रानातून पानात (भाग ३): आखूडशिंगी बहुगुणी रानभाज्या!

रानभाज्यांच्या बाबतीत त्या ग्रामीण भागातील बहुतांशी जनतेला विनामूल्य उपलब्ध होऊ शकतात हा फायदा आहे; त्याचबरोबर त्या निसर्गतः उगवतात, वाढतात यामुळेही होणारे फायदे आहेत. शेतात लावलेल्या भाज्यांना पाणी द्यावे लागते, खत घालावे लागते, कीटकनाशके फवारावी लागतात; एकूणात पिकाकडे लक्ष ठेवावे लागते. रानभाज्यांचे मात्र तसे नाही. त्या रानात, शेताच्या बांधावर, परसात आपसूकच उगवतात. त्यावर रसायनांची फवारणीही झालेली नसते, त्यामुळे ती रसायने पोटात जाण्याचा धोकाही नसतो. बऱ्याचशा भाज्यांमध्ये औषधी, आरोग्यदायी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. ‘आखूडशिंगी... बहुगुणी...’ म्हणता येतील अशा रानभाज्या आहारात असाव्यात!
श्रावण महिन्यातील काही धार्मिक चालीरीतींमध्ये त्या काळात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा वापर होईल व त्यायोगे त्या खाल्ल्या जातील अशी योजना आहे. मागील लेखात म्हटले तसे श्रावणातील शनिवारी टाकळ्याच्या भाजीचा नैवेद्य करण्याची पद्धत आहे. श्रावणी सोमवारी दही-भाताच्या जोडीला कवलाची भाजी करण्याची पद्धत आहे. त्यावरून एक म्हणही आहे, ‘दहीभात कवला, दिंडीच्या पानावर महादेव जेवला!’. बारीक-बारीक पानांची ही कवलाची भाजी आता बाजारात दिसू लागली आहे.
लाल देठ व बारीक पानांची घोळाची भाजी, कुड्याच्या शेंगांसारखी दिसणारी अकरूळाची भाजी, लांबट त्रिकोणी पानांची नाल्यात वा पाण्याजवळ उगवते म्हणून नालीची भाजी – हिचे एक नाव कोलबीचा असेही सांगण्यात आले, कातरलेल्या पोपटी रंगाच्या पानांची बाफली या भाज्यांच्या जोडीने मोठा, जाड 
नालीची भाजी
देठाचा माठही सध्या बाजारात दिसतो आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीला ऋषीची भाजी करतात त्यात हा माठ घालतात. तत्पूर्वी येणाऱ्या श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी संध्याकाळी आमचे मालवणी शेजारी दरवर्षी आंबोळ्या, काळ्या वाटाण्याचे सांबार आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी आठवणीने आणून देतात! शेवग्याच्या पाल्याची, शेंगांची आणि फुलांचीही भाजी करतात. कुर्डूच्या जोडीची केनीची भाजीही पावसाळ्यात येते. केनी-कुर्डूच्या भाजीचा चातुर्मासातील कहाणीत उल्लेख आढळतो. केनीची भजीही करतात. उपवासाला चालणारा शिंगाडाही सध्या बाजारात दिसत आहे. भोकराचे लोणचे आपल्या परिचयाचे असते. पण, ही भोकरे वेचण्याबाबत पेणजवळील एका गृहस्थांनी गंमतीदार माहिती दिली; असे म्हणतात की भोकराची फळे वेचताना न बोलता, मुक्याने वेचावीत; नाहीतर फळात अळी पडते!
आकरुल
पालेभाज्या, फळांबरोबर काही कंदही सध्या बाजारात दिसत आहेत; करांदा हा त्यातील एक. करांदे हे पावसाळी भाज्यांमध्ये गणता येणार नाहीत. ते एरवीही मिळतात, आणि हल्ली त्यांची लागवडही केली जाते. या करांद्यांसारखे कडू करांदेही असतात, पण ते बाजारात येत नाहीत. किंबहुना, ते आदिवासी समाजांतच खाल्ले जातात. आणखी एक कंद म्हणजे हळदे किंवा हलदे; भाजी विक्रेत्या बाईंनी सांगितले की हा कंद उकडून खातात; तर रोहे भागातील एका बाईंनी लहानपणी शाळेत जाता-येता असे कंद शोधून कच्चे खाल्ल्याची आठवण सांगितली. हळदे हे नाव त्यांच्या परिचयाचे नव्हते, पण, त्यांच्या माहितीतील नाव त्यांना आठवत नव्हते.
बाफळी
ग्रामीण भागांत रानभाज्या आजही खाल्ल्या जातात. पण, तिथेही जमिनीचा वापर, लोकांची जीवनशैली वेगाने बदलत आहे. आहारविहाराच्या सवयी बदलत आहेत. ग्रामीण भागातही बाजारातील भाजी सहज उपलब्ध असेल आणि ती विकत घेण्याची क्रयशक्ती असेल; तर बाजारातील भाजी घेण्याकडेच कल दिसून येतो. परिणामी, रानभाज्यांची ओळख, पाककृती, औषधी गुणधर्म, सांस्कृतिक महत्त्व या विषयीची माहिती दुर्मिळ होऊ लागली आहे.
रानभाज्यांची चव आवडण्यासाठी जिभेला थोडी आगळ्या चवींची सवय हवी आणि तशी सवय नसेल; तर नव्या चवी चाखून पाहण्याची, त्या जिभेवर रुळण्यासाठी एखाद्-दोन वेळा आवर्जून खाऊन पाहण्याची, क्वचित काहीशा किचकट पाककृती शिकण्याची तयारी हवी. हे झाले ज्यांना रानभाज्या बाजारातून घेता येतात त्यांच्यासाठी; तर रानातून त्या वेचून, निवडून आणण्याचा पर्याय ज्यांना उपलब्ध आहे त्यांना वेगवेगळ्या रानभाज्या नेमक्या ओळखण्याचे कसबही शिकून घ्यावे लागेल. पिढीजात संक्रमित होणारे हे लोकविज्ञान आपल्या विस्मरणात जाऊ नये आणि कमी होत चाललेल्या जंगल क्षेत्रातून या वनस्पती कायमच्या नाहीशा होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. (समाप्त)
पाककृती
कुड्याच्या शेंगांची भाजी
जिन्नस : कुड्याच्या शेंगा पाव किलो, वाल अर्धी वाटी, बारीक चिरलेले दोन कांदे, फोडणी करण्यासाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि चवीपुरते मीठ.
कृती :
१.       वाल ८ ते १० तास भिजवून ठेवावेत.
२.       कुड्याच्या शेंगा धुवून, त्यांच्या कडेला असणाऱ्या शिरा काढून टाकाव्यात. शेंगांचे साधारण अर्ध्या इंचाचे तुकडे करून ते उकडून घ्यावेत. त्याचे पाणी काढून टाकावे.
३.       फोडणी करून त्यावर कांदा परतून घ्यावा. त्यावर भिजवून ठेवलेले वालाचे दाणे घालावेत. वाल शिजण्यासाठी पाणी घालून त्यावर झाकण ठेवून द्यावे. वाल शिजले की उकडलेल्या शेंगा व मीठ घालून ४ ते ५ मिनिटे मध्यम आचेवर राहू द्यावे.

(रविवार, दिनांक २० जुलै २०१४ रोजी 'कृषीवल' मध्ये प्रकाशित)

Comments