प्रचलित विकास आणि पर्यावरणवाद (भाग २)

वास्तविक, पर्यावरणवाद म्हणजे निसर्गाच्या क्षमता व मर्यादा लक्षात घेणारा विचार. माणसाबरोबरच पृथ्वीवरील सर्व सजीवांचे दीर्घकालीन हित पर्यावरणवाद लक्षात घेतो. मात्र, पर्यावरणवादात लक्षात घेतलेले माणसाचे हित हे प्रचलित विकासात अपेक्षित असलेली सर्व प्रकारचे उपभोग विकत घेण्याची क्रयशक्ती नव्हे; तर पृथ्वीवरील सर्व माणसांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करण्याला पर्यावरणवाद प्राधान्य देतो. त्याला अपेक्षित असलेला विकास माणूसकेंद्रित नाही, पण सर्व माणसांच्या – आज पृथ्वीवर असलेल्या पिढ्या व भविष्यातील सर्व पिढ्यांच्या किमान प्राथमिक हिताचा विचार त्यात लक्षात घेतला आहे. उदाहरणार्थ – प्रचलित विकासाच्या संकल्पनेत मोठी धरणे हे जलव्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण माध्यम मानले जाते. मात्र, मोठी धरणे बांधताना फक्त माणसाच्या गरजांसाठी पाणीपुरवठा हा एकमेव उद्देश असतो. तो साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन पाण्याखाली जाते. शेतजमीन असो व जंगल त्यावरील वनस्पतींचे आच्छादन तोडून त्यावर पाणी साठविले जाते. या जलाशयातील पाणी दूरवरील एखाद्या लहान-मोठ्या मानवी वसाहतीला, एखाद्या भागातील शेतीला पुरविले जाते. स्थानिक जनतेला – ज्यांच्या जमिनी धरणाखाली गेल्या आहेत – या धरणाचा क्वचितच फायदा होतो. तसेच, मानवाखेरीज इतर सजीवांच्या पाण्याची गरज लक्षात घेतली जात नाहीच, पण नदीचा प्रवाह अडविल्यामुळे तिच्या नैसर्गिक चलनवलनाला बाधा येते. पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट होतात. या उलट पर्यावरणवादाने सुचविलेल्या जलव्यवस्थापनामध्ये पाण्याकडे केवळ माणसाची गरज म्हणून पाहिले जात नाही; तर मानवेतर सजीवांच्या आणि परिसंस्थांच्या चलनवलनात पाण्याचे महत्त्व लक्षात घेतले जाते. मोठ्या धरणांऐवजी नदीनाले, विहिरी, लहान बांधबंधारे या मार्फत जलव्यवस्थापनाचा पर्याय पर्यावरणवाद देतो. त्याचाच भाग म्हणून शेतीमध्ये आधी पीक ठरवून मग त्यासाठी पाण्याची तजवीज करण्यापेक्षा प्रदेशाच्या भौगोलिक स्थानानुसार तेथील पर्जन्यमान व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन मग पिकाची निवड करणे शहाणपणाचे, असे पर्यावरणवाद सांगतो.
आपले जगणे सुखकर करण्यासाठी माणसे भोवताली असलेल्या निसर्गात बदल करतात. हे पूर्वापार घडत आलेले आहे. असे बदल करणे मानवी अस्तित्त्वासाठी अपरिहार्य आहे, मात्र हे बदल करताना ते पचवू शकण्याची निसर्गाची क्षमता लक्षात घेणे गरजेचे असते. पृथ्वीवरील सर्व सजीवांना चांगल्या प्रकारे जगता यावे, अशी परिस्थिती निर्माण करण्याची व तिचे संतुलन राखण्याची निसर्गाची क्षमता पर्यावरणवाद लक्षात घेतो. या उलट प्रचलित विकासात या क्षमता-मर्यादा लक्षात न घेता निसर्गरचनेत बदल केले जात आहेत. उदाहरणार्थ – शेती ही मुळातच निसर्गविरोधी क्रिया आहे. जमिनीच्या तुकड्यावर निसर्गतः वाढणाऱ्या वैविध्यपूर्ण वनस्पती नष्ट करून त्या ऐवजी एकाच प्रकारची वनस्पती वाढविणे निसर्गनियमाला धरून नाही. एकाच प्रकारच्या सजीवाची - इथे वनस्पतीची - संख्या वाढू नये याकरिता निसर्गाने भक्षक कीटक, पक्ष्यांची योजना केलेली आहे. त्याचबरोबर हवापाणी व मातीतील घटकांना तोंड देण्याची प्रत्येक वनस्पतीची क्षमता वेगवेगळी आहे. या घटकांमध्ये बदल झाल्यास निसर्गातील वेगवेगळ्या वनस्पती त्या बदलाला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात. त्यात काहींचा टिकाव लागतो; तर काही मरून जातात. शेतीमध्ये एकच वनस्पती असल्यामुळे हवापाणी, मातीत झालेले बदल त्या एका वनस्पतीसाठी प्रतिकूल असतील; तर संपूर्ण पीकच धोक्यात येते. शेतीतील या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेऊन ठिकठिकाणच्या पारंपरिक शेतीपद्धती विकसित झाल्या आहेत. या पारंपरिक शेतीपद्धतींचा पुरस्कार पर्यावरणवाद करतो. प्रचलित विकासात मात्र, नगदी पिकांना महत्त्व दिले जाते. उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके वापरण्यास प्रोत्साहन दिले जाते. या रसायनांचा अंश अन्नसाखळीत उतरून असे अन्न खाणाऱ्यांच्या आरोग्याला, प्रसंगी जीवालाही धोका पोहोचतो. रसायनांमुळे जमिनीचा पोत बिघडतो, अतिरिक्त रसायने नैसर्गिक परिसंस्था प्रदूषित करतात. याचाच अर्थ माणसाने केलेले हे बदल निसर्गाच्या पचविण्याच्या क्षमतेपलीकडचे ठरले आहेत.
अशा प्रकारच्या मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गसंस्था पूर्णपणे कोलमडून पडणार नाही, तसेच वर्तमानातील व भविष्यातील सर्व माणसांच्या किमान प्राथमिक गरजा भागतील, आर्थिक विषमतेची कधीही ओलांडता न येणारी दरी निर्माणच होणार नाही, या किमान निकषांवर आधारित विकासाची संकल्पना असावी, हे पर्यावरणवाद सूचित करतो. त्याकरिता आवश्यक पर्यायही तो सुचवितो. मात्र, पर्यावरणवादाकडे पाहण्याचा ‘पर्यावरणवाद म्हणजे विकासविरोधी’ हा पूर्वग्रह दूर केल्याखेरीज पर्यावरणवाद समजून घेता येणार नाही, पर्यायाने, निसर्ग व माणूस या दोहोंना हितकारक ठरतील अशा परस्परसंबंधांची निर्मिती करता येणार नाही आणि आजवर आलेल्या प्रत्येक सरकारने दावा केलेला पर्यावरण संरक्षण आणि विकासाचा समतोल हा केवळ कागदोपत्री राहील.
(समाप्त)

('लोकपर्याय' या दैनिकात फेब्रुवारी २०१५ मध्ये प्रकाशित)

Comments