रानातून पानात (भाग १): दिसू लागल्या रानभाज्या!

पहिला पाऊस झाला की काही दिवसांसाठी भाजीबाजार विशेष वैविध्यपूर्ण होतो तो रानभाज्यांमुळे! सुरुवातीच्या पावसाचे पाणी जमिनीत मुरले की काही वनस्पतींच्या मातीत लपलेल्या बिया रुजतात, सुप्तावास्थेत असलेले कंद अंकुरतात आणि रानावनांत, शेतांच्या बांधावर ताजी हिरवळ दिसू लागते.
 ग्रामीण भागातील अनेक रहिवाशांना या हिरवळीतून आपल्याला खाण्यायोग्य वनस्पती अर्थात रानभाज्या नेमक्या निवडण्याचे ज्ञान असते. या रानभाज्यांचे जीवनचक्र अवघ्या काही आठवड्यांचे असते, त्यामुळे त्या एरवी उपलब्ध होत नाहीत. म्हणून मग, जेव्हा मिळतात तेव्हा खाऊन घ्याव्या. मूळची रोह्याची पण आता मुंबईत राहणारी सुजाता म्हणते, “गावाकडे या दिवसांत रानभाज्याच खातात. भरपूर मिळतात, रानात जाऊन आणल्या की झाले!”  या भाज्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखतात, त्यामुळे मुंबईत काही भाज्या ज्या नावाने ओळखल्या जातात ती नावे परिचयाची नसल्याचे सुजाता सांगते. गवताच्या
सध्या बाजारात कुळूची भरपूर आवक दिसते आहे.
 पात्यासारखी पाती असलेल्या कुळूच्या भाजीला फोडशी असेही म्हणतात; तर तिच्या गावी तिला 
‘वाक्चवऱ्या’ म्हणतात.
यंदा पावसाने हजेरी लावली अन् लगेच दडी मारली. तरीसुद्धा, जून महिन्यात जो काही थोडाफार पाऊस झाला त्यातून काही रानभाज्या उगवल्याच! कुळूची भाजी त्यातील एक. कुळूच्या छोट्या-छोट्या जुड्या सध्या भरपूर प्रमाणात बाजारात दिसत आहेत. कांद्यावर परतून कुळूची भाजी करतात किंवा बेसन मिसळून मुटके बनवितात. ही भाजी त्या वनस्पतीला फुले येण्यापूर्वीच खावी, असे म्हणतात.
ग्रामीण अथवा निमशहरी भागांत राहणाऱ्यांना रानांत, शेतांत स्वतः जाऊन या भाज्या मिळविण्याची संधी असते; तर ठाणे, रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून येणाऱ्या भाजीवाल्यांमुळे मुंबई आणि नवी मुंबईकरांना या भाज्यांची चव चाखण्याची संधी मिळते. मात्र, भाजीबाजारात सर्वत्र या भाज्या मिळत नाहीत. कुठे फुटपाथवर बसणाऱ्या लहानशा भाजीविक्रेत्याकडे त्या दिसतात; तर ठाणे, पनवेल परिसरात ठराविक रस्त्याच्या कडेला बायका रानभाज्यांची टोपली घेऊन बसलेल्या दिसतात. वसईहून भाजी घेऊन येणाऱ्या विक्रेत्या दादरला कबुतरखान्याजवळ फुटपाथवर भाजी विकायला बसतात, त्यांच्याकडे या पावसाळी भाज्या हमखास दिसतात. वाशीच्या भाजीबाजारात पनवेलहून येणाऱ्या काही विक्रेत्यांकडे नेहमीच्या भाज्यांबरोबर पावसाळी भाज्यांचे तीन-चार तरी प्रकार पाहायला मिळतात. मात्र, रानभाज्या हव्या असतील; तर सकाळीच बाजारात जायला हवे. या भाज्यांची गिऱ्हाइके ठरलेली असतात व दुपारच्या आतच त्या संपूनही जातात.
शेवळं-काकडाची जोडी! 
शेवळं-काकडं ही पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारी भाजी. गुलाबीसर तपकिरी रंगाची एका बाजूला निमुळती होत गेलेल्या मांसल देठासारख्या दिसणाऱ्या शेवळांचा जुडगा बांधून विक्रीला येतो. वेगळीच दिसणारी ही खरे तर पालेभाजीच! देठासारखा दिसणारा हा भाग म्हणजे वनस्पतीची घट्ट गुंडाळलेली पालवी असते, तीच पुढे वाढून वनस्पतीची पाने होतात. ही भाजी दिसायला वेगळी असते; तशी तिची पाककृती विशेष काळजीपूर्वक बनवावी लागते. ही भाजी खूप खाजरी असते त्यामुळे नीट निवडून त्याला काकडांचा रस वा चिंचेचा कोळ लावून ती करायची असते. मटणासाठी करतात तसे वाटप या भाजीसाठी बनवितात. गंमत अशी की या भाजीचा पोत, ती करण्याची पद्धत, त्याची चव यामुळे शाकाहारी लोक ही पालेभाजी खात नाहीत आणि मांसाहारप्रेमी खास आवडीने खातात!
काकडाची फळे नुसती किंवा लोणचे घालूनही खातात. मिठाच्या पाण्यात घालून ठेवली; तर वर्षभर खाता येतात. उन्हाळा सरता सरता मोहाची फळे बाजारात दिसू लागतात. मोहाचे झाड प्रसिद्ध आहे ते त्याच्या फुलांपासून केल्या जाणाऱ्या दारूसाठी. मात्र, ही फुले इतर प्रकारेही – ताजी, वाळवून, भाजून – खाल्ली जातात. केवळ फुलेच नाहीत; तर या झाडाचे लाकूड, पाने, फळे, बिया सगळेच माणूस वा प्राण्यांसाठी उपयोगी आहे. मोहाच्या फळांना ‘मोहट्या’ म्हणतात; या मोहट्यांची भाजी करून खातात.
मायाळूच्या वेलाची ही पाने
गावाकडे घरालगत वाढणाऱ्या मायाळूच्या वेलीची पानेही खाल्ली जातात. या पानांची कोरडी किंवा पातळ भाजी करतात, भजी तळतात आणि आमटीतही ती घालतात.
वडीच्या, भाजीच्या अळूची पाने आपल्या माहितीची असतात. पावसाळ्यात या अळूचा ‘तेरं’ नावाचा प्रकार रानांत मुबलक उगवतो. या रानअळूची भाजी करतात. वडी-भाजीच्या अळूपेक्षा वेगळे अळू नावाचे एक मोठे वाढणारे झुडूप आहे. उन्हाळा सरता सरता त्याची फळे पिकू लागतात. चिकूसारख्या रंगाच्या पण तुकतुकीत दिसणाऱ्या या अळूच्या फळांची चव आगळीच असते, म्हणून चाखून पाहावी.
आगळीवेगळी चव म्हणून अळूची ही फळे चाखून पाहावीत.
निसर्गात आढळणारी वनस्पतींची विविधता आणि आपले जगणे यांच्यात थेट संबंध आहे, ही जाणीव रोजचा भाजीबाजार करणारी वा करणाऱ्याला वारंवार प्रकर्षाने होत असावी. कुटुंबातील लहानथोरांच्या आवडीनिवडी, पथ्यपाणी लक्षात घेऊन वर्षभर मिळणाऱ्या त्याच त्या १५-२० भाज्यांमधून रुचीपालट साधणे ही कौशल्याची बाब आहे. दररोज हे कौशल्य पणाला लावावे लागणारे भाजी आणण्याचे हे जीवनावश्यक काम करताना पावसाळ्यापुरत्या का होईना रानभाज्या मिळाल्या; तर खास आनंद होतो! अशा आणखी काही रानभाज्यांची माहिती पुढच्या रविवारी.
पाककृती
कुळू किंवा फोडशीचे मुटके
जिन्नस :  कुळूच्या ४-५ जुड्या, एक ते दीड कप बेसन, हळद व तिखट प्रत्येकी पाव चमचा, तळण्यासाठी तेल, चवीपुरते मीठ
कृती :  
१.        प्रत्येक पानाच्या मधोमध असलेली काडी काढून टाकावी. भाजी स्वच्छ धुवून, बारीक चिरून घ्यावी.
२.        चिरलेल्या भाजीला हळद, तिखट, मीठ लावावे.
३.        भाजीला पाणी सुटल्यावर त्यात पुरेसे बेसन घालवून कालवावे.
४.        या घट्ट मिश्रणाचे मुठीत वळून लहान लहान मुटके करावे.
५.        हे मुटके वाफवून घ्यावे.


६.        आवडीनुसार तेलावर कुरकुरीत भाजावे किंवा तळून घ्यावे.  

(रविवार, दिनांक ६ जुलै २०१४ रोजी 'कृषीवल' मध्ये प्रकाशित)

Comments