध्ये प्रकाशित)


Comments