Small Things of Madban

Madban village in Ratnagiri district came in limelight five-six years ago, when villagers actively started protesting the proposed Jaitapur Nuclear Power Plant. It is once again in the news this week as some of the villagers met Narayan Rane, Minister of Industry, Port and Employment. They submitted a letter saying they are willing to accept the compensation offered and they shall no more oppose the JNPP. That has been looked upon as their personal decision by rest of the villagers and activists, and hence, the village plans to continue protesting JNPP. 

It is three years now, I have been visiting Madban. In these three years, the village has got a lot of media coverage, which often revolved around their JNPP protests. But, if one visits the village on an ordinary day - when there is no protest march, or public hearing or a political leader's visit. - villagers have many stories of "good old days" to share! These stories unfold the intrinsic bonding between them and their surroundings.

‘निसर्गतःच’ भाग्यवान!


‘नैसर्गिक सबसिडी’ ज्या परिसंस्थांपासून मिळते त्यांचे चलनवलन समजून घ्यावयाचे, त्यातून आपल्या गरजेपुरते नेमके अलवार काढून घ्यावयाचे आणि ते तसे कायम मिळत राहावे म्हणून संवर्धन करीत राहावयाचे. हे शहाणपण इथल्या पारंपरिक जीवनशैलीत आहे. परंतु, अणुऊर्जा प्रकल्पामुळे माडबनातील जमीन हाच मुद्दा प्रामुख्याने चर्चिला गेला आणि इथली महत्त्वपूर्ण जीवनशैली मात्र दुर्लक्षित राहिली... 

माडबन... रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील लहानसे गाव. एरवी कुणाच्या अध्यात ना मध्यात असे हे गाव प्रकाशझोतात आले ते जैतापूर इथल्या अणुऊर्जा प्रकल्पामुळे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प नावापुरताच जैतापूरमध्ये आहे; बाकी त्याची उभारणी प्रामुख्याने माडबन आणि पंचक्रोशीतील गावांच्या जमिनींवर प्रस्तावित आहे. प्रकल्पाविरोधात वातावरण तापू लागले तेव्हा पहिल्यांदा माडबनला जाणे झाले. त्यामुळे, या भेटीत गावकऱ्यांशी झालेल्या गप्पा प्रकल्पाभोवतीच मर्यादित राहिल्या. पण, एकूण गावाचा नूर पाहता जाणवले की असा प्रसंग न ओढवता तर; हे गाव असेच सुशेगाद पडून राहावयाचे! आता या वृत्तीमुळे कुणी कोकणी माणसाला आळशी म्हणत असतील; तर म्हणोत बापडे; पण असा आळस करता येण्यासाठी सुद्धा ‘नैसर्गिक’ भाग्य लागते!

नैसर्गिक सबसिडी

माडबनातील वैविध्यपूर्ण निसर्ग स्थानिक जीवनशैलीला मोठ्या प्रमाणावर हातभार लावतो. चारदोन आंबे-काजू, एखादा फणस, माड, पोटापुरती शेती, गाईगुरे आणि चार पावलांवर खाड्या-समुद्रातील मासे असल्यावर दोन वेळच्या किमान जेवणाची चिन्ता नसते. ‘नैसर्गिक सबसिडी’ म्हणतात ती हीच; ही ज्या परिसंस्थांपासून मिळते त्यांचे चलनवलन समजून घ्यावयाचे, त्यातून आपल्या गरजेपुरते नेमके अलवार काढून घ्यावयाचे आणि ते तसे कायम मिळत राहावे म्हणून संवर्धन करीत राहावयाचे. हे शहाणपण इथल्या पारंपरिक जीवनशैलीत आहे. अवतीभवतीच्या निसर्गावर अवलंबून असलेली लहानशी स्वयंपूर्ण व्यवस्था इथे आहे. परंतु, अणुऊर्जा प्रकल्पामुळे माडबनातील जमीन हाच मुद्दा प्रामुख्याने चर्चिला गेला आणि इथली महत्त्वपूर्ण जीवनशैली मात्र दुर्लक्षित राहिली. किंबहुना, त्याविषयी जाणून घेतले; तर प्रकल्पाला विरोध का होतो हे लक्षात येईल.

जैवविविधता आणि उपजीविका

बागायती, शेती, गाईगुरे-शेळ्यामेंढ्या व मच्छिमारी ही माडबनवासीयांची उपजीविकेची साधने. इथली मच्छिमारी खास! माडबनवासी शेती-बागायतीची माहिती देतात; पण मच्छिमारीचा विषय निघाला की कळी खुलते. मच्छिमारीची नवी-जुनी साधने, जाळ्यांची जमवाजमव होते आणि गप्पा रंगतात.
एका बाजूला जैतापूरची खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र असल्यामुळे इथे खाडी आणि समुद्र अशी दोहोंत होणारी मच्छिमारी चालते. खाडी-समुद्रात मिळणारे मासे इथे मिळतात; त्याबरोबरच जैतापूरची कालवे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चवीची नोंद ब्रिटिशांनी गझेटीअरमध्येही केली आहे.
विशेष म्हणजे, इथली मच्छिमारी बिगर-यांत्रिकी असून, होडीसुद्धा वापरली जात नाही. पारंपरिक मच्छिमारीचे अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात.
Fishing gears used in Madban
मच्छिमारी : पूर्वी गावात रापण लावली जात असे; २० फूट खोल व शंभर पाटांची (१ पाट~ २५ फूट) लांबलचक रापण समोर दिसणाऱ्या विजयदुर्गापर्यंत जात असे. ती लावण्यासाठी एक होडी होती. जवळपास दीडशे माणसे रापणीत सहभागी होत. २०-२५ वर्षांपूर्वी ती बंद झाली. रापण लावणे हे एकट्यादुकट्याचे काम नव्हे; त्यामुळे माणसांचा उत्साह सरला तशी ती बंद पडली.
पारंपरिक पण आजही इथे सर्रास वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहेत. एका माणसाने हातात घेऊन जायचे ‘आक्या’ जाळे. संध्याकाळच्या वेळी सोबत बत्ती घ्यावयाची आणि तिच्या उजेडात दिसणारे मासे आक्यात लोटायचे. फेकल्यावर वर्तुळाकार पसरणारी पाग; याला फिशरीज् सायन्सवाली मंडळी फेकजाळे किंवा कास्ट नेट म्हणतात. लांबलचक, लवचिक काठीला बांधलेला गळ; याच्या हूकाला आमिष म्हणून कोलंबी, चिंगुळ, मेंगणी किंवा कुर्ली लावावयाची. आणखी एक प्रकार म्हणजे गोंडा किंवा लांबार्णी. लाकडी फळकुटावर गुंडाळून ठेवलेला गळच; पण याच्या हूकाला काहीच लावत नाहीत. हा कौशल्याने पाण्यात भिरकावायचा की जणू छोटा मासा उसळ्या घेत जातो आहे असे वाटून तोवर (मोठी सुरमई) किंवा कोकेरी त्यावर झडप घालते आणि हूकाला अडकते. कांडळ हा फिशरीज् सायन्समध्ये गिल नेट म्हणतात त्याचा प्रकार. जाळ्याच्या आसात मासा शिरतो आणि त्याच्या पंखाला जाळ्याचा स्पर्श होईपर्यंत पुढे जातो. स्पर्श होताक्षणी त्याला कळते की काहीतरी अडथळा आहे; आणि तो मागे फिरण्याचा प्रयत्न करतो. पण एव्हाना तो जाळ्यात पुरता अडकलेला असतो, हालचालीमुळे त्याच्या गिलांवरील झडपांना धोका पोहोचून त्याचा श्वास कोंडतो. ‘कावर’ ही आणखी एक कौशल्यपूर्ण पद्धत. टोक वळवून चपटे केलेल्या लोखंडी काठीला कावर म्हणतात. ही भाल्यासारखी फेकून मासा मारावयाचा. मोठा कान्हई मासा मारण्यासाठी ही उपयुक्त ठरते. ही पद्धत हल्ली फारशी वापरली जात नाही, पण काही घरांमध्ये आजही कावर ठेवलेली दिसून येते. याखेरीज बायका लहानशी कोयती घेऊन छोटी कालवे काढावयास, शिंपले वेचावयास जातात; तर पुरुष बुडी मारून मोठी कालवे काढतात.
मासे खायचे तर केवळ पकडण्याची कला पुरेशी नाही; जाळेसुद्धा विणता यायला हवे. पूर्वीची वनस्पतीजन्य धाग्यांपासून विणली जाणारी जाळी जाऊन आता कृत्रिम धाग्यांची तयार जाळी मिळू लागली आहेत. ही नवी जाळी तांगडण्यापुरती (दुरुस्त करणे) विणकामाची कला आता वापरात आहे. तागाची, सुताची जाळी ताठ राहावीत, लवकर कुजू नयेत म्हणून त्यांना ‘कसं’ करावे लागे. घेवडा वर्गातील एका वेलीचा फुगीर कंद किंवा आईनाची, कुम्भ्या वृक्षाची साल किंवा मोहोटीच्या झाडाची साल हे कसं करण्यासाठी उतरत्या क्रमाने चांगले मानले जाते. यातील उपलब्ध घटक पाण्यात उकळून त्यात जाळे बुडवून काढावयाचे ही सर्वसाधारण पद्धत. कांडळाला लावावयाचे ‘भेंडे आणि गुळ्या’ (floats and weights) घरीच बनविल्या जातात. सड्यावर मिळणाऱ्या ठराविक गवताची पोकळ काडी भेंडा म्हणून वापरली जाते; तर मऊ मातीपासून गुळ्या वळतात. स्थानिक जैवविविधतेचा उपयोग असा हुशारीने केला जातो.
शेती : पावसावर घेतले जाणारे भाताचे मुख्य पीक आणि त्यानंतर जमिनीत उरलेला ओलावा
आणि हिवाळी दवावर घेतल्या जाणाऱ्या डाळी आणि कडधान्ये घरच्या आहारात असतात. गाव खाडीलगत असल्याने किनाऱ्यावर असलेल्या भाताच्या खाचरांत खारे पाणी शिरतेच. अशा खारजमिनीत घेतल्या जाणाऱ्या भाताच्या काही जाती आहेत. त्यांना ‘खारल्याचा भात’ असे म्हणतात. गावातील जुनी मंडळी थोडे आठवून या जातींची नावेही सांगतात. त्यातील ‘मुणगा’ भाताविषयी विशेष प्रेमाने बोलतात; ‘हा भात खाल्ला म्हणजे आजारी माणूस अंथरुणातून उठलाच पाहिजे!’
हल्ली लोक संकरित बियाणांकडे वळल्यामुळे जुनी वाणे दुर्मिळ होऊ लागली आहेत; तरी एखाद्या घरात जुना भात मिळतो. हे कृषीवैविध्य इथल्या जैवविविधतेच्या व्यावहारिक वापराची पुन्हा एकदा प्रचीती देते.
बहुपयोगी सडा : लांबचलांब पसरलेल्या अग्निजन्य खडकाची जमीन इथे आहे. तिला सडा असे म्हटले जाते. सगळ्या ऋतूत टोकाच्या हवामानाचा मारा सड्यावर होतो. या कातळावर फारशी माती नसते आणि सच्छिद्र जांभ्या दगडामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमताही नसते. त्यामुळे वर्षातील पावसाळ्याचे चार महिने वगळता इतर काळ ही जमीन कोरडे गवत आणि खुरट्या झुडुपांनी आच्छादलेली दिसते. इथल्या परिसंस्थेविषयी माहिती नसणाऱ्याला ही जमीन पडीक वाटते, आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा देशावर विस्तृत पसरलेल्या शेतजमिनी पाहण्याची सवय असलेल्यांना ही एवढी जमीन अशीच मोकळी राहिलेली पाहून इथे शेती होत नाही; तर हिचा उपयोग काय, असा प्रश्न पडतो. पण, या सड्याला कोकणी माणसाच्या जगण्यात महत्त्वाचे स्थान आहे.
सड्यावर पावसाच्या पाण्यात भात घेतला जातो. त्यानंतर कुळीथ, तूर ही पिके घेतली जातात. खेरीज, सड्यावर आपसूक उगवणारा देवभात ही अजून एक खासियत! देवभात उपवासाला चालतो. तसेच, बैलपोळ्याच्या दिवशी बैलाच्या श्रमाचे अन्न खाऊ नये म्हणतात; अशावेळी देवभात खाण्याची प्रथा असल्याचे इथे ऐकिवात आले.
माडबन आणि पंचक्रोशीतील गाईगुरे, शेळ्यामेंढ्यांसाठी सडा हे कुरणच आहे. इथे भरपूर कोरडे गवत असते, त्यावर ही जनावरे चारता येतात. शेतीसाठी बैल आणि दूधदुभत्यासाठी गाय पाळली जाते. माडबनात म्हशींपेक्षा गाई जास्त आहेत, कारण गाईला कोरडे गवत चालते. म्हशीला ओला चारा लागतो, हे अनुभवातून जाणून त्यानुसार स्थानिक लोकांनी गाई पाळण्याला प्राधान्य दिले आहे. पावसाळ्यापूर्वी शेत तयार करण्यासाठी सड्यावरचे गवत घेऊन भाजवळ केली जाते.
सड्यावरील जमिनी साधारणतः खासगी मालकीच्या आहेत. गावाच्या जवळपास पूर्णपणे मच्छिमार समाजाची काही गावे आहेत. त्यातील बहुतेक मच्छिमारांच्या नावावर जमिनी नाहीत. हे मच्छिमार मासे सुकवण्या-खारवण्यासाठी सड्यावरील जमिनीचा वापर करतात. तेव्हा, जमीन मालकाला मोबदला म्हणून माशांचा वाटा दिला जातो. परंतु, हल्ली बाजारात ताज्या मासळीला भरपूर मागणी असल्याने सुकविण्यासाठी फारसे मासे उरत नाहीत.
सड्यावरून जांभा दगड काढला जातो. जांभा हा कोकणात बांधकामासाठी वापरला जाणारा पारंपरिक घटक आहे. सड्यावर असलेल्या खाणीतून हा दगड पुरविला जातो. स्वतःचे घर बांधण्यासाठी दगड उपलब्ध होतो आणि प्रसंगी दगड काढून विकताही येतो.

एकजिनसी गाव

माडबनात सुमारे २०० घरे आहेत. एव्हाना सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेल की, या सर्वांचा पोटापाण्याचा उद्योग सर्वसाधारणपणे सारखा आणि तो भोवताली असलेल्या निसर्गावर अवलंबून. त्यामुळे, एकत्र राहून निसर्ग राखण्याशिवाय पर्याय नाही; त्यातच गावाचे भले आहे, हे ही मंडळी पक्के जाणून आहेत. गाव सगळे भंडारी समाजाचे. गावातील लोकसंख्या एकजिनसी असल्यामुळे गावात टोकाचे भांडणतंटे नाहीत. याचा मुद्दाम उल्लेख करण्याचे कारण; जातपात मानू नये म्हणतात, पण भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात जातिव्यवस्थेकडे ‘नैसर्गिक स्रोतांच्या व्यवस्थापनाचे साधन’ म्हणून पाहता येईल का, असा विचार व्हावयास हवा. आपला देश ‘विविधतेने नटलेला असल्या’चे आपण म्हणतो तेव्हा, ती सांस्कृतिक विविधता आपल्याला लाभलेल्या जैवविविधतेतून आणि वेगवेगळ्या समाजांनी त्यावर अवलंबून जगण्याची कला आत्मसात केल्यामुळे निर्माण झाली आहे, हे विसरून चालणार नाही. यामध्ये ‘धर्म’ असे म्हटलेले नाही, कारण कोकणातील मासेमार हिंदू असो; वा मुसलमान त्याला मिळणारे मासे सारखेच असतात. ते मिळेनासे झाले की सोसावा लागणारा त्रासही सारखाच असतो. पण, मासेमार खारवी जातीचा आहे की भंडारी यामुळे फरक पडतो. जसे; खारवी समाज उपजीविकेसाठी मासेमारीवरच अवलंबून असल्याचे दिसून येते; तर भंडारी समाज गरजेपुरती मासेमारी करतो. ज्या गावांत दोन्ही समाज आहेत तिथे भंडारी घरे खारवी समाजाकडून मासे विकत घेत असल्याचे दिसून येते.
माडबनात पैसा हा प्रामुख्याने आंब्याच्या निर्यातीतून येतो. पण, बाकी माड, मासे, भात ही इथल्या निसर्गाची देणगी. एकूणात इथला माणूस खाऊन-पिऊन सुखी आहे. त्याला प्रकल्पात नोकरी मिळण्याचे आश्वासन भुरळ पाडत नाही. पण, त्याचे सगळे व्याप सांभाळून उरणाऱ्या वेळात रोजगाराची संधी मिळाली तर त्याला हवी आहे. मात्र, ती अशा लादलेल्या प्रकल्पातून नको आहे. त्याऐवजी, इथे असलेला निसर्ग जपला, संवर्धित केला; तर त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी त्याला आवडू शकतील!
- रेश्मा जठार

Published In: Parivartanacha Watsaru, 1-15 Dec 2012.

Comments