मासेमारीचा आनंद!

रत्नागिरीतील भाट्यात एसटी महामंडळातून निवृत्त झालेले पिलणकर पायाला जुन्या टायरचे तुकडे बांधून मुळे वेचण्यासाठी खाडीत उतरतात, मिऱ्यावरचे नार्वेकर गावातील तरुणांना जोडीला घेऊन ‘रापण’ लावतात, बुडी मारून तळाशी बिळात लपलेले मासे हाताने ओढून पकडण्यात साखरी-नाट्यातील मोठ्या मच्छिमार नौकांचे मालक असलेल्या माजीदभाईंचा हातखंडा; तर गड नदीकाठी वीरबंदरात राहणारे हेडमास्तर अप्पा पावसकर निवृत्तीनंतर नेमाने नदीत मासेमारी करतात... वास्तविक, यापैकी कुणालाही दोन वेळच्या जेवणासाठी अशी लहानशा प्रमाणावर मच्छिमारी करावयाची आवश्यकता नाही; पण हे चौघेच नव्हेत; तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक खाडी, समुद्र किनाऱ्याजवळ राहणारी मोठी लोकसंख्या आपापल्या दैनंदिन व्यवहारातून वेळ मिळताच किंवा आवर्जून वेळ काढून घरातील कालवणापुरते मासे पकडून आणते!
ही लहान प्रमाणावरील मच्छिमारी करण्याच्या तऱ्हा तरी किती! कुठे लवचिक काठीला दोरी लावून त्याच्या टोकाशी हूक बांधून केलेला ‘गळ’; तर कुठे वर्तुळाकार ‘पागली’. कुठे हातावर तोलून फेकावयाचे जाळे; तर कुठे बांबूच्या दोन काठ्यांमध्ये बांधलेली ‘वीण’. कुणी आडव्या धरलेल्या पिशवीसारखी दिसणारी ‘डोल’ लावतो; तर कुणी उभ्या काठ्यांच्या आधाराने ‘वाण’ लावतो. कुणी खेकडे पकडतो; तर कुणी खाडी-समुद्रात लांबलचक ‘कांडाळ’ लावतो. घरच्या गरजेपुरती मासळीची तरतूद करण्यात बायकाही मागे नाहीत. प्रचंड ताकदीच्या कामांमध्ये त्या फारशा दिसणार नाहीत, पण, खडकावरील धारदार कालवे कोयतीने फोडणे, वाळूतून मुळे शोधणे अशा चिकाटीच्या कामांमध्ये त्यांचा पुढाकार. खेरीज, घरात आलेल्या मासळीचे चवदार कालवण करून वाढण्याचे काम प्रामुख्याने यांचेच!

गरजेपुरत्या या मासेमारीत जसा पारंपरिक कौशल्याचा, सवयीचा भाग आहे; तसा त्यातून प्राथमिक स्वरुपाचा आनंद मिळत असावा. आपल्या बाल्कनीत कुंडीत लावलेला कढीलिंब किंवा परसबागेत उगवलेला अळू स्वयंपाकात वापरताना मनाचा एक कोपरा खास सुखावतो; तोच हा primitive आनंद. थेट अन्न रुपाने अन्न मिळविण्यासाठी कष्ट जेवढे जास्त; तेवढे या आनंदाचे मोल मोठे.
मासे पकडण्यातून मिळणाऱ्या आनंदाची गम्मत दोन प्रकारची आहे. स्वतःसाठी, कुटुंबासाठी अन्न मिळविण्याचा प्राथमिक आनंद त्यामध्ये आहेच. पण त्याचबरोबर मनुष्यप्राण्यातील शिकारीच्या सहजप्रवृत्तीला व्यक्त होण्यास मासेमारीत वाव आहे. नख्या, सुळे, शिंग असलेल्या, वेगाने पळणाऱ्या मोठ्या जनावरांच्या मागे दाट जंगलात शिरून त्यांची शिकार करावयाची म्हणजे मोठे धाडस हवे आणि ताकदही प्रचंड हवी. त्या तुलनेत माशांची शिकार करणे माणसाला सोपे वाटले असावे. पहिला मासा बहुदा माणसाने हाताने पकडला असावा. मग पुढे, फेकून मारावयाचे भाल्यासारखे हत्यार, टोपल्या, गळ, जाळी वापरात आली असावीत. फारशा खोल नसलेल्या स्वच्छ, नितळ पाण्यात माशाचा अचूक वेध घ्यावयाची टोकदार लोखंडी ‘कावर’ आजही हौशी मच्छिमारांनी जपून ठेवलेली दिसते.
पूर्वी मच्छिमार म्हटला म्हणजे त्याला जाळे विणता आलेच पाहिजे; नाहीतर मासेमारी करणार कशी?! जाळे नुसते विणून भागत नसे; कारण पूर्वीची जाळी सुती धाग्यांची असत. ओले झाल्यावर सूत मऊ पडते. त्यामुळे, जाळे चिवट राहावे, दीर्घकाळ टिकावे यासाठी त्यावर प्रक्रिया करावी लागत असे. आईन किंवा इतर एखाद्-दोन प्रकारच्या झाडाची साल पाण्यात उकळून तयार झालेल्या द्रावात जाळे बुडवून काढावयाचे आणि वाळवून मग वापरास सुरुवात करावयाची. ही प्रक्रिया काही दिवसांच्या अंतराने नियमित करावी लागे. त्यामुळे एकच जाळे असून चालत नसे. एक वाळेल तोवर वापरासाठी दुसरे हवे. म्हणजे किमान दोन जाळी तरी विणायला हवीत. रात्रंदिवस मेहनत करून स्वतः तयार केलेल्या जाळ्याला पहिल्यांदा मासळी लागत असे तेव्हाचा आनंद आपल्याला शब्दांत सांगून समजणार नाही.
आजघडीला मासेमारीची आधुनिक तंत्रे विकसित झाली आहेत. मच्छिमारीचे साहित्य बाजारात तयार मिळते. मच्छिमारी ही पारंपरिक कौशल्याची बाब उरलेली नाही; तर तिचा व्यवसाय झालेला आहे. मासळीच्या दुष्काळाची वार्ता असली; तरी मोठाल्या यांत्रिक बोटी बारा महिने तेरा काळ अखंड मच्छिमारी करताना दिसतात. प्रत्येक खेपेस मासे मिळतीलच, गुंतवलेल्या रकमेवर नफा नाही; पण किमान तोटा तरी होणार नाही अशी शाश्वती आताशा राहिलेली नाही. दोनचार महिन्यांत एखाद् वेळेस ‘बंपर कॅच’ मिळाला म्हणजे तेवढ्यापुरते नफ्यातोट्याचे गणित जुळते. अशा वेळी मच्छिमारी बंदरात फेरी मारली असता टेम्पो-ट्रक भरभरून मासळी मिळालेली दिसते. चढ्या दराने विकली जात असते. मासळीला योग्य भाव मिळाला म्हणजे मच्छिमारांच्या चेहऱ्यावर आनंदही फुलत असतो. पण एकूणात आज मासेमारी व्यवसायासमोर असलेल्या अडचणी पाहता या आनंदामागे प्राथमिक स्वरुपाच्या निखळ सुखापेक्षा ‘चला... या खेपेस निभावले’ असा सुटकेचा नि:श्वास जाणवत राहतो.
(‘नैशनल फाउंडेशन फॉर इंडिया’च्या फेलोशिपअंतर्गत हे लेखन केले आहे.)
-          रेश्मा जठार

पूर्वप्रसिद्धी : आपलं पर्यावरण, एप्रिल २०१३

Comments